कॉमेडियन कपिल शर्मा याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नुकताच नेटफ्लिक्सवरून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागला आहे. या शोच्या नव्या भागात सनी देओल आणि बॉबी देओल ही जोडी हजेरी लावताना दिसणार आहे. नुकतचे याचे काही खास व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये सनी देओलच्या बोलण्यावर बॉबी देओल याच्या डोळ्यांतून पाणी येताना दिसले आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल याचा 'गदर २' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर बॉबी देओलचा 'अॅनिमल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटही हिट ठरला होता. सनी देओलने या यशाचे श्रेय त्याची सून द्रिशा आचार्य हिला दिलं आहे. कपिल शर्माचा नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये खुद्द अभिनेत्यानेच याचा खुलासा केला आहे.
अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये पाहुणे म्हणून पोहोचले होते. शोदरम्यान कपिल शर्माने देओल ब्रदर्ससोबत खूप मस्ती केली. तसेच, अनेक रंजक किस्से शेअर केले. मात्र, शोदरम्यान झालेल्या संभाषणात दोन्ही भाऊ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना सनी देओल पुढे म्हणाला, 'माझे वडील धर्मेंद्र १९६०पासून इंडस्ट्रीत आहेत. मी आणि बॉबीही लाइमलाइटमध्ये आहोत. या काळात आयुष्यात अनेक गोष्टी आल्या आणि गेल्या. पण, काही गोष्टी नीट होत नव्हत्या. मात्र, यावेळी कमाल झाली. आम्हाला लोकांचे प्रेम मिळत आहे. आमची मुलगी आमच्या घरी आली आहे, त्यानंतर ‘गदर २’ आला आणि त्याआधी बाबांचा एक चित्रपट आला. नंतर बॉबीचा चित्रपट आला आणि सगळे सुपरहिट झाले. मला वाटते की तिच्या रूपाने यश आमच्या घरी आले आहे.’ सनी देओलचा मुलगा करण देओल याने द्रिशा आचार्यसोबत लग्न केले आहे. गेल्या वर्षी १८ जून २०२३ रोजी दोघांचे लग्न झाले होते.
दुसरीकडे, सनी देओलचे हे बोलणे ऐकल्यानंतर बॉबी देओल खूप भावूक झाला. मात्र, सनी देओल इथेच थांबला नाही. तो पुढे म्हणाला की, 'जेव्हा 'अॅनिमल’ आला, तेव्हा सगळं काही बदलून गेलं. आता आम्हाला लोकांचे खूप प्रेम मिळत आहे.’ विशेष म्हणजे सनी देओलचा 'गदर २' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता, जो सुपरहिट ठरला होता. तर 'ॲनिमल' गेल्या वर्षीचा ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील बॉबी देओलच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे.