मालिका, सिनेमा यांमधून आपल्या अभिनयाने मन जिंकणाऱ्या प्राजक्ता माळीच्या अंगी नाना कळा असल्याचे तिने आधीच दाखवून दिले आहे. तिचे प्राजक्तराज देखील प्रचंड लोकप्रिय आहे. आता प्राजक्ता सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. प्राजक्ता माळीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हा फोटो काही कालावधीतच इंटरनेटवर व्हायरल होताना दिसला. प्राजक्ताची ही पोस्ट नेमकी काय आहे याविषयी अधिक जाणून घेऊया.
प्राजक्तानं शेअर केलेल्या फोटमध्ये ती काहीतरी महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करतेय. मोठं हास्य करत ती हे कागदपत्र सही करत आहे. फोटो शेअर करत प्राजक्तानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘खूप आवडत्या आणि खूप बहुप्रतिक्षित अशा कागदपत्रांवर २७ एप्रिल २०२४ ला सही केली’. पुढे प्राजक्तानं कंसात लिहिलं की, ही विवाह नोंदणी अजिबात नाहीये.
तर दुसऱ्या फोटोमधील सिनेमाच्या लक्षवेधी मोशन पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तिने तिच्या सिनेमाची घोषणा केली. फुलवंती असं प्राजक्ताच्या या आगामी सिनेमाचं नाव असून प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर प्रवीण दरडे यांनी या सिनेमाचं संवाद लेखन केलं आहे.
प्राजक्तानं या सिनेमाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताच चाहते अन् सेलिब्रिटी मित्रांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या गाजलेल्या फुलवंती या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित हा सिनेमा असून पेशवेकालीन महाराष्ट्रातील लावणीची कला आणि एक सुंदर प्रेमकथा या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. परंतु फुलवंती कोण साकारणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये.