Close

दही,तब्येतीला सही (Yogurt Is A Sign Of Health)

दही हे आरोग्यपूर्ण आहे. रोजच्या आहारात दह्याला खूप महत्त्व आहे. दही चवीसाठी जितके स्वादिष्ट तितकेच आरोग्यासाठी पौष्टिक आणि गुणकारी आहे. दाह शमवणार्‍या दह्याचे अमृततुल्य गुण जाणून घेऊयात.


आंबट-गोड चवीचे दही जितके स्वादिष्ट आहे तितकेच आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.दही आज घराघरांत तयार केलं जाते.स्वास्थ्यपूर्ण आरोग्यासाठी दिवसभरात किमान 1 कपभर दही खाणे उपयुक्त ठरते.आयुर्वेदानुसार दह्याच्या सेवनाने भूक आणि पचनशक्ती वाढते.उन्हाळ्याच्या दिवसांत ते अतिशय उपयुक्त ठरते.

दुधापेक्षा दही अधिक गुणकारी
रोज 100 ग्रॅम दह्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर घटतो.शरीरातील चरबी कमी करण्यास दह्याचा उपयोग होतो.दह्यातील कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते.दुधापेक्षा दह्याच्या सेवनाने अधिक लाभ होतात,हे आता वैज्ञानिकदृष्ट्या सिध्द झाले आहे.दुधातील तेलकटपणामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. या उलट दह्याचे सेवन हृदयासाठी लाभदायी मानले जाते. दूध आणि दह्यातील रासायनिक घटक समान असले तरी दुधापेक्षा पचायला हलके असलेले दही श्रेष्ठ ठरते.

रोगांवर उपाय
दही खाण्याने पोटाचे विकार दूर होतात.तज्ज्ञांनुसार आहारात दह्याचा दररोज वापर करणार्‍यांमध्ये हृदयरोगांची शक्यता खूप कमी असते.दह्यात कॅल्शियमची मात्रा जास्त असते जी आपल्या शरीरातील हाडांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते.दात आणि नखांच्या मजबूतीसाठीही मदत करते.दह्यातील प्रोटीनमुळे शरीराचा विकास होतो. लहान मुले आणि तरुणांच्या विकासासाठी दह्याचे सेवन आवश्यक आहे. दह्याच्या नियमित सेवनाने झोपेच्या समस्या,कफ,अपचन,बध्दकोष्ठता आणि गॅसेस या तक्रारी उद्भवत नाहीत. जेवणात दह्याचा समावेश केल्याने पचन लगेच होते.दह्यातील व्हिटॅमीन बी-12मुळे शरीरात शुध्द रक्त निर्माण होते.चांगल्या आरोग्याबरोबरच दह्यामुळे सौंदर्यविषयक समस्याही दूर होतात.

औषधी उपयोग
पोटाचे विकार

जेवणाबरोबर दही घेतल्याने जेवण लगेच पचते. याशिवाय दह्यातील बॅक्टेरिया आतड्यातील जंतूंना नष्ट करून दूषित मळ बाहेर काढून टाकतो.
उदर रोग
उदर रोगात भाजलेले जिरे व सैंधव मीठासोबत दह्याचा वापर केल्यास फायदा होतो.
वजन घटणे
आजारपण किंवा इतर कारणास्तव जर वजन सातत्याने घटत असेल तर दह्यात काजू,बदाम,पिस्ते किंवा शेंगदाणे टाकून खाल्याने वजन वाढण्यास मदत होते.
रक्तस्त्राव
रक्तस्त्राव होत असेल तर दह्यात मीठ टाकून खाल्ल्याने रक्तस्त्राव थांबतो.
उच्च रक्तदाब
द्ह्यात लसूण मिक्स करून खाल्याने उच्च रक्तदाबासाठी फायदा होतो.
कोंडा
कोंड्याची समस्या असेल तर आंघोळीपूर्वी केसांच्या मुळांना दही लावावे.याशिवाय मुरूमं-पुटकुळ्यांची समस्या असेल तर दह्यात बेसन पीठ मिक्स करून पेस्ट तयार करावी आणि थोड्या थोड्या प्रमाणात चेहर्‍यावर लावल्याने मुरूमं, पुटकुळ्या नाहीशा होतात.
दही खाताना सावधान
नेहमी ताजे आणि गोड दहीच खावे.
कफ आणि तापात दही खाणे टाळावे.
अ‍ॅसिडीटी,अल्सर, खोकला किंवा पित्त असणार्‍यांनी आंबट दही खाऊ नये.
दही कधीही गरम करून खाऊ नये.
दही रात्री कधीही खाऊ नये.रात्री दही खाल्ल्याने कफ प्रवृत्तीचे आजार होतात.याशिवाय ताप,रक्तदाब, विस्मरण यांसारखे रोगही होऊ शकतात.
कफ आणि दमा असणार्‍यांनी दह्याचे सेवन टाळावे.
शरीरावर सूज असेल तर दही खाऊ नये.
दह्याला तांबे, पितळ, कांस्य अथवा अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यात ठेऊ नये. यामुळे दही विषारी होते. दही नेहमी स्टील,माती किंवा काचेच्या भांड्यात ठेवावे.

Share this article