बॉलिवूड गायक नेहा कक्कर आणि अभिजीत भट्टाचार्य यांच्यात 'सुपरस्टार सिंगर 3' (Superstar Singer 3) च्या मंचावर जोरदार शाब्दिक युद्ध पाहण्यास मिळालं.
बॉलिवूड कलाकार, गायक यांनी लग्नसोहळ्यांमध्ये सादरीकरण करणं ही तशी काही नवीन बाब नाही. पण एखाद्या कलाकाराने अशाप्रकारे लग्न किंवा इतर कार्यक्रमात परफॉर्म करावं की नाही याबाबत अनेकदा चर्चा झाली आहे. एकीकडे अक्षय कुमार, शाहरुखसारखे मोठे कलाकार अशा कार्यक्रमांची सुपारी घेत असताना अजय देवगणसारखे कलाकार मात्र यासाठी नकार देतात. जुन्या काळात राजांसमोर नाचणारे सेवक आपण नाही असं तो जाहीरपणे सांगतो. नुकतंच अंबानींच्या लग्नात रिहानासारख्या आंतरराष्ट्रीय कलाकरांसह दिलजित, मिल्खा सिंग यांनीही सादरीकरण केलं होतं. दरम्यान नुकतंच या मुद्द्यावरुन बॉलिवूड गायक नेहा कक्कर आणि अभिजीत भट्टाचार्य यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. 'सुपरस्टार सिंगर 3' (Superstar Singer 3) च्या मंचावर त्यांच्यात शाब्दिक युद्ध पाहण्यास मिळालं. लग्नात गाणी गाण्यावरुन अभिजीत यांनी टीका केल्यानंतर नेहा कक्करने त्यांना उत्तर दिलं.
'सुपरस्टार सिंगर 3' मध्ये अभिजीत भट्टाचार्य पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अभिजीत भट्टाचार्य नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आपल्या याच स्वभावामुळे त्यांची काही विधानं वादग्रस्त ठरली आहेत. दरम्यान या रिअॅलिटी शोमध्ये अभिजीत भट्टाचार्य आणि नेहा कक्कर यांच्यात लग्नात परफॉर्म करण्यावरुन शाब्दिक वाद झाला.
अभिजीत भट्टाचार्य आणि नेहा कक्कर यांच्यातील शाब्दिक वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अभिजीत भट्टाचार्य लग्नात गाणी गाण्यासाठी पैसे स्विकारणे आणि नाकारणे यात मोठा फरक असल्याचं सांगत आहे. तर नेहा कक्कर यावर उत्तर देताना कोणतंही काम छोटं आणि मोठं नसतं असं सांगत जर एखाद्याला पैशाला कमवायचे असतील तर लग्नात परफॉर्म करु शकतात असं म्हणते. यामध्ये काहीही चुकीचं नसल्याचं मत तिने मांडलं आहे.
अभिजीत भट्टाचार्य यावेळी म्हणाले की, "कोणीतरी पैसे दिले म्हणून आपण गाऊ लागलो तर औकात कमी होते. माझी औकात असल्याने मी गाणार नाही असं सांगतो. जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला खरेदी करु शकत नाही. तुम्ही माझं बोलणं वैयक्तिक घेऊ नका, हाच फरक आहे. मीदेखील या मुलाला शिक्षणच देत आह. १ कोटी रुपयांसाठी गाणं आणि १ कोटी नाकारणं यात खूप फरक आहे. मला फक्त इतकंच शिकवायचं आहे".
यावर उत्तर देताना नेहा कक्कर सांगते की, "तुम्ही तुमच्या मेहनतीने कमवा. मेहनत केली तर तुम्ही कसेही पैसे कमावू शकता. लग्नात गाणं चुकीचं नाही. चाहत्यांना तुम्ही आवडत असता, त्यामुळे ते तुम्हाला बोलवतात. काम मोठं किंवा छोटं नसतं. जर तुम्हाला लग्नात गावे लागले तर नक्की गा. जर तुम्हाला आदर मिळत असेल, प्रेमाने बोलवत असतील तर कृपया जा. लग्नात गाणं चुकीचं नाही. लोकांच्या गरजा असतात. आता मी सुपरस्टार झाली असल्याने मला ऐषोआरामाच्या आयुष्याची सवय झाली आहे".
नेहा कक्कर आणि अभिजीत भट्टाचार्य यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर नेटकरीही आपलं मत मांडत आहेत