Close

आवळ्याचे लोणचे व मिक्स भाज्यांचे लोणचे (Amla Lonche And Mix Vegetable Lonche)

आवळ्याचे लोणचे
साहित्यः 5 मोठे आवळे, 2 चमचे मोहरी, 4 चमचे दही, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, अर्धा चमचा तेल, पाव चमचा हिंग, हळद.
कृतीः आवळे उकडून त्यांच्या आवडीनुसार फोडी कराव्यात. मिरची, मोहरी बारीक वाटून फेसावे. हे वाटण दह्याला लावावे. त्यातच आवळ्याच्या फोडी, मीठ, साखरही घालावी. तेलाची हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. ही फोडणी गरम असतानाच लोणच्यावर घालावी. दही घातलेल्या ह्या लोणच्याची रुची काहीशी वेगळीच आहे. पण हे लोणचे दोन-तीन दिवसच टिकते.

मिक्स भाज्यांचे लोणचे
साहित्यः 400 ग्रॅम सलगम, 300 ग्रॅम गाजर, 300 ग्रॅम कोबी, 100 ग्रॅम लहान कांदे, 50 ग्रॅम लसूण, 50 ग्रॅम मोहरी, 50 ग्रॅम आले, 25 ग्रॅम तिखट, 25 ग्रॅम हळद, 50 गॅ्रम चिंच, 100 ग्रॅम गूळ, 50 ग्रॅम मेथी-दाणे, 10 ग्रॅम कलौंजी, 10 ग्रॅम बडिशेप, 1 चमचा हिंग, 10 ग्रॅम धणे, 300 ग्रॅम मोहरीचे तेल, 10 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड.

कृतीः सलगम सोलून बारीक तुकडे करावेत. गाजराच्या चकत्या करून पाण्यात टाकाव्यात. कोबी अगदी बारीक चिरावा. कांदे सोलून घ्यावे. ह्या सर्व भाज्या पाण्यात टाकून पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवाव्यात. पाच मिनिटांनी पाण्यातून काढून कापडावर सुकवाव्यात. स्टीलच्या पातेल्यात सुकलेल्या भाज्या घालून त्यात मीठ, हिंग, हळद, मोहरीपूड, आल्याचे तुकडे, मिरच्यांचे तुकडे घालावे व नीट ढवळून घ्यावे. नंतर हे सर्व काचेच्या बरणीत घालून त्यास दादरा बांधून पाच दिवस उन्हात ठेवावे. रोज संध्याकाळी भाज्या हलवाव्यात. पाच दिवसांनंतर बडिशेप, कलौंजी, मेथी, धणे हे सर्व भाजून पूड करून घालावे. चिंच कोळून घालावी. गूळ घालावा. तसेच तिखट व लसूण वाटून घालावे. सर्व जिन्नस नीट कालवावेत. आता त्यात अर्धा चमचा अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड घालावे व परत पाच दिवस बरणी उन्हात ठेवावी.

Share this article