आपणा सर्वांनाच गुलाबी गाल आणि रेशमासारखी मुलायम त्वचेची देणगी लाभलेली नसते. त्यामुळे लाभलेल्या सौंदर्याची काळजी घेणं आवश्यक असतं. यातच ऋतुमानानुसार त्वचेच्या सौंदर्यात बदल होतो. रखरखीत उन्हाच्या झळांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी तिची खास देखभाल करणं आवश्यक आहे.
इतर कोणत्याही ऋतूपेक्षा उन्हाळा आपल्याला जास्त दखल घ्यायला लावतो. रखरखीत ऊन आपल्याला घरातच राहायला भाग पाडत असलं तरी बाहेर पडावंच लागतं. म्हणूनच उन्हाळ्यात आपल्या सौंदर्याची विशेषतः त्वचेची जास्त काळजी घेणं जरा जिकीरीचं होतं.
उन्हाच्या तीव्र झळांमुळे केवळ त्वचेचा रंगच नव्हे तर त्वचेचा पोत खराब होणे, सावळी त्वचा रापणे, घाम व अस्वच्छतेमुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये संसर्ग होणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणे या समस्या उद्भवतात. म्हणूनच ऋतुमानात होणार्या बदलांचा सामना करण्यासाठी त्वचेला तयार करा. त्वचेला सन स्मार्ट बनविण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहूया.
सनटॅन
उन्हाच्या झळा त्वचेवर नाना रंग दाखवितात. या टळटळीत उन्हात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. सूर्याच्या अतिनील किरणांनी त्वचेचं जास्त नुकसान होतं. हे किरण त्वचेच्या अंतपेशीपर्यंत जाऊन इजा करतात. म्हणूनच त्वचेचा उन्हापासून बचाव करायला हवा. उन्हाळ्यात सगळ्यात
जास्त समस्या जाणवते ती त्वचा काळवंडण्याची, म्हणजेच सनटॅनची. जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचा काळवंडते. त्वचा काळी पडू नये याकरिता उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावावे. यामुळे सनटॅनपासून संरक्षण होते आणि एजिंगची समस्याही रोखता येते. आपल्या त्वचेचा पोत जाणून त्यानुसार सनस्क्रीन लोशन निवडावे.
घराबाहेर जाताना सनस्क्रीन लावावे. तसेच अधिक वेळ उन्हामध्ये राहायचं असल्यास
दर दोन तासांनी सनस्क्रीन लावावे. पोहून झाल्यानंतर, खेळून झाल्यानंतर सनस्क्रीन न विसरता लावावे. उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावल्यानंतर मॉइश्चरायजरही लावावे म्हणजे त्वचेमधील आर्द्रता टिकून राहते.
उपाय
उन्हामुळे त्वचेला काळपटपणा आला असेल तर बटाटा कापून त्याचा रस त्वचेवर चोळावा
व थोड्या वेळाने धुवून टाकावा. त्वचेचा काळपटपणा घालविण्यासाठी कोरड्या त्वचेसाठी लिंबाच्या रसात साखर, ग्लिसरीन घालून ते गोलाकार मसाज करीत लावावे. यामुळे चेहर्याचा वर्ण उजळतो. उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काकडीचा उपयोग करता येतो. काकडीचे साल काढून त्याचा रस चेहरा किंवा काळ्या झालेल्या त्वचेवर नियमितपणे लावल्यास काळेपणा कमी होतो. दुधात एक चमचा हळद घालून ते मिश्रण त्वचेवर लावावे. नियमितपणे हे लावल्यास त्वचा उजळते.
सनबर्न
कडक उन्हात जास्त वेळ फिरल्याने उन्हाचा तडाखा बसतो. यालाच सनबर्न म्हणतात. सनबर्न झाल्यास त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटतात किंवा त्वचा भाजल्यासारखी दिसते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला तर घ्यावाच, सोबत असे होऊ नये याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, सनस्क्रीन लोशन वा क्रिमचा नियमित वापर. उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन क्रिम वा लोशन लावावे. ज्या सनस्क्रीनमध्ये 15 पेक्षा अधिक सन प्रोटेक्शन फॅक्टर असतात अशा सनस्क्रीनची निवड करा. तसेच उन्हात जास्त काळ राहणे टाळा. उन्हाळ्यात सनबर्नच्या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. सनबर्न झालेल्या त्वचेवर कुठल्याही प्रकारचे मिल्क क्रीम किंवा लोशन लावू नये. तसेच त्वचेवर चट्टे उमटणं, जळजळ असा त्रास झाल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जावं.
उपाय
सनबर्नवर कोरफड वा कोरफडयुक्त लोशन हा सगळ्यात उत्तम उपाय असतो. त्यामुळे त्वचेची जळजळ कमी व्हायला मदत होते. तसेच ताकात टोमॅटोचा रस मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावल्यासही त्वचेला थंडावा मिळतो व सनबर्नमुळे झालेली जखम भरून येण्यास मदत होते. याशिवाय कोबी किंवा लेट्यूसची पाने थंड पाण्यात भिजवून जखम झालेल्या भागावर ठेवल्यास त्वचेला थंडावा मिळतो. थंड पाण्यात गुलाबपाण्याचे काही थेंब टाकून, या पाण्याने आंघोळ केल्यास आराम पडतो.
निस्तेज आणि रूक्ष त्वचा
प्रत्येक ऋतूत त्वचेची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते. त्वचा कोरडी पडल्यास मॉइश्चरायझरचा वापर जसा अधिक केला जातो, तसेच उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ नये याकरिता सनस्क्रिन लोशनचा वापर केला जातो. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्वचा सुरकुतल्यासारखी दिसते, तसेच निस्तेज व तेलकटही दिसते. याशिवाय या काळात सर्वात अधिक समस्या आढळून येते, ती घामोळ्याची. सनबर्न, काळे डाग, पुटकुळ्या, त्वचेला खाज येणं या समस्याही या ऋतूत दिसून येतात.
उन्हाळ्यात त्वचेचं आरोग्य चांगलं राहावं याकरिता संपूर्ण शरीराच्या त्वचेला मॉइश्चरायजर लावावे. याशिवाय या ऋतूत स्पाचा अनुभव घेतल्यास शरीराबरोबरच मनाची मरगळही निघून जाते. त्वचेला नवी ऊर्जा देण्यासाठी फेशियल, क्लिन्जिंगद्वारे मृत त्वचा काढून टाकावी. त्यामुळे त्वचेवरील छिद्रं मोकळी होतात आणि त्वचासुद्धा मोकळा श्वास घेऊ शकते. चेहरा धुण्यासाठी जेल बेस फेसवॉशचा वापर करावा. त्यामुळे त्वचेतला तेलकटपणा नियंत्रणात ठेवता येतो. त्या व्यतिरिक्त चेहरा धुण्यासाठी स्क्रबचा वापर करावा. स्क्रबच्या मदतीने त्वचेवर हलक्या हाताने गोलाकार मसाज केल्यास रक्ताभिसरण वाढून त्वचा मऊ आणि तजेलदार बनते. चेहर्याच्या त्वचेचा दाह होत असल्यास फळांचा गर चेहर्याला लावावा. यामुळे चेहर्याची जळजळ कमी होते आणि चमक वाढते.
पायांची निगा
उन्हाळ्यात घामामुळे पायाच्या त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळ्यात पायांना घाम येतो. पाय दिवसभर बुटांमध्ये बंद राहिल्यास हा घाम बोटांच्या पेरांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे पायांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. याकरिता उन्हाळ्यामध्ये शूज किंवा बंद फूटवेअरचा वापर कमी करावा.
तसेच बुटांमध्ये अॅण्टिबॅक्टेरिअल पावडर घालावी. पायाच्या त्वचेला मोकळी हवा मिळेल असे फूटवेअर वापरावे. कडक उन्हाची तीव्रता सहन न होऊन पायाचे तळवे रूक्ष होतात. याकरिता, रात्री झोपण्यापूर्वी पायाला बेबी ऑईलने मसाज करावा. यामुळे पायाची त्वचा मऊ राहायला मदत होते. तसेच वाहत्या पाण्याखाली पाय धरून प्युमिक स्टोनने फुटलेली त्वचा घासावी.
पायाला नियमितपणे मॉइश्चरायजर लावावं.
डोळ्यांची निगा
उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्यकिरणांमुळे डोळ्यांनाही त्रास होतो. त्यासाठी बाहेरून आल्यावर डोळे थंड पाण्याने धुवावेत, ते चोळू नयेत. उन्हाच्या तीव्रतेपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी घराबाहेर जाताना गॉगल लावावा. डोळ्यांच्या आजूबाजूचा पूर्ण भाग झाकला जाईल याचीही काळजी गॉगल्स निवडताना घ्यावी.
अशा पद्धतीने त्वचा, डोळे, केस आणि अर्थातच एकंदर आरोग्य याची योग्य काळजी घेतली तर उन्हाळ्यालाही कूल राहून तोंड देता येईल आणि उन्हाळ्याचा मनसोक्त आनंदही घेता येईल.