२००३ साली शाहिद कपूर आणि अमृता राव यांची प्रमुख भूमिका असलेला इश्क-विश्क हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. याचे नाव इष्क-विष्क रिबाऊंड असे आहे. नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर अन् टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे.
अभिनेता रोहित सराफ, अभिनेत्री पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नायला गरेवाल यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. या चारही कलाकारांच्या वेस्टर्न लूकवरून पुन्हा एकदा कॉलेजमधील तरुणांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असा अंदाज येतोय. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत हा सिनेमा पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत, अशा कमेंट्स केल्या. रोहित यात राघव, पश्मिना सान्या, जिब्रान साहिर आणि नायला रिया या भूमिकेत दिसणार आहे. २१ जून २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी इंडस्ट्रीतील सुपरिचीत दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. निपुणने या आधी नेटफ्लिक्सवर गाजलेल्या मिसमॅच्ड या हिंदी वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. तर मी वसंतराव या त्याच्या सिनेमाचंही खूप कौतुक झालं होतं.
या सिनेमाची निर्मिती रमेश तौरानी यांनीच केली असून एक वेगळी लव्हस्टोरी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.