Close

करण जोहरने ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट केली जाहीर (karan Johars Mr And Mrs Mahi Movie Release Date Announced)

बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. त्याचा हा आगामी सिनेमा क्रिकेटवर आधारित असून सिनेमाच्या हटके नावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 'मिस्टर अँड मिसेस माही' असं या आगामी सिनेमाचं नाव असून सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

ब्लु रंगाच्या इंडियन क्रिकेट टीमच्या जर्सीवर मिस्टर अँड मिसेस माही असं लिहिलं असून 'कोणतंही स्वप्नं एकट्याने पूर्ण करता येत नाही' असं कॅप्शन या पोस्टरवर दिलं आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा सिनेमा नोव्हेंबर मध्ये रिलीज होणार होता पण आता ३१ मे २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

करणने ही पोस्टर शेअर करताना त्याच्या भावनासुद्धा शेअर केल्या. तो म्हणतो,"काही चित्रपट फक्त कथांपेक्षा जास्त असतात … ते कृत्रिम प्रेमापेक्षा बरंच काही असतात … ते प्रेक्षकांशी स्वप्नांबद्दल बोलतात आणि किती वेळा आपल्या जवळचे लोक आपल्या स्वप्नांच्या मार्गात येऊ शकतात … MR आणि MRS माही अपवादात्मकपणे आमच्या ह्रदयाच्या जवळ आहेत.. आणि आम्ही आमच्या सिनेमाविषयीचे आगामी अपडेट्स शेअर करू… पण आत्ता आमच्याकडे रिलीजची तारीख आहे!!! ३१ मे २०२४!!! तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!!!"

मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमाचं दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलं आहे. या आधी त्यांनी 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या आधी राजकुमार आणि जान्हवी यांनी 'रुही' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. 'मिस्टर अँड मिसेस माही' या नावामुळे हा सिनेमा इंडियन क्रिएट टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि त्याची बायको साक्षी यांच्याशीही संबंध जोडला जातोय. तर सिनेमाच्या नावावरून सिनेमाचं कथानक क्रिकेट आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी एक जोडी यांच्यावर आधारित आहे असा अंदाज आहे.

Share this article