Close

साखरपुड्याच्या व्हायरल बातमीवर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिता आणि टप्पूने दिलं स्पष्टीकरण (Munmun Dutta And Raj Anadkat Reacts To Engagement Rumors)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत बबिताचं पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजेच राज अनादकट यांचा साखरपुडा झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. या सर्व चर्चेवर राजच्या टीमनं आणि मुनमुननं प्रतिक्रिया दिली आहे. ही सर्व अफवा आहे, असं राजच्या टीमनं आणि मुनमुननं सांगितलं आहे.

बबिता फेम मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांनी काही दिवसांआधी गुजरात येथील वडोदरामध्ये साखरपुडा उरकल्याचं वृत्त काही वृत्तवाहिनीकडून देण्यात आलं होतं. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं अभिनेत्रीने निवेदन जारी करत स्पष्ट केलं आहे.

“एकदम वाईट आणि हास्यास्पद! या व्हायरल बातमीत काहीच तथ्य नाही. मी अशा खोट्या बातम्यांवर माझा वेळ आणि शक्ती वाया घालवणार नाही.” असं मुनमुनने तिच्या निवेदनात म्हटलं आहे. याशिवाय “सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी ही पूर्णपणे खोटी आणि अर्थहीन असून, यावर कोणीही विश्वास ठेऊ नका” असं स्पष्टीकरण राज अनादकटच्या टीमकडून इन्स्टाग्रामवर देण्यात आलं आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये अभिनेता भव्या गांधीच्या जागी या शोमध्ये टप्पूच्या भूमिकेसाठी अभिनेता राज अनादकटची वर्णी लागली होती. तर मुनमुन सुरुवातीपासून या मालिकेचा एक भाग आहे. तिला आता घरोघरी बबिता अशी ओळख मिळाली आहे.

Share this article