अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाविरोधात अजमेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'जॉली एलएलबी ३' चित्रपटात न्यायालयीन प्रतिष्ठेला कलंक लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अजमेर जिल्हा बार असोसिएशनने 'जॉली एलएलबी 3'चे शूटिंग थांबवण्यासाठी अजमेर उत्तर दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरोधात वकील आणि न्यायाधीशांची खिल्ली उडवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने न्यायालयाला नोटीस बजावण्याची विनंतीही केली आहे.
वकिलांनीच केली तक्रार
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंग राठोड म्हणाले, 'जॉली एलएलबीचा पहिला आणि दुसरा भाग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते देशाच्या राज्यघटनेतील न्यायव्यवस्थेची मान आणि प्रतिष्ठेचा बिलकुल सन्मान करत नाही असे दिसते. अजमेरच्या डीआरएम कार्यालयासह आजूबाजूच्या गावांमध्ये आणि परिसरात जॉली एलएलबी ३ चे शूटिंग सुरू आहे, जे पुढील काही दिवस सुरू राहिल. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही या चित्रपटातील कलाकार न्यायाधीशांसह न्यायव्यवस्थेची प्रतिमा, प्रतिष्ठा आणि सन्मान याबाबत अजिबात गंभीर असल्याचे दिसत नाही.