Close

लठ्ठपणा वाढविणार्‍या 10 वाईट सवयी (10 Bad Habits That Increase Obesity)

आपल्या दिनचर्येत काही अशा सवयी असतात ज्यांचा नकळतपणे आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. तुमचं वजन योग्य काट्यावर आणण्यासाठी अशा काही वाईट सवयी जाणून घ्या आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करा.
दिवसेंदिवस किलोच्या हिशेबात वाढत जाणारं वजन लठ्ठ व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या बनते. वजन आटोक्यात आणण्यासाठी व्यायाम, आहार, चालणं या सगळ्या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिलं जातं. पण वजन काही कमी होत नाही. तुमच्या अशा अथक प्रयत्नांनीही वजन आणि लठ्ठपणा कमी होत नसल्यास तुमच्या काही सवयी नजरेखाली आणा. बघा तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल.
टी.व्ही. बघत जेवणे, पुस्तक वाचत काही खाणे, पटापट जेवणे, दोन जेवणामध्ये खूप अंतर ठेवणे या सवयी तुमचं वजन प्रमाणात ठेवण्यात अडथळा निर्माण करतात.

  1. टीव्ही बघत जेवणे
    टीव्ही बघत जेवल्याने आपलं जेवणाकडे लक्ष नसते. अशा वेळी आपण किती जेवलो आणि काय खाल्लं हे ही जाणीवपूर्वक पाहात नाही. यामुळे आपोआपच जास्त जेवण जातं. जिभेला रुचकर लागणारे तेलकट, मसालेदार पदार्थ जास्त खाल्ले जातात आणि वजन वाढते.
    नुकसान
    दिवसातून 2-3 तासांपेक्षा अधिक काळ टीव्ही पाहिल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. या काळात एकाच जागी बसून राहिल्याने शरीराची हालचाल होत नाही आणि आवश्यक त्या प्रमाणात कॅलरी खर्च होत नाहीत.
    टीव्ही वरील कार्यक्रमात आपण गुंतून जातो. यातील काही नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊन रक्तदाब आणि हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो. तसेच डोळ्यांची कार्यक्षमता कमी होते.
    काय करावे?
    टीव्ही बघताना एकाच जागी बसून न राहता शरीराची हालचाल होईल अशा कृती करत राहाव्यात. शरीराला ताण देणे, जॉगिंग, श्‍वासावर नियंत्रण ठेवणे अशा कृती केल्याने वजन घटविता येते.
  2. जास्त काळ उपाशी राहणे
    घाईघाईत ऑफिसला निघताना किंवा कामासाठी बाहेर जाताना आपण उपाशीपोटीच घराबाहेर पडतो. तसेच घरातही कामे आटपताना बराच काळ काही खाल्ले जात नाही. यामुळे शरीरातील पोषणतत्त्वे कमी होतात. जास्त काळ उपाशी राहिल्यामुळे एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. तसेच गोड पदार्थ खाण्याची इच्छा जास्त बळावते. नुकसान रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
    मेंदूला योग्य वेळेस ग्लुकोज न मिळाल्याने स्वभाव चिडचिडा होतो.
    बराच वेळ उपाशी राहून नंतर जेवल्याने पित्त, आळस अशा तक्रारी उद्भवतात.
    काय करावे?
    जेवण नियमित वेळेवरच घ्यावे आणि रोजचा आहार प्रमाणबद्ध असावा.
  3. पटापट जेवणे
    अन्न नीट न चावता घाईघाईने तसेच खाल्ले जाते. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. असे खाल्ल्याने तुम्ही काय खात आहात, याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचत नाही. यामुळे पोट भरले आहे की नाही हे समजण्याआधीच गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते.
    नुकसान
    पचनशक्तीवर परिणाम होतो पोटाच्या तक्रारी उद्भवतात
    काय करावे?
    जितकी भूक आहे, त्याच प्रमाणात अन्न सेवन करावे. जेवताना कोणतेही काम करू नये. जेवल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा भूक लागल्यास फळ वा दूध असा आहार घ्यावा.
  4. न्याहारी न करणे
    रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या न्याहारीपर्यंत 8 ते 12 तासांचे अंतर असते. या काळात मेंदू आणि स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. यामुळे सकाळचा नाश्ता न करता केवळ एक कप कॉफी वा चहा घेतल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.
    नुकसान
    पचनशक्ती कमजोर होते.
    कॅलरीमध्ये घट होण्याऐवजी वाढतात
    शरीराची ऊर्जा क्षमता कमी होते.
    काय करावे?
    सकाळचा नाश्ता व्यवस्थित करावा. दिवसभरातील आहाराच्या तुलनेत सकाळच्या नाश्त्यामध्ये जास्त उष्मांक असलेले पदार्थ खावेत.
  5. आवश्यक झोप न घेणे
    रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे, असा झोपेबाबत क्रम ठेवल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. झोपेचा चयापचय क्रियेवर परिणाम होऊन वजन संतुलित राहत नाही.
    नुकसान
    रात्रीचे जेवण नीट पचत नाही.
    निद्रानाशाचा विकार जडतो.
    ऊर्जा क्षमता कमी होते.
    मेंदूला आराम न मिळाल्याने नैराश्य येऊ शकते.
    काय करावे?
    रोजच्या कामामध्ये नियमितता पाळावी. यामुळे सर्व काम योग्य वेळी होऊन झोप पूर्ण होण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ उरतो. आपल्या शरीराला 7-8 तासांची झोप आवश्यक असते.
  6. जंक फूड खाणे
    लठ्ठपणा वाढण्याचे जंक फूड हे महत्त्वाचे कारण आहे. अशा पदार्थांमध्ये कॅलरी जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन वाढण्यास मदतच होते.
    नुकसान
    हृदयविकार उद्भवण्याची शक्यता वाढते.
    शरीरातील नाना विकारांचे मूळ अशा पदार्थांमध्ये दडलेले असते. संसर्गजन्य आजारांपासून मधुमेह, रक्तदाब असे आजारही यामुळे मागे लागतात.
    काय करावे?
    जंक फूड शक्यतो टाळावे. पण टाळणे शक्य नसल्यास याबाबत काटेकोरपणा बाळगायला हवा. जसे, आठवड्यातून एकदाच जंक फूड खाणे, तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेल्या, बेक केलेल्या पदार्थांना पसंती देणे इत्यादी.
  7. जेवल्यानंतर लगेच झोपणे
    रात्रीचे जेवण उशिरा घेण्याची अनेकांना सवय असते. उशिरा जेवून लगेच झोपल्याने अन्न नीट पचत नाही आणि शरीरात मेदाचे प्रमाण वाढते. ज्यामुळे वजन वाढत राहते.
    नुकसान
    अन्न नीट न पचल्याने गॅसेस, अ‍ॅसिडीटी अशा समस्या उद्भवतात.
    काय करावे?
    जेवल्यानंतर थोडा वेळ चालावे. ज्यामुळे अन्न नीट पचण्यास मदत होते.
  8. तणावामुळे जास्त खाणे
    काही व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली असतात. अशा व्यक्ती तणावग्रस्त अवस्थेत जास्त खातात. ज्यामुळे वजन वाढते.
    नुकसान
    हाय कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि आतड्याचे विकार होण्याची शक्यता यामुळे वाढते.
    काय करावे?
    तणावग्रस्त अवस्थेत जास्त खाऊन आपला राग व्यक्त करण्याऐवजी व्यायाम करावा. यामुळे शरीराचा व्यायाम होऊन रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक शांतताही अनुभवास येते.
  9. मद्यपान करणे
    कधी कधी संतुलितआहार आणि योग्य व्यायाम करूनही वजन कमी होण्याऐवजी वाढतच राहते. याचे मुख्य कारण आहे, जास्त कॅलरी असलेल्या मद्याचे सेवन करणे.
    नुकसान
    यकृताच्या कार्यावर परिणाम होतो.
    हृदयविकाराची शक्यता वाढते.
    मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होऊन विविध आजार होऊ शकतात.
    काय करावे?
    मद्यपान वर्ज्य करावे.
  10. सतत एका जागी बसून काम करणे
    एका जागी बसून काम केल्याने शरीराची हालचाल होत नाही आणि वजन वाढले जाते. कार्यालयात किंवा घरी शारीरिक हालचाल होईल अशी कामे टाळल्याने लठ्ठपणा वाढण्यास मदत होते.
    नुकसान
    शरीरातील मेदाचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत राहते.
    मधुमेह होण्याची शक्यता वाढते
    हृदयविकार संभवतात
    वजन वाढत राहिल्याने पाठीच्या कण्यावर परिणाम होतो.
    काय करावे?
    कार्यालयात वा घरी एका जागी बसून काम करावे लागत असले तरीही मधे मधे उठून शारीरिक हालचालीला प्राधान्य द्यावे. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा.

Share this article