दत्तक मूल आणि पालक यांच्यातील नातं हे भावनिक असतं. ते तितक्याच पावित्र्यानं अन् संवेदनशीलतेनं सांभाळता आलं पाहिजे. कारण ही सोबत क्षणांची नसून कायमची असते.
एखाद्या स्त्रीस अपत्य नसणं ही खरं तर आजच्या आधुनिक काळात फार मोठी बाब असू नये. विज्ञानानं तिच्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी, सरोगेट मदर यांसारखे पर्याय ठेवले आहेत. ते शक्य नसेल वा तेथेही अपयश आलं तरीही यशोदा बनण्याची संधी तिला मिळू शकते. ती मूल दत्तक घेऊ शकते. पण तेथेही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेताना काही पालक कचरतात. मग नात्यातलं मूल वाढवणं, एखाद्याला मुलासारखं मानणं, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं यासारखे तोडगे काढले जातात. परंतु हे सर्व पर्याय भावनिक आणि तात्पुरते असतात.
अपत्य नसण्याच्या समस्येचं सर्व स्तरांवर स्वीकारता येईल असं एकमेव तर्कशुद्ध उत्तर म्हणजे मूल दत्तक घेणं. अनेक पालक स्वतःचं पहिलं मूल असतानाही, स्वखुषीने दुसरं मूल दत्तक घेतात. याशिवाय लग्नाआधी मूल दत्तक घेणार्या स्त्रियांची उदाहरणंही आपल्या समोर आहेत. अशा प्रकारे सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून सुद्धा मूल दत्तक घेण्याचे निर्णय घेतले जातात. आपल्या देशातील प्रत्येक निराधार, अनौरस बाळाला कौटुंबिक जिव्हाळा आणि मातापित्यांचे प्रेम मिळवून देण्याच्या दृष्टीने दत्तक विधानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
विचारपूर्वक निर्णय घ्यावा
जेव्हा एखाद्या संस्थेमधून दत्तक मूल घरात येतं त्या वेळेस घरातील मंडळी विशेषतः आई त्याचं स्वागत करायला उत्सुक असते. अशा मुलांमध्ये अनेकदा भावनिक गुंतवणूक करण्यास पालकांना काही अवधी लागतो. दत्तक पालकत्वाचा स्वीकार नसेल किंवा काही कारणानं म्हणावी तशी भावनिक गुंतवणूक त्या मुलामध्ये झाली नाही तर पश्चात्तापाची पाळी येऊ शकते. काही पालकांना दत्तक पालकत्व म्हणजे दुप्पट जबाबदारीचं काम आहे असं वाटतं. मग त्या जबाबदारीच्या तणावाखाली किंवा अपराधी भावनेतून मुलांकडे बघितलं जातं. त्यामुळे अशा पालकांचा बरेचदा गोंधळ उडतो. काही पालकांना आपण दुसर्याचं मूल वाढवतो आहोेत याची सतत जाणीव असते. असे पालक मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांना पाहिजे त्या गोष्टी पुरवून वेगळाच पेच निर्माण करतात. एवढ्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल, मूल दत्तक घेण्याचा निर्णय फार विचारपूर्वक घ्यायला हवा.
एकदा का मूल दत्तक घेण्याचा निर्णय ठाम झाला की मग जे मूल दत्तक घेणार त्याचा भूतकाळ काहीही असला तरी त्याचं वर्तमान आणि भविष्य केवळ तुम्हीच असलं पाहिजे. कोणतंही मूल आपले पालक कोण असावेत याची निवड करू शकत नाही. परंतु, ते मूल आपल्या घरात यावे की नाही हे पालक ठरवू शकतात. दत्तक मुलांचं चांगल्या प्रकारे पालन करण्याकरिता तसेच उत्तम पालक होण्याकरिता काय करायचे?
उत्तम पालक होण्यासाठी…
या बाळामुळे आपण पालक बनू शकलो, हे विसरू नका. बाळास प्रेमाने वाढवा. तुमचं प्रेम व्यक्त होणं गरजेचं आहे.
त्यासाठी त्याच्याशी खेळलं पाहिजे, बोबडं बोललं पाहिजे. हे सर्व करताना किंवा भेटवस्तू वगैरे देताना उपकार करतोय असं त्यास भासवू नका. बघ, तू या घरी आलास, हे तुझं भाग्य आहे, अशा प्रकारचा समज तुमच्या वागण्यातून दिसता कामा नये. स्वतः असं करू नयेच शिवाय इतर नातेवाइकांनादेखील असं वागू देऊ नका.
फाजील लाड करून मुलांच्या सवयी बिघडवू नका. त्यानं
ती हट्टी बनतील. त्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करा.
बरेचदा दत्तक मूल आहे हे मुलापासून लपविलं जातं. परंतु ही बाब इतरांकडून कळण्यापेक्षा लवकरात लवकर त्याबाबत मुलाला व्यवस्थित समजेल अशा भाषेत सांगा. कुटुंब संगोपन व्यवस्थित असेल तर या बाबीमुळे फारसा फरक पडत नाही.
अगदी तान्हं बाळ दत्तक घेतलं तर त्याच्या पोषणाकडे
विशेष लक्ष द्यावं लागतं. तेच मूल वयानं मोठं असेल तर त्याच्या मानसिकतेचा विचार करून त्याच्याशी वागलं पाहिजे. कारण तुमच्याकडे येण्यापूर्वी त्याचं जेथे संगोपन झालं असेल, तेथे त्यास ज्या प्रकारची वागणूक मिळाली असेल त्याप्रमाणे त्याच्या सवयी बनलेल्या असतात.
मूल दत्तक असलं तरी त्यास रुसणं, हसणं, खोड्या करणं, रागावणं, हट्ट करणं, शेअर करणं, मोठ्यानं आवाज करणं याबाबतचे सर्व हक्क द्या.
त्याला सतत सहानुभूती दाखवू नका.
नात्यातला गोडवा समतोल राहिला पाहिजे. तो कमी झाल्यास चवच राहणार नाही अन् जास्त झाल्यास मधुमेह होणार. मुलं प्रेमाअभावी बिघडतातही अन् प्रेमानेच सावरतातही.
दत्तक मूल असलं तरी त्याची नि आपली सोबत ही क्षणांची नाही तर कायमची आहे, हे लक्षात ठेवा.
अपत्य नसणार्या काही स्त्रिया क्लब, सेवा-संस्था, ऑफिस, आवडीचे छंद क्लासेस अशा विविध ठिकाणी मन रमविण्याचा प्रयत्न करतात. परंतु यात नुसताच वेळ जातो. बाकी मनाला कायमची गुंतवणूक कुठंच सापडत नाही.