सलमान खान आणि ईद हे समीकरण गेली बरीच वर्ष बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतं. पण यंदाची ईद सलमानच्या चाहत्यांना रुखीसुखी जाईल असे वाटत होते. कारण यंदा त्याचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. पण भाईजानही आपल्या चाहत्यांना नाराज होऊ देणार नाही.
सलमान खानने आपल्या चाहत्यांना ईदी दिली आहे. ११ एप्रिलच्या पहाटे त्याने चाहत्यांना खास भेट दिली. त्याच्या 'सिकंदर' या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, तो पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध निर्माते साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक ए आर मुरुगादास 'सिकंदर' या चित्रपटातून एकत्र येणार आहेत.
सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की , 'या ईदला 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मैदान' पाहा आणि पुढच्या ईदला या आणि सिकंदरला भेटा... तुम्हा सर्वांना ईदच्या शुभेच्छा!'
आज, ईदच्या खास मुहूर्तावर, निर्मात्यांनी सलमान खानच्या पुढील चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात सलमान, साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास हे तीन दिग्गज एकत्र येणार आहेत. सलमान खान आणि साजिद नाडियादवाला यांनी एकत्र सिनेमा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या जोडीने 'जुडवा', 'मुझसे शादी करोगी', 'किक' आणि असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
एआर मुरुगदास यांनी आमिर खानसोबत 'गजनी'सारखा चित्रपट केला होता. 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' आणि तमिळ सिनेसृष्टीतही असे अनेक हिट चित्रपट देण्यासाठी तो ओळखला जातो.