Close

इलाज (Short Story: Illaj)

  • डॉ. सुमन नवलकर

    डॉक्टरांनी अप्पूला नीट तपासलं. कुठे दुखतं, कसं दुखतं विचारलं, पोटाला हात लावून पाहिलं. मग म्हणाले, “ताबडतोब हॉस्पिटलला न्यायला हवं याला.” “एवढं काय झालंय त्याला. अचानक डॉक्टर?”
    “अपेंडिसायटीस. एवढ्या लहानपणी?”


    आज्जी माझ्या पोटात दुखतंय.” परिजितची तक्रार ऐकून वसुधा हसली. गृहपाठ झालेला नसला, शाळेत नावडीचा तास असला, जास्त शिस्त लावणार्‍या बाईंच्या शिक्षेची भिती असली, घरी कोणी पाहुणे येणार असले, घरात कोणाचा वाढदिवस असला, कधी घरात केलेलं जेवण न आवडणारं असलं किंवा कधी जेवणापेक्षा महत्त्वाचं असं दुसरं काही कारण असलं की मुलांच्या पोटात दुखतंच. वसुधा स्वत: शाळकरी मुलगी होती तेव्हा तिच्याही दुखायचं अनेकदा. शिवाय राधिका आणि राजसची पोटदुखी तर ऐकून ऐकून पाठ झाली होती वसुधाला. वर्ल्ड कपच्या वेळी तर राजसच्या सतत आठ आठ दिवस पोटात दुखायचं. अपरिजित तर राजसचाच मुलगा शिवाय राधिकाचाही भाचा. म्हणजे अनुवांशिकतेने अपरिजितमध्ये ती पोटदुखी येणं स्वाभाविकच.
    “थांब, ओवा देते थोडा. तो चावून चावून खा. गॅस-बिस झाला असेल तर जाईल पोटातून मग थांबेल पोटात दुखायचं. वसुधाने नातवाला चिमूटभर ओवा दिला “आज्जी तिखट.” हा-हू करत अपराजितने ओवा चावून-चावून खाल्ला. थोड्या वेळाने, “आजी माझ्या पोटात दुखतंंय,‘ अशी पुन्हा तक्रार झाली. या वेळी वसुधाने त्याला हिंगाचं पाणी प्यायला दिलं. नंतरच्या वेळी त्याला पाठीवर झोपवलं आणि पोटाला थोडा बाम लावला. त्यानंतरच्या वेळी त्याने अर्धा चमचा अँटासिड दिलं. पण अपरिजितची तक्रार संपेना. शाळेची बस यायची वेळ जवळ येत चालली होती. पण अप्पूची पोटदुखी काही थांबत नव्हती.
    शेवटी वसुधाने हुकूमी एक्का फेकला, “चल डॉक्टरकडे जाऊ. ते एक इंजेक्शन देतील. मग लगेच बरं वाटेल.”
    “आज्जी इंजेक्शन नको.”
    “मग चल तर पटकन जेवायला. अजून कपडे बदलायचेेत. बसवाला थांबत नाही माहितीय ना?”
    अप्पूने आळोखे- पिळोखे देत शर्टाच्या हातांमध्ये आपले हात आणि पँटच्या पायांत आपले पाय कोंबले कसेबसे. मग वसुधाने त्याला जेवायला वाढलं. अप्पूला आवडतात म्हणून वसुधाने बटाट्याची काप तळली होती. तरीही अप्पू मनापासून जेवला नाही. “आज्जी, बस्स.”
    “आता शेवटचे दोन घास राजा. अन्न टाकू नये.“ म्हणत वसुधाने त्याला भरवलं. चूळ भरून, पाणी पिऊन अप्पूने बूट मोजे चढवले आणि निघाली एकदाची स्वारी शाळेला. त्याला बसमध्ये बसवून वसुधा घरी आली, “शाळेत जाऊन पाहायला पाहिजे काय झालंय ते. रसिका आली दिल्लीहून की कानावर घातलं पाहिजे तिच्या. या हल्लीच्या पोरी. यांना करिअरपुढे मुलांकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. राजसचं तर जणू नोकरीशीच लग्न लागलंय.”
    वसुधाने जेवून घेतलं. उरली-सुरली कामं आवरली आणि पेपर घेऊन ती आरामखुर्चीत विसावली. अप्पूच्या जन्मानंतर वसुधाने स्वेच्छानिवृत्ती घेतली. विक्रमचा स्वत:चा छापखाना. तो काही स्वेच्छा निवृत्त होणारच नाही कधी. पण आपल्याला घर आणि नोकरी अशा दोन-दोन आघाड्या नाही लढवता येत हल्ली. शिवाय रसिकाला तर महिन्यातून चारदा बाहेरगावी जावं लागतं. राजसचं ते तसं. मग आपणच घ्यावी झालं स्वेच्छानिवृत्ती.
    वाचता वाचता वसुधाचा डोळा लागला. एरव्ही विक्रमचा दुपारी फोन येतो. आज त्याचाही फोन आला नाही. पाठ्यपुस्तकाचं काम आलंय. प्रेशर खूप वाढलंय कामाचं. घराबाहेर जाण्याची प्रत्येकाची वेळ ठरलेली. घरी परत येण्याची वेळ मात्र कोणाचीच नाही ठरलेली. एक अप्पूची सोडून.
    तेवढ्यात बेल वाजली. आरामखुर्चीतून उठायला वेळच लागला वसुधाला. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली “काय तरी बाई हे लोक, जरा धीर धरवत…….” दार उघडल्यावर वसुधाची विचारशृंखला तुटलीच. दारात अप्पू बरोबर शाळेचा शिपाई.
    “अग बाई काय झालं?“
    “ताई, घिऊन आलोया याला शालंतून. लईच प्वाटात दुखुतया म्हनला, म्हून प्रिन्शिबलबाईनी घरला घिऊन जायला सांगितलं.“
    “या-या ” अप्पूला आत घेता-घेता वसुधा शिपायाला म्हणाली.
    “नको. म्या जातुया. या प्वाराला तेवडं बगा काय झालंया ते.”
    वसुधा अप्पूचे बूट मोजे काढेपर्यंत अप्पू पोट दाबूनच बसला होता. वसुधाने त्याला उचलून कॉटवर नेऊन झोपवलं. त्याच्या पोटावरून हलका-हलका हात फिरवत तिने विचारलं “खूप दुखतंय का राजा?” अप्पूने नुसती होकारार्थी मान हलवली. त्याचे डोळे भरून आले होते.
    मग मात्र वसुधाला राहवेना. तिने भराभर राजस, विक्रमला फोन लावले. रसिकाला कळवायला राजसलाच सांगितलं आणि सहाव्या मजल्यावरून डॉक्टर भंडांरींना फोन लावला. “जरा डॉक्टर, प्लीज डॉक्टर भलत्यावेळी त्रास देतेय तुम्हाला.. पण माझ्या नातवाच्या जरा जास्तच दुखतंय पोटात.”
    डॉक्टर भंडारी आले लगेच. नुकतेच घरी येऊन जेवले होते. पण आले लगेच, वसुधाला हुश्श झालं. डॉक्टर भंडारींचं रोगनिदान अचूक असतं. ते बरोब्बर सांगणार काय ते. डॉक्टरांनी अप्पूला नीट तपासलं. कुठे दुखतं, कसं दुखतं विचारलं, पोटाला हात लावून पाहिलं. मग म्हणाले “ताबडतोब हॉस्पिटलला न्यायला हवं याला.”
    वसुधा एकटीच आहे असं पाहून ते म्हणाले, “मी घरी जाऊन कपडे बदलून येतो. तुम्ही तयार रहाच. मी गाडी काढतो. टॅक्सी शोधायला नको. तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे.” वसुधा पूर्णच खचली,“एवढं काय झालंय त्याला. अचानक डॉक्टर? त्याने बाहेरचं काही खाल्लंही नाहीये.“
    “अपेंडिसायटीस“
    “एवढ्या लहानपणी?“
    “अपेंडियसायटीस कोणत्याही वयात होऊ शकतो. दादरच्या साठे क्लिनिकमध्ये नेऊया याला. तिथले डॉक्टर साठे माझ्या परिचयाचे आहेत. तुम्ही विक्रमभाईना कळवा.
    राजसला कळवा. तिथंच या म्हणावं सरळ. आपण निघूया ताबडतोब.”
    वसुधाने फोन करेपर्यंत डॉ. भंडारी आले देखील. डॉ. भंडारींनी अप्पूला उचललं. वसुधाने दरवाजाला कुलूप लावलं. गाडीपाशी पोहोचल्यावर डॉ. भंडारींनी अप्पूला वसुधाच्या
    स्वाधीन करून गाडीचा दरवाजा उघडला. मागचा दरवाजा उघडून
    अप्पूला तिथे झोपवायला सांगितलं. तिघेही हॉस्पिटलला रवाना झाले. तातडीने ऑपरेशन करावं लागलं. कितीवेळ वसुधा एकटीच होती. अस्वस्थपणे विक्रम आणि राजसची वाट पाहत होती. अगतिक आणि असहाय. ऑपरेशन झाल्यानंतर थिएटरच्या बाहेर आल्यावर डॉ. साठे म्हणाले, “आणखी जरा उशीर झाला असता तर काही खरं नव्हतं. कसं काय इतकं अचानक झालं बुवा!”
    “अचानक नाही तसं. सकाळपासूनच तो ‘दुखतंय-दुखतंय‘ सांगत होता. पण मला वाटलं शाळेत जायचं नाही म्हणून नाटकं करतोय. ओवा, हिंग, अँटासीड, बाम लावणं सगळं सगळं केलं मी. शेवटी इंजेक्शनचं नाव काढलं तेव्हा कुठे जेवून शाळेत गेला.“

    “हो, पण माझ्या काही लक्षात आलं नाही त्याचं गांभीर्य.“
    “हो, आम्ही पण नेहमी हिला सांगायचो लहानपणी की पोटात दुखतंय म्हणून. पण ही कधी विश्‍वास ठेवायची नाही. आज कळलं ना आई, की आम्ही खरंच सांगायचो.”
    “पुरे-पुरे बनेल पोरानो. तुमच्यामुळे माझं अप्पू बाळ बिचारं एवढं जीव तोडून सांगत होतं मला, आजी पोटात दुखतंय म्हणून, तरी विश्‍वास नाही ठेवला मी. त्या लांडगा आला रे आला गोष्टीतल्या सारखं झालं माझं.” हलक्या फुलक्या संवादामुळे प्रसंगाचं गांभीर्य कमी झालं.
    “रसिका उद्या सकाळच्या फ्लाईटने येतेय. मघाशी कळवलं मी तिला.”
    “शुद्धीत कधी येईल तो डॉक्टर?” विक्रमने डॉक्टर भंडारींना विचारलं. “येईल लवकरच, पण शुद्धीवर आल्यावर खूप दुखणार त्याला.”
    डॉ. साठे म्हणाले, “तसं पेनकिलर देणार त्याला सलाईन मधून, पण तरीही दुखणार खासच. “एवढासा जीव आणि एवढ मोठं ऑपरेशन. वसुधा खचूनच गेली होती. कॉटवर गुंगीत झोपलेल्या अप्पूकडे पाहून तिचे डोळे भरून भरून येत होते. ते बाळं बिचारं; इतकं दुखत होतं त्याला पण इंजेक्शनच्या भीतीने शाळेतही गेलं. बिचार्‍याला काय माहित इतकं मोठ ऑप्रेशन त्याच्या नशिबात लिहिलं होतं म्हणून.
    दुसर्‍या दिवशी रसिकाही आली दिल्लीहून. आईला पाहून अप्पूही सुखावला. अप्पू हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत सर्वांनीच सुट्टी घेतली होती. अप्पूला घरी आणल्यानंतर मात्र हळूहळू एकेक जण आपापल्या नोकरी- धंद्यावर रुजू झाले. पुन्हा आजी- नातवाची जोडी जमली. वसुधाने कॉटवरून खाली म्हणून उतरू दिलं नाही नातवाला. सारखी आपली त्याच्या अवतीभवती असायची. सकाळी लवकर उठून सगळी कामं उरकून घ्यायची. सगळे घराबाहेर पडायच्या आत स्वत:ची आंघोळही उरकून घ्यायची. अप्पूला एकटं म्हणून सोडायची नाही. अप्पू बरा होऊन शाळेत जायला लागल्यावरही वसुधा सतत तणावाखाली वावरत असायची. “अप्पू बरा तर होईल ना? पडणार तर नाही ना?” दुपारची तिला झोपही यायची नाही. खुर्चीत वाचता वाचता डोळा लागला तरी मध्येच बेल वाजल्याचा भास व्हायचा. अप्पूला शिपाई घेऊन आला की काय? मग ती धडपडत उठून दार उघडून आत पहायची बाहेर कुणीच नसायचं.
    “आजी मी स्काउटला जाऊ?”
    “नको रे बाबा, आत्ता, कुठे एवढ्या मोठ्या
    दुखण्यातून उठलायस.”
    “मी आई बाबाना विचारतो.”
    “जा पाहिजे तर”,
    राजसने म्हटलं.
    “जाऊ दे ना आई त्याला” रसिकाचंही म्हणणं पडलं.
    “कसलं जाऊ दे? तुम्ही कोणी घरात नसता. पुन्हा काही झालं तर त्याला?”
    “आता काय होणार आई? अपेन्डिक्स तर एकच असतं. ते तर काढून टाकलं. मग पुन्हा काय होणार?”
    “पुरे चावटपणा. काही गरज नाहीए स्काउट-बिऊटमध्ये जायची. शाळेत जातोय तेवढं पुरे.” नंतर एकदा अप्पूच्या वर्गाची सहल निघाली. सकाळी जाऊन रात्री येणार.
    “आज्जी, आम्ही एस्सेल वर्ल्डला जाणार” अप्पू नाचत नाचत म्हणाला
    “आम्ही म्हणजे?”
    “आमची ट्रिप जाणार आहे, मज्जा.”
    “एस्सेल वर्ल्डला ट्रिप? नको रे बाबा, कुठे पडलास बिडलास, तर परत काहीतरी व्हायचं”
    “पडणार कशाने? बाई आहेत. शिपाई पण आहेत. आमच्या वर्गातील सगळी मुलं जाणारैत आज्जी.”
    “त्यांना जायचंय तर जाऊ देत, आपण घरातून जाऊ एकदा सगळे जण.”
    “आज्जी तेव्हा माझे मित्र थोडेच असणारेत? मित्रांबरोबर किती मज्जा येते माहितीय? मी गेल्या वर्षी नाही का नॅशनल पार्कला गेलो होतो. खूप मज्जा आली होती.”
    “पण हल्ली बरं नव्हतं ना तुला?”
    “त्याला खूपखूप दिवस झाले आज्जी. आता बरा झालोय मी आज्जी. मला जायचंय.”
    पण वसुधाचं वेडं मन काही मानेना विक्रम, राजस, रसिका सगळ्यांनी समजावलं तिला. पण वसुधा एकेना. वसुधासमोर सर्वांनी हात टेकले.
    “येत्या रविवारी चार वाजता कार्यक्रमाला जायचंय हं का वसुधा.”
    “कसला रे कार्यक्रम?“
    “अग, अपंगंाच्या शाळेचा आहे. मी दरवर्षी त्यांच्या निमंत्रणपत्रिका त्यांना मोफत छापून देतो. दरवर्षी बोलवतात ते. पण या वर्षी जरा जास्तच मागे लागलेत. जाऊ आपण.”
    “मी पण येणार” अप्पू म्हणाला
    “मग, माझ्या राजाला नेणारच.”
    रविवारी अप्पू आजी नातवांबरोबर अपंगांच्या शाळेतला कार्यक्रम पाहायला गेला. जन्मापासून अपंग, पोलियोमुळे अपंगत्व आलेली, अपघातामुळे अपंगत्व आलेली, अंध, मुकी, बहिरी विविध प्रकारची शारीरिक वैगुण्य असलेली मुलं स्टेजवर वावरत होती. नृत्य, नाट्य, अभिनय- सर्व प्रकारचे कार्यक्रम मुलांनी सादर केले. शेवटी अंध मुलांनी सादर केलेल्या वेताच्या मलखांबाना तर टाळ्यांचा कडकडाट झाला. अप्पू अगदी खुशीत होता. हल्ली त्याला आजी, अंगणात खेळायला देखील पाठवायची नाही. त्यामुळे तो रविवारी तर अगदी कंटाळलेला असायचा. आज त्याचा वेळ अगदी चांगला गेला होता.
    “काय तरी बाई. आपण तर विचार देखील करू शकत नाही नै?” वसुधा तर स्तिमितच झाली होती.
    “विचार करू शकतोस नाही म्हणून नव्हे तर विचार करावास म्हणून घेऊन आलो तुला इथे.” येताना आजी-नातवाच्या गप्पा रंगात आल्या होत्या.
    “आज्जी त्यांना दिसत नसून पण कसं छान केलं त्यांनी?”
    “स्पर्शाने करतात बाळा ते सर्व गोष्टी. तुला माहितीये अप्पू? माणसाचं एखादं इंद्रिय जरी काम करेनासं झालं, तरी इतर इंद्रिय जरा जास्तच कार्यक्षम होतात.”
    “इंद्रिय म्हणजे काय गं आज्जी?”
    “इंद्रिय म्हणजे अवयव.”
    “आणि कार्यक्षम म्हणजे गं?”
    “कार्यक्षम म्हणजे काम करण्याची कुवत असणारे.”
    “कुवत म्हणजे गं आज्जी?”
    “कुवत म्हणजे कप्पाळ…”
    घरी आल्यावर वसुधाने रसिकाला विचारलं, “यांची ट्रिपची पैसे भरण्याची तारीख उलटली का ?”
    “नाही आई, उद्या शेवटचा दिवस आहे.”
    “भरा गं पैसे त्याचे, बिचारा हिरमुसलाय.”
    रसिकाने हळूच सासर्‍यांकडे बघून ‘ही काय किमया?’
    अशा अर्थाचं खुणेनेच विचारलं. विक्रम खांदे उडवून हसला फक्त.

Share this article