Close

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा घेतला निर्णय (Chinmay Mandlekar Trolled For Naming Son Jahangir)

चिन्मयनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो"

अभिनेता चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) त्याच्या मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे सध्या ट्रोल केलं जात आहे. आता याबाबत चिन्मयनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं मुलाच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल आणि त्यामुळे त्यानं घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे. चिन्मयनं व्हिडीओ शेअर करुन या पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी चिन्मयने एका पॉडकास्टला एक मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान त्याच्या मुलाचा नावाचा विषय निघाला होता. चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचे नाव‘जहांगीर’ आहे. यावरून अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल केले गेले.

या व्हिडीओमध्ये चिन्मय मांडलेकर म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून सतत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हे ट्रोलिंग त्याच्या कामामुळे नाही, तर त्याच्या मुलाच्या नावावरून होत आहे. नुकताच त्याच्या पत्नीने म्हणजेच नेहा जोशी-मांडलेकर हिने देखील एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये तिने देखील याच मुद्द्यावर आपला राग व्यक्त केला होता. नेहाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता चिन्मयने देखील एक व्हिडीओ शेअर करत मोठा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांना आवाहन करताना चिन्मय म्हणाला की, ‘तुम्ही मला माझ्या कामावरून वाटेल ते बोला. मी ऐकून घ्यायला तयार आहे. मात्र, उगाचच चुकीचा विषय घेऊन माझ्या कुटुंबावर आणि त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.’

पुढे चिन्मय म्हणाला की, ‘मी साकारत असलेल्या भूमिका तुम्हाला आवडल्या किंवा नाही आवडल्या, तर तुम्ही जे म्हणाल ते मी ऐकून घेईन. मात्र, आता माझ्या मुलाच्या नावावरून त्याच्या चारित्र्यावर, त्याच्या पालकांवर आणि माझ्या पत्नीच्या चरित्र्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक माणूस म्हणून मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आजवर मी अनेक भूमिका केल्या. मात्र माझ्या भूमिकांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल, तर तो मला कदापि मान्य नाही आणि म्हणूनच मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.’

"नाव खटकतंय म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशाने भारतरत्न दिलं. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जेआरडी टाटा)" असंही चिन्मयनं व्हिडीओमध्ये सांगितलं. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये चिन्मयनं लिहिलं, "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो". फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या चित्रपटांमध्ये चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

तू चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोस आणि मुलाचं नाव जहांगीर का? असं म्हणत अनेकांनी त्यांना अतिशय वाईट शब्दात ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढे मी कोणत्याही चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असा निर्णय जाहीर करत चिन्मय मांडलेकरने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक मोठा धक्का दिला आहे.

Share this article