रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी बॉलीवूडमध्ये कायम चर्चेत असते. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर या जोडीने १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. डेस्टिनेशन वेडिंग करण्यापेक्षा आलिया-रणबीरने घरच्या घरी लग्न करण्यास पसंती दर्शवली. या दोघांच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
लग्न समारंभातील प्रथेनुसार वधूच्या बहिणी नवऱ्या मुलाच्या चपला किंवा शूज पळवतात व त्यानंतर भेटवस्तू मागतात. रणबीरच्या लग्नात आलियाच्या बहिणींनी शूज पळवल्यावर अभिनेत्याने त्याच्या मेव्हणीला ११ ते १२ कोटी रुपये दिले होते अशा चर्चा तेव्हा सर्वत्र रंगल्या होत्या. याबाबत रणबीरने कपिल शर्माच्या शोमध्ये खुलासा केला आहे. रणबीर कपूर, त्याची आई नीतू व बहीण रिद्धिमा यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी कपिलने रणबीरला लग्नात या शूज पळवण्याच्या विधीबद्दल विचारलं.
कपिल म्हणाला, “आम्ही असं ऐकलंय की, तुमच्या लग्नात आलियाच्या बहिणींनी तुझे शूज चोरले होते आणि ते परत घेण्यासाठी तू मेव्हणीला ११ ते १२ कोटी दिलेस, हे खरं आहे का?” यावर रणबीर म्हणाला, “आलियाच्या कोणत्याही बहिणीने माझ्याकडे एवढे कोटी रुपये वगैरे मागितले नाहीत. त्यांनी शूज चोरल्यावर काही लाखांची मागणी केली होती. पण, मी त्यांच्याबरोबर बार्गनिंग करून त्यांना काही हजारांवर आणलं आणि तेवढेच पैसे मी त्यांना दिले होते.” “आमचं लग्न तसंही घरच्या घरी झालं होतं. त्यामुळे जरी त्यांनी मला शूज दिले नसते, तरीही ते घरीच राहिले असते. मी पण घरी असाच राहिलो असतो.” असं मजेशीर उत्तर रणबीर कपूरने दिलं.
दरम्यान, आलिया भट्ट व रणबीर कपूर आता सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. २०२२ च्या एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधल्यावर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी अभिनेत्रीने गोंडस लेकीला जन्म दिला. या जोडप्याची लेक राहा सुद्धा आता सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. लवकरच ही जोडी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात एकत्र झळकणार आहे.