Close

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवाले
कुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही केल्या कमी होईना. लोकलच्या आवाजाच्या धडधडीत त्याच्या हृदयाची धडधड मिसळली. स्टेशन जात होते. गर्दी जरा कमी झाली. गाडी थांबली. सगळेच उतरू लागले म्हणून सहज त्याने बाहेर पाहिलं. बघतो तर शेवटचं सी.एस.टी. स्टेशन आलं होतं.


सकाळी पाचलाच अभय गावाहून परतला होता. आईबाबांच्या पश्‍चात गावच्या शेतीकडे लक्ष द्यायला अधूनमधून त्याला गावी जावं लागायचं. गावी घरही होतं. त्याचीही साफसफाई करावी लागायची. इतर वेळी चुलते लक्ष ठेवून असायचे. तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसानं गावीही हजेरी लावल्याने मनातून तो सुखावला होता. त्याचा तो खुशीचा मूड त्याला वाढवणार्‍या रमाकाकीलाही जाणवला. काकी म्हणालीही, “काय रे, चार दिवस गावी काय गेला, फ्रेश होऊन आलास?”
“गावचं पाणीच तसं असतं ना
आणि यावेळी पाऊस चांगला होता. सार्‍या शिवारावरची धूळ मस्त धुऊन निघालीय. हळूहळू अवघ्या धरेला हिरवा रंग चढेल काही दिवसात. हां, एक मात्र खरं… चकाचक रस्त्यांमुळे गल्ल्यागल्ल्यांमधे खळाळणारे ओहोळ आता दिसेनासे झालेत. पत्र्याच्या धारेतून टपटपणार्‍या पागोळ्याही सिमेंटच्या जंगलाने लुप्त झाल्या आहेत.”
“अरे वेड्या, हे आता असंच व्हायचं.”
“खरंय ते. बरं, आणखी किती वेळ आहे चहाला?”
“झालाच बघ. पण आज इतकी घाई का रे?”
“दहा-बारा दिवसांपूर्वी मी जिथे इंटरव्ह्यू दिला होता ना, त्यांचा परवा फोन आला होता. कुरिअरने तसं लेटरही पाठवलंय म्हणे त्यांनी.”
“बरी आठवण केलीस?” असं म्हणून काकींनी आलेलं कुरिअर त्याला दिलं.
“काय लिहिलंय?”
“तेच. फायनलसाठी बोलवलंय त्यांनी आज. मी आणि एक दुसरा कॅण्डिडेट आहे. दोघांमधून एकाची निवड करणार आहेत. काकी, ही तरी नोकरी मिळायला हवी. तीन महिने झाले, पण नोकरीसाठीची ही वणवण संपता संपत नाहीये. शिफारसीशिवाय नोकरी मिळवणं म्हणजे कसरतच.”
“मिळेल. तुलाच मिळेल ही नोकरी. माझं मन सांगतंय… तुझीच निवड होणार.” काकी मनापासून बोलली.
“बघू, साडेदहाला बोलवलंय त्यांनी. दहा-सव्वादहापर्यंत पोहचायला हवं. त्यात पहाटेपासूनच हा पाऊस सुरू झालाय.” रिपरिप पडणार्‍या पावसाकडे त्याची नजर गेली.
“हे घे ठेव.” असं म्हणून काकींनी त्याला शंभराची नोट दिली.
“सुटे आहेत माझ्याजवळ, तीसेक रुपये.”
“त्याने काय होणारेय? ठेव हे.” असं म्हणत काकींनी जबरीनं त्याच्या खिशात नोट कोंबली. भरल्या डोळ्यांनी त्याने काकींकडे पाहिलं. काकींनी त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला.
“येतो मी.” खिशातली नोट सारखी करत घाईघाईतच तो बाहेर पडला.
कॉलनीतच शेअर रिक्षा मिळाल्याने त्याने सुटकेचा निश्‍वास सोडला.
तो बसल्या बसल्या रिक्षा स्टेशनच्या दिशेने धावू लागली.
“पावसाचा रंग आज काही ठीक दिसत नाहीये.”
“कोसळू द्या त्याला. काल-परवापर्यंत सार्‍यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं त्यानं.” त्याच्या आधी रिक्षात बसलेल्या दोघा सहप्रवाशांच्या गप्पा सुरू होत्या.
“पिकनीकच्या मूडमधे कोसळणारा पाऊसही अंगावर झेलणारे आपण, त्याच्या रिमझिमण्यानं लोकलची
ट्रॅक पाण्याखाली गेली, ऑफिसची
वाट जरा ओली झाली की त्याला शिव्या देतो.”
“खरं नाही तर काय? प्रत्येकाला वाटतं पाऊस आपल्याच मर्जीप्रमाणं पडावा.” त्यांच्या गप्पा रंगात
आल्या होत्या.
एवढ्यात ‘धडधडधडधड’ असा विचित्र आवाज करत रिक्षा मधेच थांबली. रिक्षावाल्यालाही कळेना अचानक काय झालं ते. दोन-चार मिनिटं त्याने आवाजाचा वेध घ्यायचा प्रयत्न केला. शेवटी, सॉरी, तुम्ही दुसरी रिक्षा करून घ्या, असं ओशाळून म्हणाला.
डॉ. परांजपेंच्या हॉस्पिटलसमोर रिक्षा बिघडली होती. तिथून स्टेशन तसं लांबच. नाइलाजानं तिघं खाली उतरले. उतरल्या उतरल्या अभयने समोर पाहिलं. अन् तो बघतच राहिला.
एक स्मार्ट तरुणी रिक्षाची वाट पाहात उभी होती. डार्क लायलॅक चुडीदार, लायलॅक कलरचाच कुर्ता, अन् त्याच रंगाची मॅचिंग छत्री. जबरदस्त कॉम्बिनेशन होतं! उभी राहण्याची तिची ढब नृत्यात पारंगत असलेल्या एखाद्या नर्तिकेसारखी होती. तिच्या चेहर्‍यावरचा उत्साह
जणू पावसाच्या थेंबाथेंबात मिसळला होता.

पहाटेच्या मधुर स्वप्नात गालांवर मोरपीस फिरल्यासारखं त्याला वाटलं.
दुसर्‍या रिक्षाची वाट पाहत तिच्या बाजूलाच ते तिघं उभे राहिले. रस्ता रहदारीचा असल्यानं त्या अनामिकेचं सौंदर्य त्याला फार वेळ न्याहाळता आलं नाही. काही मिनिटातच दुसरी रिक्षा समोर उभी राहिली. बाकी दोघं सहप्रवासी व ती पटकन मागील सीटवर बसले. तिच्याकडे बघण्याच्या नादात तो रिक्षात बसायचंच विसरला.
“भाईसाब, स्टेशन?” रिक्षावाल्यानं त्याला विचारलं. तेव्हा त्याची तंद्री
भंग पावली.
“हां हां.” घाईघाईतच तो उत्तरला. अन् पुढे रिक्षावाल्याच्या बाजूला बसला. खरं तर तिच्या बाजूला बसायला मिळालं नाही म्हणून त्याचं मन जरा खट्टू झालं. पण जेव्हा रिक्षाच्या आरशातलं तिचं प्रतिबिंब त्याच्या नजरेस पडलं तेव्हा त्याच्याही मनात रिमझिम होऊ लागली. नजरेसमोर आलेल्या बटा सावरताना तो आपल्याकडेच बघतोय हे बहुधा तिच्याही लक्षात आलं. तिनेही दोन-तीनदा बटा सावरल्याचा बहाणा केला. पण नजरभेटीचा तो अवीट खेळ त्याला फार वेळ खेळता आला नाही. पाच-सहा मिनिटातच स्टेशनजवळ रिक्षा पोहोचली. पैसे देऊन ती ब्रीजकडे वळली. ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्या पाठमोर्‍या छबीकडे तो बघतच राहिला.
कुणाच्या तरी धक्क्यानं भानावर आला. मिळाली ती फास्ट लोकल त्याने पकडली. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही केल्या कमी होईना. लोकलच्या आवाजाच्या धडधडीत त्याच्या हृदयाची धडधड मिसळली. स्टेशन जात होते. गर्दी
जरा कमी झाली. गाडी थांबली. सगळेच उतरू लागले म्हणून सहज त्याने बाहेर पाहिलं. बघतो तर शेवटचं सी.एस.टी. स्टेशन आलेलं.
तिच्या विचारांच्या तंद्रीत दादर स्टेशन केव्हा गेलं, त्याला कळलंच नव्हतं. हसावं का रडावं त्याला कळेना. बाजूला लागलेल्या ठाणा लोकलने पुन्हा दादरला येऊन लागलीच तो अंधेरीला पोहोचला. इथं मात्र पाऊस नव्हता. साडेदहा वाजून गेले होते. त्याला इंटरव्ह्यूला जिथं जावयाचं होतं त्या गॅमन इंडियाचं ऑफिस फार लांब नव्हतं. पण आणखी उशीर नको म्हणून खिशातल्या नोटेकडे बघत त्याने टॅक्सी केली. गर्दीला मागे टाकत टॅक्सी निघाली तेव्हा त्याने जरा हुश्श केलं. हातातली डॉक्युमेंटची फाइल त्याने पुन्हापुन्हा चाळली. दोनतीनच मिनिटं झालं असतील की, टॅक्सीवाल्याने अचानक ब्रेक दाबला.
“क्या हुआ?” त्याने ड्रायव्हरला विचारलं.
“लगता है सामने अभी अभी अ‍ॅक्सिडेंट हुआ है.”
समोर काही पावलांवरच आरडाओरड करत क्षणात भीड जमली.
“अरे बापरे, आधीच उशीर झालाय. त्यात ही गडबड.” ट्रॅफिक बघून तो वैतागला.
“साहब, अल्केम हाऊस वो वहाँ सिग्नल के बाजूमें ही है. आप पैदल जल्दी पहुचेंगे.” गर्दी लवकर हटणार नाही हे लक्षात ठेवून ड्रायव्हर म्हटला.
“ठीक है. कितना हुआ?” मीटरच्या आकड्याकडे पाहात त्याने टॅक्सीवाल्याला विचारलं.
“अठरा रुपया.”
“ये लिजिए.” पैसे देऊन त्याने टॅक्सी तिथेच सोडली.
समोरची गर्दी वाढत चालली होती.
काय झालं ते पाहावं म्हणून चार
पावलं चालून गर्दीतनं तोही आत
डोकावला. लायलॅक कलरचे कपडे
अन् छत्री दिसताच नको त्या आशंकेने तो हादरला.
ती तीच होती. सकाळी त्याला रिक्षात भेटलेली. कुणा बाईकस्वाराने तिला धडक दिली होती. तिच्या हातापायाला बरंच लागलेलं होतं. उजव्या गुडघ्याजवळ सलवार फाटून गुडघा चांगलाच घसडलेला होता. तिथलं रक्त थांबत नव्हतं. ती घाबरलेली, भांबावलेली होती. दोन बायका तिला उभे राहायला आधार देत होत्या. पण गुडघ्याला मार बसल्याने तिला उठताच येत नव्हतं. खूप वेदना होत होत्या. अभयने गर्दीवर नजर फिरवली. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, ‘बाजूला व्हा…’ म्हणत झटक्न तो पुढे झाला. तिच्या गुडघ्याला रुमाल बांधून दोन्ही हातांनी तो तिला उचलू लागला.
“अहो अहो, तिला उभं राहता येत नाहीये,” दोघी बायका त्याच्यावर ओरडल्या.
“म्हणून काय तिला इथंच बसवून ठेवणार? हॉस्पिटलला न्यायला हवं. टॅक्सी थांबवा कुणीतरी.” मॉबवर
तो ओरडला.
ती त्याच्याकडे वेड्यागत पाहत होती. तोपर्यंत कुणीतरी टॅक्सी थांबवली. तिला टॅक्सीत बसवून तोही बसला.
“इनकी पर्स और छाता…” मॉबमधून कुणीतरी म्हटलं.
“जवळ चांगलं हॉस्पिटल कुठलंय?” टॅक्सीभोवती जमलेल्यांना त्याने विचारलं.
“चार बंगल्याजवळ कोकिळाबेन.” मघाच्या त्या बायका म्हटल्या.
“तुम्ही येता सोबत?” अभयने दोघींना विचारलं. लागलीच त्या टॅक्सीत घुसल्या.
“कोकिळाबेन हॉस्पिटल. जरा जल्दी…” तो ड्रायव्हरला म्हटला.
टॅक्सी सुटली.
“बरं झालं, कसली भीडभाड न ठेवता तुम्ही हिला सरळ उचललं.” दोघींपैकी एक म्हणाली.
त्याने बोलणारीकडे बघताच,
“मी आशा देशमाने.” ती उत्तरली.
“मी उमा सानेे.” दुसरी म्हणाली.
“पाय जरा इकडे कराल?” असं म्हणून तिच्या गुडघ्याला घट्ट बांधलेला रुमाल त्याने थोडा सैल केला.
“जास्त त्रास होतोय?” त्याने विचारलं.
तिने नुसतीच मान हलवली. पहिल्यंादाच दोघांची नजरानजर झाली.
“तुमच्या घरी कळवायचंय?” त्याने तिला विचारलं.
“नाही. आत्ताच नको. ते घाबरून जातील. बांद्य्राला माझी एक मैत्रीण राहते. या काकींनी मघाशीच तिला फोन केला होता.” ती म्हणाली.
“तिला सांगावं लागेल कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये यायला.” असं म्हणून उमाकाकींनी फोन लावला.
हॉस्पिटल आलं. तिची अवस्था बघून डॉक्टरांनी तातडीनं तिला चेकअपसाठी आत घेतलं.
“थँक गॉड! फ्रॅक्चर नाहीये. मुका मार आहे.” ड्रेसिंग करता करता डॉक्टर बोलत होते. हा एक एक्स-रे काढून घ्या… एक कागद अभयच्या हातात देत डॉक्टर म्हणाले.
“छातीचा एक्स-रे.” विचारता विचारता खिशात शिल्लक राहिलेल्या साठ रुपयांकडे त्याने पाहिलं.
“घाबरण्यासारखं काही नाहीये. ती छातीत दुखतंय म्हणाली म्हणून…” “डॉक्टर, अ‍ॅडमिट वगैरे व्हायची गरज आहे?” त्याने विचारलं.


“तासाभरात एक्सरेचा रिपोर्ट येर्ईल. तेव्हा बघू. सिस्टर, यांना घेऊन जा.” डॉक्टर म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून, “तुम्ही आहात ना हिच्यासोबत?
मग आम्ही निघतो.” असं म्हणून त्याच्या उत्तराची वाट न पाहताच आशा व उमाकाकी गेल्याही.
एक्स-रे काढून रिपोर्टची वाट पाहत अभय तिच्याबरोबर वेटिंग रुममधे थांबला. एवढं बरं, एक्स-रेचे पैसे तिनेच दिले.
“थँक यू.” कोपर्‍यातल्या बाकावर बसत ती म्हणाली.
“कशाबद्दल?”
“तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलला आणलं. इतकी घाबरले होते ना मी. काही सुचतच नव्हतं.”
“कुणीही घाबरलंच असतं. बरं झालं थोड्यात निभावलं… तुमची मैत्रीण येणार होती ना?” बोलता बोलता त्याने मोबाईलवर
वेळ पाहिली.
“येईलच एवढ्यात… तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय.”
“सकाळी कल्याण स्टेशनला आपण एकाच रिक्षाने आलो होतो.”
“आत्ता आठवलं.” असं म्हणून
ती हलकेच हसली.
त्याला जाणवलं- सकाळी ती तिच्याच मस्तीत होती. स्वत:चंच त्याला हसू आलं. मन किती वेडं असतं. नको नको ते आडाखे बांधीत इंद्रधनू स्वप्नांचे कोष विणत असतं.
“तुम्ही अंधेरीलाच नोकरी करता का?” तिच्या प्रश्‍नाने त्याच्या विचारांची शृंखला तुटली.
“नाही. सध्या नोकरीच्याच शोधात आहे. इथं एका ठिकाणी चांगली ऑफर होती. त्यासाठी सेकंड इंटरव्ह्यूला आलो होतो.
“सेकंड इंटरव्ह्यू?”
“एकदा इंटरव्ह्यू झाला आहे. आज त्यांनी फायनलला बोलवलं होतं?”
“मग काय झालं?” अभावितपणे तिने विचारलं.

एवढ्यात सिस्टर आली. सिस्टरच्या मागोमाग आणखीही एक तरुणी
आत आली.
“काय गं, ठीक आहेस ना?” आल्या आल्या तिच्या पाठीवर हात फिरवत त्या तरुणीने विचारलं.
“बरी आहे. वाचले गं! उजवा
गुडघा फ्रॅक्चर होता होता राहिला. हातालाही लागलंय थोडं.” बँडेज दाखवत ती उत्तरली.
“तुझा फोन आला ना, तेव्हा दादरला आमच्या शोरुममधे नुकतेच पोहोचले होते मी. त्यामुळे यायला उशीर झाला. कुठाय तो बाईकवाला?” अभयकडे एक कटाक्ष टाकत त्या तरुणीनं विचारलं.
“मानसी, वेडी आहेस का गं तू?
तो काय मार खायला थांबेल?”
“का? स्पीडने बाईक चालवताना कशाचीच पर्वा करत नाहीत हे लोक. असं काही घडलं की मात्र फाटते यांची! नेभळट साले!” तिच्या बोलण्यात चीड ठासून भरली होती. “आणि काय गं, राकेश कुठं दिसत नाहीये?” मानसीने विचारलं.
“म्हणजे?” न कळून तिने विचारलं.
“त्यानेच आणलं ना तुला इथं?”
“नाही तर…”
“मीनल, तू मला फोन केला तेव्हाच त्यालाही कळवलंस ना?”
“हो.”
“मग तो आला नाही अजून?”
“नाही. इंटरव्ह्यूमधे अडकलाय?”
“कमाल आहे! कसा बॉयफ्रेंड आहे तुझा? एवढा तुझा अ‍ॅक्सिडेंट झालाय आणि महाशय इंटरव्ह्यूला?” बोलता बोलता मानसीचं लक्ष पुन्हा अभयकडे गेलं. त्याच्या स्माइलमध्ये तिची नजर अडकली. एक वेगळीच कशीश वाटली तिला त्यात. कोण असेल हा? केव्हाचा बघतोय एकसारखा? सुनावायचं का याला? असंही तिच्या मनात येऊन गेलं.
“त्याने यायला हवं होतं हे खरंय, पण…” मीनलच्या बोलण्यानं ती भानावर आली.
“हा पणच महत्वाचा आहे.”
“अगं येईल नंतर तोही. नाहीतरी लग्नाआधी असं बाँडिंग नाही
आवडत त्याला.”
“आपल्या माणसाची वेळप्रसंगी काळजी घेणं, त्यासाठी धावून येणं याला तू बाँडिंग म्हणतेस? माणसाची खरी पारख तर अशा वेळी होते.
मला तर वाटतं तू अजूनही त्याच्याबद्दल विचार करावास. आणि हो, आज तर त्याचा इंटरव्ह्यू इथं अंधेरीलाच होता ना?”
“हो. गॅमन इंडियाला होता.”
“तुझा अ‍ॅक्सिडेंट झाला त्याच्या थोडं पुढेच तर अल्केम हाऊस आहे.”
“मानसी, अगं तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल… कदाचित यामुळेच तो येऊ शकला नाही.”
“प्रॉब्लेम? स्वार्थी आहे तो… निव्वळ स्वार्थी!” मीनलशी बोलता बोलता तिची नजर पुन्हा अभयकडे वळली. त्याचं लक्षही तिच्याचकडे होतं. “ए, काय रे असं बघतोयस? पोरी पाहिल्या नाहीत वाटतं कधी?” तिने सरळ त्याला धारेवरच धरलं.
“मानसी, अगं ते…” मीनलने तिला थांबवायचा प्रयत्न केला.
“तू थांब गं. केव्हापासून हा अधाश्यासारखा बघतोय आपल्याकडे. असल्या रोमिओंना अद्दल घडवायलाच पाहिजे!” तावातावाने ती बोलू लागली. आजूबाजूचे सगळे त्यांच्याकडे पाहू लागले.
“मॅडम, एखाद्यावर कुठलेही आरोप करण्याआधी, काही गोष्टी जाणून घ्यायला हव्यात, असं नाही वाटत तुम्हाला?” अभय म्हणाला.
“वा रे वा! चोर तो चोर, उपर से सीनाजोर! …काय जाणून घ्यायला पाहिजे रे? अं, काय?” जवळ येत
ती सरळ अभयला भिडलीच.
“एक मिनीट, एक मिनीट… मानसी थांब. ते माझ्याचसोबत आहेत. तुझा गैरसमज झालाय.” पटकन मीनल उत्तरली. तिने तसं सांगताच मानसीने स्वत:ची जीभ चावली.
“ओह नो! आय एम सॉरी.” तिने अभयची माफी मागितली. तिच्या नजरेत दिलगिरी होती.
“कित्ती घाई करतेस बोलताना! तरी मी तुला सांगतेेय.” मीनल तिला समजवू लागली. पण आता अभयचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. मीनलच्या तोंडून गॅमन इंडियाचं नाव ऐकल्यापासून तो आठवण्याचा प्रयत्न करत होता. राकेश हे नाव आपण कुठं ऐकलंय म्हणून. अचानक त्याला आठवलं… फर्स्ट टाइम तो जेव्हा गॅमन इंडियाला इंटरव्ह्यूला गेला होता त्यावेळी बारा जणांच्या लिस्टमधे राकेशचंही नाव होतं.
स्वत:शीच तो हसला. नियतीच्या खेळाचं त्याला हसू आलं.
“चला येऊ मी?… तुमची मैत्रीणही आलीय आता…” मानसीकडे बघत
तो मीनलला म्हटला.
“हो हो. तुम्ही गेलात तरी चालेल आता. थँक्स हं! अरे हो, तुमची ओळख करून देते, ही मानसी. माझी मैत्रीण. तुमच्यासारखीच बेधडक आहे.” मिस्कील हसत मीनल म्हटली.
“ते आलंच लक्षात.” तोही मिस्कील हसला.
“हॅलो…” मानसीने थेट त्याच्या डोळ्यांत पाहिलं.
“चला येतो.” असं म्हणून आपली फाइल उचलून घाईघाईतच तो निघाला.
“कोण होता गं तो?” अभय गेल्या गेल्या मानसीनं मीनलला उत्सुकतेनं विचारलं.
“त्यानेच तर मला हॉस्पिटलला पोहोचवलं. व्हेरी डॅशिंग मॅन! मला उठता येईना म्हणून पठ्ठ्याने चक्क दोन्ही हातांनी कवेत उचलून मला टॅक्सीत बसवलं. बाकी नुसतंच
बघत होते.”
“यू आर मॅड! हे मला आधी तरी सांगायचं. जाम आवडला होता
तो मला.”
“ते ओळखलं मी. तसं नसतं तर आल्या आल्याच तू त्याला सुनावलं असतंस… मीही वेडीचय! त्याचं नावसुद्धा नाही विचारलंं.”
“काय? तुला त्याचं नावसुद्धा नाही माहीत? स्टुपीड, काय वाटलं असेल त्याला.”
“तुझ्यामुळेच झालं हे सगळं. आल्या आल्या तू बडबडायला लागलीस.”
“झंझावात होता म्हणायचं तर. जाऊ दे. होईल पुन्हा केव्हातरी भेट. मनात असलं तर सगळं आपोआप जुळून येतं म्हणे.” बोलता बोलता तिचं लक्ष मीनलच्या पायाजवळ पडलेल्या लिफाफ्याकडे गेलं.
“अरे, हा लिफाफा कसला?”
“त्याच्या फाइलमधून पडला वाटतं, बघ बघ लवकर.”
मानसीने लिफाफा उघडून बघितला. गॅमन इंडियाचं इंटरव्ह्यू कॉल लेटर बघून ती स्तंभित झाली.
“काय झालं?” मीनलने विचारलं.
“… …”
“अगं बोलत का नाहीये?” ती काहीच बोलत नाहीये ते पाहून मीनलने तिच्या हातून लेटर खेचलं.
लेटर वाचून तिलाही शॉक बसला.
“त्याचं नाव अभय भटनागर आहे तर” मीनल स्वत:शीच बडबडली.
“बघितलं मीनल, अशीही माणसं आहेत या जगात. आय वॉण्ट टू मीट धिस गाय! अभय भटनागरशी मैत्री करायला आवडेल मला.” असं म्हणून कॉल लेटरवर असलेल्या अभयच्या मोबाईलवर तिने लागलीच फोन लावलाही, पण फोनच लागेना.
“नाही लागत आहे?” मीनलने विचारलं.
“बिझी आहे,” असं म्हणून मानसी पुन्हा फोन लावू लागली. तिला फार उत्सुकता होती, कधी एकदाची
ती अभयशी बोलते याची. पण त्याचा फोन बिझीच होता.
“मीनल, तू मला नेहमी म्हणायची ना… तू कशी कुणाच्या प्रेमात पडत नाही? तुला कुणी पसंत कसं पडत नाही? मी तुला म्हणायचेही, ज्या दिवशी मनासारखा कुणी भेटेल,
तेव्हा मी स्वत:च त्याला प्रपोज करेन.
ती वेळ आता आलीय… खरं तर त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा- दवबिंदूनी ओथंबलेल्या फुलांवर पहाटकिरणं पडावी अन् लडिवाळ वार्‍यानं हलकेच त्या फुलांना छेडावं असंच काहीसं झालं होतं मला.”
फोन लावता लावता मानसी बोलत होती. एवढ्यात अभयचा फोन लागला.
“हॅलो, अभय. मी मानसी. कोकिळाबेन हॉस्पिटलमधून बोलतेय. आत्ताच आपली ओळख झाली होती…”
“हां, बोला.”
“तुमचं गॅमन इंडियाचं कॉल लेटर तुम्ही इथंच विसरून गेलात.”
“आता त्याचा उपयोग नाही.
मी नुकताच त्यांना फोन केला होता.”
“ते काय म्हटले?”
“साडे अकरापर्यंत त्यांनी माझी वाट पाहिली. मी पोहोचलोच नाही. त्यामुळे राकेश रावचं सिलेक्शन झाल्याचं सांगितलं त्यांनी.”
“ओह नो!”
“इटस् ओके. माझ्या नशिबात कदाचित यापेक्षा चांगला जॉब असेल.”
“दॅटस् द स्पिरीट. लाइक इट! खरं सांगू, मला तर असंच वाटतं, आपली भेट व्हावी म्हणून हे सगळं घडलं की काय. अभय, तुझ्याशी मैत्री करायला आवडेल मला.”
काही सेकंद त्याने विचार केला.
“हॅलो… अभय, स्पष्ट बोलायला आवडतं मला.”
“नो नो. इटस् ओके. मलाही आवडेल.”
“बोलूया आपण. मी करते संध्याकाळी फोन.” असं म्हणून तिने फोन कट केला.
“तुझ्या वडिलांपेक्षा तूच खरी
जवाहिरी आहेस. हिरा अगदी अचूक निवडलास! मलाही आवडला तुझा अभय भटनागर!” तिच्या हातात
हात मिळवत मीनल म्हणाली.
तिच्या नजरेत मानसीचं कौतुक होतं.

Share this article