बजरंगी भाईजान या सिनेमातून लोकप्रिय झालेली मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा सध्या सिनेमापासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मात्र सध्या हर्षाली वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हर्षाली अनेकदा ट्रोलची शिकार झाली आहे. पण आता हर्षालीने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत तिचा दहावीचा निकाल चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
हर्षाली मल्होत्राने ट्रोलर्सचे स्क्रीनशॉट शेअर करत व्हिडिओ शेअर केला आणि शेवटी तिला १० वीत ८३ टक्के गुण मिळाले असल्याचे सांगितले. क्लिपसोबतच्या कॅप्शनमध्ये, हर्षालीने लिहिले की, माझ्या मुद्रांमध्ये सुधारण्यापासून ते माझ्या शिक्षणात प्रभुत्व मिळवण्यापर्यंत, मी माझे कथ्थक वर्ग, शूट आणि अभ्यास यांच्यात योग्य संतुलन राखण्यात यशस्वी झाले आहे. आणि याचाच परिणाम? ८३ % स्कोअर! कोण म्हणतं की रील आणि खऱ्या आयुष्यात आपण भक्कमपणे पाय रोवू शकत नाही? ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांचे अतूट सहकार्य दिले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी हर्षालीचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच बजरंगी भाईजान २ येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यात मुन्नी असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.