पुरण पोळी
साहित्य : 4 वाटी चणा डाळ, 3 वाटी गूळ, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी तेल.
कृती : गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र चाळून, एकदम मऊ पीठ भिजवा. हे पीठ स्टीलच्या भांड्यात ठेवून त्यात बोटांनी दाबून खड्डे करा. त्यावर सर्व खड्डे भरतील इतकं तेल घालून किमान दोन तासांकरिता हे पीठ तसंच ठेवून द्या. नंतर पुन्हा चांगलं मळून घ्या.
चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर चाळणीतून गाळून त्यातील जास्तीचं पाणी बाजूला काढून ठेवा. (या जास्तीच्या पाण्यालाच ‘डाळीचा कट’ म्हणतात. त्यासाठी मुद्दामहून जास्त पाणी घालून डाळ शिजवा.)
कढईमध्ये शिजलेली चण्याची डाळ आणि गूळ घालून पूर्णतः कोरडी होईपर्यंत शिजवा. आवडत असल्यास त्यात स्वादानुसार वेलदोड्यांची किंवा जायफळ पूड घाला. हे मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्या. पुरण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
पिठाचा लिंबाच्या आकाराचा आणि पुरणाचा त्याच्या दुप्पट आकाराचा गोळा तयार करा. पिठाच्या गोळ्याची वाटी तयार करून त्यात पुरणाचा गोळा घालून बंद करा. हा गोळा हाताच्या तळव्यावर ठेवून अलगद दाबा. नंतर तांदळाचं भरपूर पीठ लावून पोळी लाटा. पोळी लाटताना अधूनमधून हातावर घेऊन पोळपाटाला चिकट नाही, याची खात्री करून घ्या. पोळी लाटतानाही त्यास मधूनमधून तांदळाचं पीठ लावत राहा. तवा अगदी मंद आचेवर गरम करा. पोळीवर तळहात ठेवून पोळपाट उलटं करा आणि ही पोळी अलगद गरम तव्यावर ठेवा. पोळी मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरमागरम पुरण पोळी दूध किंवा कटाच्या आमटीसोबत सर्व्ह करा.