-प्रिया श्रीकांत
ह्या दोन्ही मुली एकाच नात्यागोत्यातल्या, पण कमनशिबी! सीतेचं गहू गहू दुःख प्रत्येक स्त्रीच्या वाटेला आलंय् असं म्हणतात. त्या सकपाळबाईही म्हणतात कीबायांनो, सहन करा, माफ करा, शेवट गोड होतो. पण अमूल्य आयुष्याचं वाळवंट होतं त्याचं काय?काय झालं आज कोर्टात? निकाल लागणार होता ना?”
प्राचीची चाहूल ऐकूनच कमलाताईंनी प्रश्न केला. आपल्या मुलीच्या चेहर्याकडे तिचं लक्षही गेलं नाही. शेवटची पोळी डब्यात ठेवून हात पुसत त्या बाहेरच्या खोलीत आल्या.
“अगं काय विचारतेय् मी?” पुन्हा प्रश्न केला.
“आई कळत कसं नाही तुला? आपण केस हारलोय. जिंकलो असतो तर अशी आले असते का मी?” प्राचीने कपाळावरचा घाम टिपला. घोर निराशा!!! कमलाताई कोसळण्याच्या बाकी होत्या.
“अगं प्राची, असं कसं झालं? इतकी सरळ केस आज सात वर्षांनंतरही हरलो? आपण जिंकायलाच हवी होती.. आज तुझ्या सुटकेचा दिवस होता..” कमलाताई बडबडत राहिल्या. प्राची निर्विकारपणे आपल्या झोपलेल्या मुलाजवळ गेली. त्याच्या केसातून हात फिरवीत म्हणाली, “आई, कोर्टाच्या पहिल्या पायरीवर उभ्या असलेल्या माणसापासून ते सर्वोच्च स्थानी बसलेला माणूस सगळी सारखीच. प्रत्येकाची किंमत ठरलेली; पैसे मोजा आणि हवा तो न्याय पदरी पाडून घ्या.” प्राचीचं बोलणं, तावून सुलाखून थंड झालेलं! थिजलेल्या भावना व पूर्ण पराजय स्वीकारलेलं!
प्राचीचं लग्न ठरलं तेव्हा सगळं कसं छान वाटलं होतं! आनंदचं शिक्षण, नौकरी.. मुंबईत स्वतःचे दोन फ्लॅट्स, सासूबाई नव्हत्या.. प्रेमळ वाटणारे सासरे, काळी सावळी, लग्न न झालेली, पण वकील असलेली नणंद सगळं चांगलं असताना केवळ नणंदेवरून स्थळ नाकारायचं तसं कारण नव्हतं. (प्राचीला वडिलांचं सुख मिळालं नव्हतं, म्हणून होणार्या सासर्यांविषयी विशेष आत्मीयता होती.) कमलाताईंनी कष्ट करून वाढवलेली सुंदर, सद्गुणी मुलगी प्राची.. नाते गोतावळ्यात ती सगळ्यात मोठी म्हणून तिचे लग्न ठरल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला. सासरी कसे वागावे ह्याचे भरपूर उपदेश मिळाले व प्राचीनेही मनोमन सगळ्या सूचना टिपल्या. थाटात लग्न झाले व ती नव्या घरी आली. अन् माप ओलांडून आल्या आल्याच तिच्या वनवासाला सुरुवात झाली. मोठ्या बहिणीसारखी मानलेली नणंद, कमालीची खलनायकी, कजाग व दुष्ट निघाली! दोन्ही मुलांच्या पगारावर मनसोक्त चैन, उधळपट्टी करणारे सासरे. “मी माझ्या बहिणीच्या शब्दाबाहेर नाही.. तुलाही तसंच करावं लागेल,” आनंदनं स्पष्ट सांगितलं. (सासर्यांना मुलांच्या भवितव्याशी काहीही देणं घेणं नव्हतं). मुकाटपणे प्राचीने सगळं स्वीकारलं. वर्षभरात मुलगा झाला. आता तरी परिस्थिती बदलेल असं प्राचीला वाटलं.. पण तसं झालं नाही. सासरे म्हणजे सासरे - ते स्वतःच्या चैनीत गुंग; नणंद आणि आनंद ह्यांचंच ते जग होतं. अनंत प्रकारे छळ चालला होता. सिझेरियन ऑपरेशनने बाळंतीण होऊन दवाखान्यातून प्राची घरी आली. सहाच दिवस झाले आणि गाद्या उचलून अंथरूण घालायचं काम तिच्यावर आलं. “घरची कामं सुरू कर, व्यायाम होईल.” निष्ठुर मने अन् लोखंडासारखी थंड नाती. प्राची बिथरली. भवितव्य गर्तेत जातंय, स्पष्ट दिसत होतं. जवळच्याच फ्लॅटमधे वेगळं रहायचा तिचा प्रस्ताव आनंदने धुडकावला. परिस्थिती चिघळत गेली व तान्हुल्यासह प्राचीला मध्यरात्री घर सोडावं लागलं. संरक्षणाची सावली धरणारे कमी, पण रणरणत्या उन्हाचे तडाखे देऊन गंमत बघणारेच अधिक घरातही.. समाजातही..
“दादा, काळजी करू नकोस. कुठे जाणार वहिनी? नातेवाईक चार दिवस ठेवतील; मग लाथा मारून बाहेर काढतील. त्या म्हातार्या आईकडे किती दिवस काढणार? झक मारत येईल परत. बस चुपचाप.” नणंद भावाला म्हणाली. प्राचीने समेट घडविण्याचे सगळे मार्ग फोनवरून आनंदला सुचविले; पण आनंदला प्राचीने सुचवलेलं काहीही मान्य नव्हतं. फक्त बहीण म्हणते तसं करायचं!
प्राचीने वाट बघितली. दिवस, महिने, वर्षे सरू लागली; आनंदचा पवित्रा बदलला नाही. त्याने प्राचीच्या माहेरच्या घरादाराला, स्त्री नातेवाईकांना बदनाम केलं. कोर्टाला आपल्या बोटावर नाचवलं. पैशाच्या बळावर गैरफायदा घेतला.
कोर्ट आणि त्याच्याशी निगडीत सगळ्यांचा प्राचीला अत्यंत वाईट अनुभव आला. कमलाताईंची पुंजी संपली; असेल नसेल ते विकलं. बाळ मोठं होत होतं. प्राचीच्या कोर्टाच्या फेर्या सुरूच होत्या. सगळेच कोसळणारे किल्ले. बोथट, तुटकी तलवार घेऊन प्राची लढत राहिली.
सात वर्षाच्या सेपरेशन नंतर घटस्फोट सहजपणे मान्य होतो असे वाचण्यात येतं. विशेषतः पती आपल्या पत्नी व मुलाचे पालनपोषण करण्यास असमर्थ असेल तर, पतीस गंभीर मानसिक आजार असेल तर, तो बाहेरख्याली असेल तर, धमक्या देत असेल तर, मानहानी करत असेल तर.. वगैरे वगैरे. इथे तर मला नोकरीच नाही, आयप्राप्ती नाही, म्हणून पोटगी देऊ शकत नाही, असं आनंदनं शपथपत्रामार्फत जाहीर केलेलं. तरी आनंदचीच बाजू खरी मानली जाते!
केस रेंगाळत जवळजवळ तीन वर्षे झाली म्हणून केस लवकर निकालात काढा, असा हायकोर्टाचा निर्देश आला. सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ, एकतर्फी पुराव्यांची.. कमलाताईंनाच नव्हे तर इतर सर्व नातेवाईकांना वाटलं की प्राची आता सुटणार. वकीलही सुचवत होते की तुम्ही आता खुशाल प्राचीच्या दुसर्या लग्नाच्या हालचाली सुरू करा. झालं गेलं सगळं विसरून नवीन आयुष्य सुरू करण्याची तयारी करा. तिच्याकरता तशी स्थळेही येत होती. पण, कसलं काय! दुसर्या लग्नाआधी ह्या लग्नाचा घटस्फोट होणे आवश्यक होते. आनंदनं शपथ घेतली होती की तिला सहजा सहजी सोडणार नाही; अशीच अडकवून ठेवीन. बघू या मज्जा! आणि आज केसचा निकाल आनंदच्या बाजूने लागला. जज म्हणाले, “काय झालं थोडं नवर्याचं सहन केलं तर? ह्या घटस्फोटासाठी ठोस कारणे, पुरावे नाहीत.”
आज प्राची मिळेल ते काम करून घर चालवतेय. सात वर्षे होऊन गेली तरी तिच्या नणंदेनं लग्न केलं नाही. सासरे अजूनही स्वतःच्या चैनीत गुंग. आनंद अजूनही बहिणीच्या शब्दाबाहेर नाही. मग काय तर. मुलीने स्वाभिमान बाळगून कसं चालेल? मानिनी, स्वयंसिद्धा होऊन कसं चालेल? लग्न झालं की तिने स्वतःचं अस्तित्त्व विसरलंच पाहिजे!
प्राचीची आतेबहीण राधा. तिचंही लग्न झालं. दृष्ट लागावी असं सासर. घरदार, माणसे खानदानी, पुरोगामी वाटणारी. तिथेही नणंद होती. प्राचीची केस पाहून राधा पावले जपून टाकत होती. घरच्या सगळ्यांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुठेतरी चांदीच्या, खिरीने भरलेल्या पात्रात पाल पडली व सगळं नासलं! हळू हळू राधाला कळलं की हे लग्न केवळ तिच्या नवर्याच्या हट्टामुळे झालं. घरचे बाकी सगळे विरुद्ध होते. त्यात राधा साध्या सामान्य कुटुंबातली. नवरा सोन्याच्या पिंजर्यात वाढलेला. बाहेरचं सामान्य जग त्याला माहित नव्हतं व मान्य नव्हतं. क्षुल्लक कारणाची आड घेऊन राधाच्या माहेरच्यांना घरी यायची बंदी घातली. येताजाता तिचे आईवडील व इतर नातेवाईकांबद्दल जहरी टीका.. पदोपदी अपमान.
राधाने स्वतःला बजावलं, आपण संस्कारी आहोत. छळ, दुःख सहन करायचं, पण घरदार, नवरा घट्ट पकडून ठेवायचा. पहिल्या गरोदरपणात खानदानी लोकांनी भरपूर छळलं. टोमणे, नासकी कुसकी बोलणी चालूच होती. राधाला या न त्या कारणाने घरातून घालवून मुलाचे नवीन लग्न करावे अशी सुप्त इच्छा. नणंदेचंही लग्न झालं. सासर दोन पावलांवर. कधीही, केव्हाही घरी येऊन ती सासूचे व नवर्याचे कान भरायची, राधाला घालून पाडून बोलायची. राधेच्या मैत्रिणींसमोर तिची अवहेलना करायची. नोकर, गडीमाणसांसमोर तिचा पाणउतारा करायचा. हे रोजचेच झाले होते. नवरा, सासू व नणंद तिला बावळट, माठ, मूर्ख असेच बोलवत. राधा सोसत होती. तिने प्राचीला बघितलं होतं. नवर्याशिवाय राहणारी बाई समाजाच्या घृणेस पात्र. त्या विवाहितेला सामाजिक स्थान काहीच नसते. हळदीकुंकू व इतर शुभ कार्यात तर जाऊ दे, पण रोजच्या व्यवहारातही तिला टक्के टोणपे सहन करावे लागतात. एक तिरस्कृत बाई. राधेच्या बाबतीत अस्सं सासर असं सुरेख बाई, पण माणसे दैत्य स्वभावाची. निरपराध, निरागस, साध्या एकट्या राधेला छळ छळ छळत होते. तक्रार कोण कुणाकडे करणार? घरच्या मोठ्या गाड्यातून फिरतेय. नवरा तिला दूरवर कुठे कुठे तिला घेऊन जात असतो. पदरी दोन गोंडस मुले. आणखी काय हवंय एखाद्या मुलीला? आतल्या भळभळणार्या जखमा राधा कुणालाही दाखवू शकत नव्हती. घरात चाललेला मानसिक छळ, शिव्याशाप, भांडण तंटे, पदोपदीचा अपमान कोण बघणार? ह्युमन राईटस्च्या बायका म्हणतील कीअसं कचरा कस्पटासारखं जीवन जगण्यापेक्षा चालतं व्हावं, मिळेल ते काम करून स्वाभिमानानं जगावं. राधेचे आईवडील तुटपुंज्या पेन्शनमधे काय करणार होते? ह्यांच्या घरातल्या मुलींना संस्कार नाही. एवढ्या तेवढ्यावरून नवरा घरदार सोडून पळतात, असं म्हणायला लोक टपलेले असतात. स्वाभिमान दाखवला म्हणून प्राचीच्या जगण्याचे हाल. समाज कुठे बदललाय्? राधा मुकाटपणे सहन करतेय. बाईने संसार सांभाळावा; अधिक उणे पदरात घ्यावं; घरातले हाल सोसणे केव्हाही चांगले.
ह्या दोन्ही मुली एकाच नात्यागोत्यातल्या, पण कमनशिबी! सीतेचं गहू गहू दुःख प्रत्येक स्त्रीच्या वाटेला आलंय् असं म्हणतात. त्या सकपाळबाईही म्हणतात की बायांनो, सहन करा, माफ करा, शेवट गोड होतो. पण अमूल्य आयुष्याचं वाळवंट होतं त्याचं काय? बाईचं दुःख क्षणभर थांबून ऐकतीलही; नंतर तिला व तिच्या घरच्यांना धोपटणारेच जास्त. सगळे ओरबाडायला बसलेले, उपदेश देणारे. हात धरून योग्य मार्ग दाखवणारे, मदत करणारे क्वचितच!
झोपेतून जागा झालेल्या मुलाने आईला विचारलं, ‘आई, ढेवरूफी वरींश ळी 26ींह गरर्पीरीू 2023 ना?’
‘हो रे बाळा, 2023 !!!’ (सत्यावर आधारित)