- रेखा नाबर
हो. मी डायरेक्ट घरीच आलो. उद्यापासून वर्क फ्राँम होम आहे. फाईल्स, लॅपटॉप, कागद सगळं आठवणीनं घ्यायला लागलं. त्या गडबडीत उशीर झाला. माझ्या आलंय लक्षात. मी करतो सगळं व्यवस्थित. तू काळजी नको करु. आता फोन ठेवतो आणि निघतो.
शंतनूने फोन ठेवला. घाईघाईने आत जाऊन आला व घराबाहेर पडला. आई आप्पा संभ्रमात पडले.
शंतनू, काय झालं? कसली घाई?
आल्यावर सांगतो.
दारात टू व्हिलर, फोर व्हिलर असतानासुद्धा तो पायीच निघाला. तिन्हीसांज झाली होती. लॉकडाऊनमुळे सगळी दुकानं बंद झाली होती. रस्त्यावर रहदारी नव्हती. म्युनिसिपालटीच्या दिव्यांचा पिवळा प्रकाश व कुत्र्यांचे नो भुंकणे ह्यांनी वातावरण भकास भासत होते. तो पुढे पुढे धावत होता. नजर चारही बाजूला काहीतरी शोधत होती. बाहेरच्या विषाणूने मनात भयाणू निर्माण केला होता. घाम पुसत पुसत तो पुढे पावले टाकीत होता. पोलिसांनी पकडले तर ह्या विचाराने उरात धडधडत होते. निघताना तो मास्क लावायला विसरला होता. निराशा व धास्ती ह्यांनी त्याच्या मनावर गारुड केले होते. घामाघूम झाल्यावर त्याने रुमालाने घाम पुसला व तोच रुमाल नाकावर, तोंडावर बांधला. इतक्यात त्याला आशेचा काजवा चमकताना दिसला. त्या दिशेने त्याने धाव घेतली. ती चहाची टपरी होती. धपापता उर शांत करीत, घाम पूसत तो तिथे पोहोचला. दोन मिनिटं त्याच्या तोंडून शब्द फुटला नाही. टपरीवाला प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागला.
चहावालेदादा, थोडं दूध द्या ना. काकुळतीच्या सुरात त्याने विनंती केली.
दादा, इतक्या उशीरा कुठे दूध घ्यायला आले?
सकाळपासून किती दूध विकलं. आता एवंढच राहीलं. रोज ह्यावेळी पोलीसांची गाडी येते. ते माझ्याकडे चहा पिऊन ड्युटीवर जातात. त्यांच्या चहापुरतंच दूध उरलंय.
तुम्ही द्या त्यांना चहा. पण त्यातलं थोडंतरी दूध द्या ना मला.
तो रडवेला झाला.
नाही हो जमणार. ती बघा आली पोलिसांची गाडी.
शंतनूने रुमाल नाकातोंडावर गच्च धरला. आलेल्या गाडीतून एक पोलीसदादा उतरले.
काय राव, लॉकडाऊनमध्ये शिळोप्याच्या गप्पा मारताय काय?
दमल्यामुळे व पोलीसांच्या भीतीमुळे त्याला धाप लागली होती. चहावाल्याने दिलेले पाणी पिऊन त्याला बरे वाटले.
ना--ही--हो--सा-हे-ब-थोडं-दूध-हवं-होतं.
दूध? ह्यावेळी? दिवसभर काय करत होतात? सगळी दुकानं सात वाजताच बंद झाली. आमचा चहा झाला की हा तंबीसुध्दा टपरी बंद करून जाणार.
साहेब, थोडा प्राँब्लेम आहे. माझा पाच महिन्यांचा मुलगा घरी म्हातार्या आईवडिलांकडे ठेवून आलोय. माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. काल रात्री ती कामावरून घरी आली होती. परंतु कोविडचे खूप पेशंटस् भरती झाल्यामुळे ती घरी येऊ शकणार नाही. तिने सांगितलेल्या वेळेत मी हाँस्पिटलमध्ये पोहोचू शकलो नाही. उद्यापासून आमचं ’वर्क फ्रॉम होम’ चालू आहे.
सगळे कागद, फाईल्स आठवणीने गोळा करुन घेण्यात वेळ गेला. म्हणून तिच्या हाँस्पिटलमध्ये जाऊ शकलो नाही. घरी आईबाबा आणि शौनक माझा मुलगा आहेत. त्या दोघांचं वय झालंय. त्यांना झेपत नाही. कामवाल्या बायाही येत नाहीत. दूध हवंच ना शौनकला? नाईलाजाने बाहेर पडावं लागलं. सॉरी साहेब.
शंतनू रडवेला झाला. हवालदार साहेबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं.
तंबी,असेल ते सगळं दूध ह्या साहेबांना दे.
सा--हे--ब तुमचा चहा?शंतनूची शंका.
काय राव?हीच किंमत केलेत का आमची?चहा नाही प्यायलो तर मरणार आहोत का आम्ही? ते
लेकरू दुधावरच अवलंबून आहे. त्याला दूध ताबडतोब मिळालं पाहिजे. शंतनूने पर्याय सुचविला.
साहेब, मी काय म्हणतो.
निम्म्या दुधाचा चहा करु दे.उरलेलं दूध मी नेतो.
पुरेल ना तेवढं शौनकला?
’हो.उद्या सकाळी मिळेल ना कुठेही. कर रे तंबी चहा अर्ध्या दुधाचा.उरलेलं दूध दे ह्या थर्मासमध्ये.
तंबीने शंतनूला दूध दिले व तो चहा करायला लागला. शंतनूने पैसे पुढे केले.
दादा, लेकराच्या दुधाचे पैसे घेऊन ते पाप कुठे फेडू? काका आहे मी त्याचा. ठेवा ते पैसे.
आशिर्वाद आहेत तुला तंबी. धन्यवाद. बरंय दादा.
निघतो आता.
कुठे निघालात?
घरी जातो दूध घेऊन आई आप्पा वाटेकडे डोळे लावून बसले असतील. शौनकसुध्दा जागा होईल.
वा राव. मास्क न लावता रस्त्यातून जाणार का?
हा घ्या मास्क.लावा आणि बसा गाडीत. म्हणजे मला पोलिस स्टेशनवर नेणार का?
दादा,आमची गाडी फक्त पोलीसस्टेशनवर जाते का?अर्धा कप चहा प्या आणि बसा गाडीत.
घरी सोडतो तुम्हाला.शौनकला लवकर दूध मिळेल. आईआप्पांना हायसं वाटेल.तंबी,उद्या सकाळी लवकर ह्यांच्या घरी दूध पोहोचवायचं.
फोन नंबर, पत्ता द्या त्याच्याकडे. साहेब, वर्दीत असलो तरी माणसं आहोत आम्ही.
माणसं कुठे? देव आहात तुम्ही. देवळं बंद केली तेव्हा देव तुमच्या रुपात येऊन जनतेची सेवा करतोय.
फक्त आम्हीच नाही, तर आमच्या वहिनी म्हणजे तुमच्या पत्नीसुध्दा ह्याच पठडीतल्या आहेत. आईचं काळीज आहे त्यांचं.लेकरू लांब. त्यातून दुधाची चणचण.केवढी काळजी लागली असेल त्यांना. त्याही परिस्थितीत काळजावर दगड ठेवून हसतमुखाने रुग्णांची सेवा करत असणार ती माऊली. धन्य ते योगदान. दूध मिळाल्याचं कळवलत की नाही?कळवा लवकर.
हो हो शंतनूने आनंदीत होऊन शांभवीला मेसेज केला.
फक्त आमच्या वहिनीच नाही, तर दादा तुम भी कुछ कम नही. आई वडिलांची किती काळजी करता! ‘पुत्र व्हावा ऐसा’ असंच वाटत असेल त्यांना.
पोलीसदादांनी कौतुक केले. ते माझं कर्तव्यच आहे. ह्या कोरोनाचा हाच सकारात्मक परिणाम. माणसामाणसातल्या बंधांची जाणीव झाली. खरं आहे तुमचं.चला निघू या. गाडी धुरळा उडवत निघून गेली. तंबी डोळे पुसत पुसत गुणगुणत होता देव देव्हार्यात नाही.
Link Copied