देहमीलनात मोठं सुख आहे. अपार आनंद आहे. अन् तो दोघांनाही आयुष्यभर मनमुराद उपभोगायचा आहे. हे लक्षात ठेवले तर भावी वैवाहिक जीवनाचा पाया भक्कम होईल.
लग्नाची तारीख जवळ आली की, वधूच्या हृदयाची धडधड जास्त वाढते. एकतर ज्याच्या हातात हात द्यायचा आहे, तो आयुष्यभर कशी साथ देईल, ह्याचा विचार डोक्यात असतो. अन् मधुचंद्राच्या पहिल्या रात्री सगळं काही नीट निभावेल की नाही, ह्याची देखील शंका मनात असते. मधुमीलनाच्या पहिल्या रात्रीबद्दल औत्सुक्य असते नि अधीरताही असते. आपला प्रेमविवाह असेल तर ह्या अधीरतेचे प्रमाण कमी असते. कारण प्रेमाच्या दिवसात दोघांना एकमेकांचा सहवास लाभला असतो. हातात हात गुंफले गेले असता, त्यामुळे शरीरस्पर्श झाला असतो. काही प्रेमवीरांनी
चुंबन-आलिंगनापर्यंत मजल मारली असते. परंतु ज्यांचे अॅरेंज मॅरेज असते, त्यांना एकमेकांना स्पर्श करण्याची, मनोभावना समजून घेण्याची फारशी संधी मिळालेली नसते. अशा जोडप्यांमधे पहिल्या रात्रीबाबत औत्सुक्य नि अधीरता मोठ्या प्रमाणात असते. अन् आपल्याकडे ठरवून केलेल्या लग्नांचे प्रमाण अजूनही प्रेमविवाहांपेक्षा जास्तच आहे. असं असलं तरी मधुचंद्राच्या रात्रीबद्दल गोंधळाची परिस्थिती राहू नये, म्हणून थोडंफार ज्ञान मिळवलं, तरी बस्स झालं.
अनुपम आनंद
निसर्गनियमानुसार पुरुष हा लैंगिकतेच्या बाबतीत स्त्रीपेक्षा अधिकच आक्रमक असतो. कारण त्याला मिसरूड फुटण्याच्या वयातच लैंगिक उद्दीपन होत असते. अगदी 13-14 व्या वर्षातच त्याच्या मनात वैषयिक भावना निर्माण होतात. परिस्थितीनुसार आणखी किमान 10 वर्षांनी तो लग्नवेदीवर चढतो, तेव्हा त्याच्या लैंगिक भावना उफाळून आलेल्या असतात. म्हणून मीलनाच्या पहिल्या रात्री बव्हंशी पुरुष शरीरसुख मिळवण्याची एकप्रकारे जबरदस्तीच करतात. अन् निसर्गतः लाजाळू, संकोची, सहनशील असलेली स्त्री निमूटपणे त्या जोरजबरदस्तीचा स्वीकारही करते. गावाकडील अशिक्षित स्त्री तर शरीरावरचाच काय,पण मनावरचा जुलूमदेखील सहन करण्याठी आपला जन्म आहे, या भावनेनं (की शिकवणीनं?) हा मामला स्वीकारते. सगळेच पुरुष असे आक्रमक होत असतील, असं नाही. अन् सगळ्याच स्त्रिया अशा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतील, असंही नाही. परंतु पहिल्या रात्रीचे सुख अशाच प्रकारे देण्याघेण्याकडे बव्हंशी स्त्री-पुरुषांचा कल असल्याचे दिसून येते. तेव्हा अशा आक्रमक पुरुषांनी सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की, आपल्याला नवपरिणीत पत्नीकडून मिळविण्याचे आणि देण्याचे शरीरसुख हे तिच्या कलाने घ्यायला हवे. नववधूला मानाने जिंकलं तर तिचं शरीर तयार होईल. अन् तिची मानसिक व शारीरिक तयारी हीच दोघांनाही शरीरसुखाचा अनुपम आनंद देईल. देहमीलनात, समागमात मोठं सुख आहे, अपार आनंद आहे. अन् तो दोघांनाही आयुष्यभर मनमुराद उपभोगायचा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. पुरुषांस जर हे समजत नसेल, स्त्रीने त्याला विश्वासात घेऊन समजावून दिले पाहिजे.
आपल्याकडे मुळातच अॅरेंज मॅरेजेसचं प्रमाण जास्त असल्या कारणाने लग्नाआधी एकमेकांची मनं समजून घेण्याची संधी मिळत नाही. एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी ह्यांची माहिती नसते. आपल्या जोडीदाराच्या वागण्याबोलण्याचा काहीच अंदाज नसल्याने, आपण कसे वागू, ह्याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली असते. जोडीदाराने जर त्याचा भंग केला, तर निराशा पदरी येते. ती टाळण्यासाठी कल्पनेचं चित्र न रंगवता, दोघांनीही मनाची पाटी कोरी ठेवून एकत्र यावे. अन् त्यावर परस्पर सामंजस्याने संसाराचे, शरीरसुखाचे चित्र रेखाटावे. हे चित्र सुंदर, सुस्पष्ट दिसावे म्हणून मधुचंद्राच्या पहिल्या रात्री शरीरसुख उपभोगावे, हा विचार पहिल्यांदा सोडून द्या. मधुचंद्र साजरा करण्यासाठी आपण निवांत जागी, परगावी, परदेशी जातो. तिथे काही दिवस वास्तव्य असतेच की. लग्नविधी, नातेवाईकांचा गलबला यातून पहिल्यांदाच निवांतपणा मिळाला असतो. त्याचा उपयोग एकमेकांना समजून घेण्यासाठी करा. एकमेकांची मने जिंका म्हणजे शरीरमीलन सुखकर होईल. कुणी सांगावं, मनाच्या तारा पहिल्याच रात्री जुळतील, अन् दुसर्याच रात्री देह एकमेकांत मिसळतील. शिवाय लग्नविधीची दगदग, शीण अंगातून आधी निघायला तरी हवा ना! त्यासाठी घरापासून दूर, मोकळ्या हवेत आल्यावर आधी त्या मोकळेपणाचा आस्वाद घ्या नि मग मुक्तपणे शरीरसुखाचा आनंद घ्या.
मनोमीलनाकडे लक्ष द्या
आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने कामक्रिडेबाबत बरेचसे अज्ञान आढळून येते. अज्ञानातून अपसमज आणि गैरसमजुतीही निर्माण होतात. परंतु मुळातच ज्ञान नसल्याने अपसमज व गैरसमज कोणते नि खरे ज्ञान कोणते, हेच बर्याच स्त्री-पुरुषांना कळत नाही. त्याच्यामुळे देह एकमेकांत गुंततात व तेव्हा बर्याच अडचणी येतात. पहिल्या रात्री उभयतांची कामोत्तेजना वाढली असते. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर अनावर झालेल्या विषयवासना दडपलेल्या असतात. त्यांना वाट मोकळी करून देण्यास पुरुष उतावीळ झाले असतात. त्याचबरोबर आपण पत्नीस तृप्त करू शकू की नाही, याचे अनामिक दडपण त्यांच्या मनावर असते. तर कित्येक स्त्रियांच्या मनात प्रथम संभोगाची धास्ती असते. वेदना होतील का? कितपत होतील? योनीमार्गातून रक्तस्त्राव होईल का? लगेच मला दिवस जातील का? असे प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले असतात. कथा-कादंबर्यातून वाचलेली प्रणय-शृगाराची वर्णने किंवा सिनेमातून पाहिलेली सुहाग रात त्यांच्या मनात उतरली असते. तसलं काही करण्यापेक्षा दोघांनीही मनोमीलनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आपण दोघेही मनाने व शरीराने शांत, निवांत समागमासाठी तयार होईपर्यंत थांबायला हवे. अगदी पहिल्याच रात्री कामक्रीडा केली नाही म्हणून काही बिघडत नाही. परस्परांमध्ये प्रेमभावना आणि सन्मानाची भावना वाढीस लागली तर भावी वैवाहिक जीवनाचा पाया भक्कम होईल.
सेक्ससंबंधात उतावीळ असलेल्या पुरुषांनी बरेच स्वप्नरंजन केले असते. त्याचा परिणाम कधी कधी उलटा होतो. पहिल्या रात्री घाई केल्याने शीघ्रपतन होते अन् मनात अपराधी भावना निर्माण होते. हे टाळण्याआधीच आधी सांगितल्याप्रमाणे पहिली रात्र म्हणजे समागम केलाच पाहिजे, ही समजूत काढून टाकत, मन शांत ठेवून पत्नीस विश्वासात घेऊन त्या कामाकडे वळले पाहिजे. त्याचप्रमाणे स्त्रियांनी देखील पहिल्या समागमाच्या वेळी वेदना, रक्तस्त्राव यांची भिती मनातून काढून टाकली पाहिजे. कारण हा अनुभव, ही क्रिया आपल्या लैंगिक अवयवास नवी असल्याने ह्या गोष्टी घडणारच, अशी मनाची तयारी ठेवली पाहिजे. त्यांचा बाऊ करण्याची, भिती बाळगण्याची काहीच गरज नाही.