अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपी अनुज थापनने आत्महत्या केली होती. आता या आत्महत्येनंतर केलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मानेवर जखमा आणि गुदमरल्याच्या खुणा होत्या. मात्र, आरोपी अनुज थापनच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आणि 'पोलीस कोठडीत छळ करून त्याची हत्या करण्यात आली' असा दावा केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'गुरुवार, २ मे रोजी सायंकाळी भायखळा येथील शासकीय जेजे रुग्णालयात अनुज थापनचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानुसार, मानेवर जखमेच्या खुणा आणि गुदमरल्याच्या खुणा होत्या, ज्यावरून त्याचा मृत्यू फाशीमुळे झाल्याची स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेप्रकरणी अनुज थापन, सोनू बिश्नोई, शूटर सागर पाल आणि विकी गुप्ता यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांना वॉन्टेड आरोपी घोषित केले आहे.
त्यांनी सांगितले की, ज्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले त्यांनी त्यांचे मत राखून ठेवले आहे. अनुज थापनचा व्हिसेरा आणि इतर नमुने फॉरेन्सिक आणि रासायनिक विश्लेषणासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, तर अवयव हिस्टोपॅथॉलॉजीसाठी ठेवण्यात आले आहेत. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'लॉक-अप सीसीटीव्ही फुटेजमध्ये थापन एकटाच टॉयलेटमध्ये जाताना दिसत आहे. त्यामुळे हे पूर्णपणे आत्महत्येचे प्रकरण आहे.
दरम्यान, अनुज थापनचे आजोबा जशवंत सिंग (५४) हे दोन नातेवाईक आणि एका वकिलासह पंजाबमधून पहाटे मुंबईत पोहोचले आणि त्यांनी अनुजच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी नकार दिला. तसेच त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. जशवंत सिंह म्हणाले, 'आम्हाला मृतदेहाचा ताबा घेण्यास सांगितले होते. आमच्या विनंतीवरून हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला त्याचा चेहरा दाखवला तेव्हा आम्हाला मानेवर जखमेच्या खुणा आढळल्या. या खुणा पाहता, अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे आम्हाला वाटते.
ते पुढे म्हणाले, 'सीबीआय तपासाची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही. मागण्या मान्य झाल्यास उद्यापर्यंत मृतदेह ताब्यात घेऊ. सीबीआय चौकशी होऊन मृत्यूशी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याने सांगितले की, पोलिसांनी १ मे रोजी दुपारी ३ वाजता थापनच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी फोन केला होता.