गुलाब श्रीखंड
साहित्य : अर्धा लीटर दही, 2 टेबलस्पून गुलकंद, अर्धा वाटी गुलाबाची पानं, दीड वाटी पिठी साखर.
कृती : दह्याचा चक्का तयार करून एका भांड्यात काढून घ्या. त्यात साखर चांगली एकजीव करून घ्या. नंतर हे मिश्रण चाळणी किंवा बारीक कापडाने चाळून घ्या. गुलकंदामध्ये 2 टेबलस्पून बारीक चिरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालून चांगलं एकत्र करा. हे गुलकंद दह्याच्या मिश्रणात घालून व्यवस्थित घोटून घ्या. हे मिश्रण तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. श्रीखंड वाढताना त्यावर उर्वरित गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवा.
मिश्र फळांचं श्रीखंड
साहित्य : अर्धा किलो तयार साधं श्रीखंड (केशर वेलची श्रीखंडही घेता येईल), 1 वाटी दूध, 2-अडीच वाटी मिश्र फळांचे बारीक तुकडे (सफरचंद, केळं, आंबा, चिकू, द्राक्षं, अननस, डाळिंब इत्यादी),थोडी चारोळी.
कृती : एका भांड्यात दूध आणि श्रीखंड एकत्र करा. हे मिश्रण डावाने चांगलं घोटून घ्या. नंतर त्यात फळाचे बारीक तुकडे आणि चारोळ्या घालून एकत्र करा. तयार मिश्र फळांचं हे श्रीखंड काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर थंडगार सर्व्ह करा.