पुरणाची कचोरी
साहित्य : 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून तेलाचं मोहन, स्वादानुसार मीठ, 2 वाटी तयार पुरण, अर्धा वाटी (कोरडाच परतवलेला) खवा, अर्धा वाटी नारळाचा कीस, पाव वाटी सुकामेव्याचे तुकडे, 1 टीस्पून भाजलेली खसखस, स्वादानुसार वेलची आणि जायफळ पूड, तळण्यासाठी तेल.
कृती : गव्हाच्या पिठात तेलाचं मोहन आणि मीठ घालून घट्ट मळून घ्या. एका भांड्यात पुरण, खवा, खसखस, वेलची पूड, जायफळ पूड, सुकामेव्याचे तुकडे आणि नारळाचा कीस एकत्र करून सारण तयार करा. पिठाची पुरीप्रमाणे पारी तयार करून, त्यात हे सारण भरा आणि कचोरी तयार करा. कचोरी गरमागरम तेलात खरपूस तळून घ्या.
पुरणाची बाकरवडी
साहित्य : 2 वाटी मैदा, 2 टीस्पून तेलाचं मोहन, 1 वाटी शिजवलेलं पुरण, 2 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, प्रत्येकी 1 टीस्पून आमचूर पूड, धणे-जिरे पूड व चाट मसाला, स्वादानुसार मीठ, 2 टीस्पून तीळ, थोडी बारीक कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.
कृती : मैद्यात तेलाचं मोहन आणि मीठ घालून घट्ट मळून घ्या. एका भांड्यात पुरण आणि उर्वरित सर्व साहित्य एकत्र करा. पिठाची मोठी पोळी लाटून, त्यावर पुरणाचं मिश्रण पसरवा आणि घट्ट गुंडाळी करा. नंतर या गुंडाळीचे साधारण पाऊण इंचाचे तुकडे करून गरम तेलात खरपूस तळून घ्या.