-ऋषिकेश वांगीकर
आपणच फक्त मागे राहिलो हे कळल्यावर त्या मुलाचे अवसान गळाले आणि कुठलाही विचार न करता त्याने मोटर व्हॅनचा बंद दरवाजा पकडला. जिकडे धड पायही ठेवता येत नाही अशा बंद दरवाज्याच्या फूटबोर्ड वर तो चढला आणि गाडी सुरू झाली.
आज बर्याच दिवसांनी दादरला जाण्याचा योग आला. निमित्त होते एका पुस्तक प्रकाशनाचे. संध्याकाळ असल्याने जाताना लोकलला फारशी गर्दीही नव्हती. त्यामुळे आरामात दादरला पोहचलो. यथासांग कार्यक्रम पार पडला आणि निघता निघता रात्रीचे 9 वाजले. दादर स्टेशनवर आलो तर प्लॅटफॉर्म वर तुडुंब गर्दी. सवय नसल्याने एकंदरीत गाडीत चढणे अवघड वाटत होते. प्लॅटफॉर्मवरच एकाला विचारले, “डोंबिवलीला जायला आता फास्ट लोकल आहे?”
त्याने एकवार माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, “आहे, पण कसारा लोकल आहे. खूप पॅक असते ती. अजून 15 मिनिटांनी दादर-कल्याण लोकल आहे. सरळ ती पकडा, बरी पडेल तुम्हाला.” मला तो ऑप्शन बरा वाटला. त्याचे आभार मानून गाडीची वाट पाहू लागलो. अखेर गाडी आली ती 10 मिनीटे उशिरानेच. आल्या आल्या लोकांनी ज्या फोर्सने चढायला सुरुवात केली, ते पाहून माझे धाबेच दणाणले. पूर ओसरल्यावर पाण्यात शिरावे तसे मी अगदी शेवटी गाडीच्या डब्यात चढलो; तेही दारातल्या दोन माणसांच्या मेहेरबानीमुळे. गाडी सुरू झाली. माटुंगा, सायन गेले आणि कुर्ल्याला काही तरुण मुले गाडीत चढली. त्यांची दारातूनच लोकांना अरेरावी सुरू झाली. त्यांच्यापैकी एकजण दारातल्या खांबाला एका हाताने धरून चालत्या गाडीत कसरती करत होता, कुठे खांबाला हात लाव, कुठे उलट्या साईडला बघ, अशा जीवघेण्या मस्त्या चालल्या होत्या. बाकीचे लोक एकमेकांकडे बघण्याशिवाय काही करत नव्हते. शिवाय त्या मुलांची भाषा देखील अर्वाच्य आणि शिवराळ असल्याने कुणी त्यांना हटकायला देखील धजावत नव्हते.
आणि अशातच, एक माणूस माझ्याच साईडने पुढे आला, आणि काही कळायच्या आतच त्याने त्या दारातल्या पोराला आत खेचले आणि त्याच्या सणसणीत कानफडात मारली. असा एकाएकी हल्ला झाल्याने बाकीची पोरे वरमली आणि पुढच्याच स्टेशनवर उतरून पसार झाली.
साधारण 38-39 वर्षांचा असावा तो तरुण. उंच, गोरा आणि तरतरीत.
मी त्याला विचारले, “काय झालं?… तुम्ही त्या मुलाला??”
“हो. जाणून बुजूनच मारले त्याला. म्हणजे पुढच्या वेळी असे करायची हिंमत होणार नाही त्यांची. अहो, नकळत्या वयातली ही अल्लड पोरं. त्यांना ना स्वतःची काळजी ना घरच्यांची. उद्या काही बरं-वाईट झालं तर घरच्यांनी काय
करायचं? कुठे जायचं?”
“तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, पण ह्या गोष्टींना अटकाव कोण आणि कसा करणार?” मी म्हणालो.
“का? आपणच करायचा. भले त्या वेळेला बाचाबाची होईल. एखादा फटका दिला आणि घेतला जाईल. पण शेवटी त्या व्यक्तीचा जीव तर वाचेल?” त्याचे बोलणे एकदम पटण्यासारखेच होते.
तो पुढे म्हणाला, “तुम्हाला सांगतो, साधारण 94-95 ची गोष्ट असेल. ‘हम आपके है कौन?’ नुकताच रिलीज झाला होता. तो बघण्यासाठी डोंबिवलीचे काही मित्र ठाण्याला 6 ते 9 च्या शो ला गेली होती. येण्याच्या वेळेला ठाण्याला प्रचंड गर्दी होती. शेवटची फास्ट लोकल तीही कसारा या सर्वांनी ठरवले की काहीही करून ती लोकल पकडायचीच. तेवढेच लवकर घरी जाता येईल. ज्याला जिथे चढायला मिळेल तिथे चढा. झाले! गाडी आली आणि प्रचंड गोंधळ उडाला. या सर्व गोंधळात एकजण खालीच राहिला. आणि बाकी सर्वजण चढले. आपणच फक्त मागे राहिलो हे कळल्यावर त्या मुलाचे अवसान गळाले आणि कुठलाही विचार न करता त्याने मोटर व्हॅनचा बंद दरवाजा पकडला. जिकडे धड पायही ठेवता येत नाही अशा बंद दरवाज्याच्या फूटबोर्ड वर तो चढला आणि गाडी सुरू झाली. फास्ट लोकलच ती. धाडधाड करत पारसिकचा बोगदा, मुंब्रा, दिवा मागे टाकत 15 मिनिटात डोंबिवलीत पोहचली. सर्वजण आपापल्या घरी गेले. फक्त तो मुलगा सोडून. त्यावेळी हल्लीसारखे मोबाईल नसल्यामुळे सारखे कॉन्टॅक्ट करता येत नव्हते. 10 वाजले, 11 वाजले तरी तो मुलगा घरी न आल्याने घरचे काळजीत पडले. त्याच्या आईला एका मित्राचे घर माहित होते, म्हणून त्याच्या वडिलांना घेऊन ती तशीच निघाली. पण पोहचल्यावर त्यांना कळले की हा मुलगा सोडून बाकी सर्वजण घरी आले होते. ‘ठाण्यापर्यंत आम्ही एकत्र होतो पण गाडी आल्यावर आमची चुकामुक झाली.’ असे त्याने सांगितल्यावर त्या मुलाच्या आईने तर रडायलाच सुरुवात केली. थोड्या वेळाने सर्व मित्रांबरोबर त्यांच्या घरचेही काळजीत पडले आणि जो तो आपापला तर्क लावू लागला.
एव्हाना त्या मुलाच्या वडिलांना भलतीच शंका यायला सुरुवात झाली. फक्त त्यांनी आईला बोलून दाखविले नाही. इतकेच. ते सरळ डोंबिवली स्टेशन मास्तरांच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. स्टेशन मास्तरांनी ताबडतोब लोहमार्ग पोलिस स्टेशनला फोन लावून काही धागेदोरे सापडले तर त्वरीत कळविण्यास सांगितले.
त्यांनी स्टेशन मास्तरांना विनंती केली, ‘मला एखादे रेल्वेचे इंजिन मिळेल काही वेळासाठी? माझ्या मुलाची बॉडी कुठे सापडली का ते पहायला?’ असे म्हणतानाच त्यांचा बांध फुटला आणि इतक्या वेळ दडवून ठेवलेल्या भावना मोकळ्या झाल्या. त्यांची अवस्था पाहून स्टेशन मास्तरही खूप हेलावले. त्यांनी त्वरीत परमिशन घेऊन तीन तासांसाठी एका इंजिनाची व्यवस्था केली. कारण नंतर लोकल सुरू झाल्यावर ते शक्यच नव्हते.
मित्रांना आणि त्या मुलाच्या वडिलांना घेऊन इंजिन सुरू झाले आणि सावकाश पुढे जाऊ लागले. सिग्नलच्या हिरव्या आणि लाल दिव्यांखेरीज त्याचा प्रखर हेडलाईट सगळीकडे फिरत होता. दिवा क्रॉस झाले, मुंब्र्याची खाडी आली, ब्रीज मागे पडला पण काहीच सुगावा लागला नाही. वडील तर हताश नजरेने सर्व भाग पिंजून काढत होते. हळूहळू इंजिन पारसिकच्या बोगद्यात आले. मोटरमन अतिशय सफाईने सर्व भागांवर लाईट मारत होता आणि पुढे जात होता. इतक्यात! एक मित्र जोरात ओरडला, ‘काका… काका.. इकडे बघा… तो बघा… येस तो बघा…!’ सर्वांनी डोळ्यात प्राण आणून तिकडे पाहिले, तर दोन दगडांच्या कपारीत एक शरीर दाबले गेले होते. मोटरमनने लागलीच इंजिन थांबवले आणि सर्वजण खाली उतरले. वडील तर अक्षरशः रडून हताश झाले होते आणि आपल्याच मुलाचे प्रेत घेऊन घरी जाणार होते. त्याच्या मित्रांनी पुढे होऊन त्याला बाहेर खेचून काढले आणि काय आश्चर्य! त्याची हालचाल होत होती. मंद श्वास सुरू होता. डोक्याला आणि पायाला लागले होते, पण धुगधुगी मात्र सुरू होती. वडिलांना तर काय करावे हेच सुचत नव्हते. माझा मुलगा अपंग झाला तरी चालेल पण तो वाचू दे असेच सारखे म्हणत होते. त्याच अवस्थेत त्याला इंजिनमध्ये घालून मोटरमनने सुसाट ठाणे स्टेशन गाठले. बाकीच्या मित्रांनी पोलिसांना कळविले आणि वडिलांनी व काही मित्रांनी हॉस्पिटल गाठले.
थोडा उशीर केला असतात ना, तुम्ही तर मुलगा हाती लागला नसता बरं का? ‘डॉक्टर मुलाच्या वडिलांना सांगत होते. खरंच नशिबच म्हणायचं.’ नर्सने दुजोरा दिला.
वडिल तर हमसून हमसून रडत होते आणि हॉस्पिटलच्याच फोनवरून त्यांच्या पत्नीला सांगत होते. देवाचे आभार मानत होते. साधारण आठवडाभराने पूर्ण उपचारानिशी ती मुलगा व्यवस्थित बरा झाला आणि घरी आला, पण प्रत्येकाच्या नशिबात असेच असेल असे नाही ना? म्हणून त्याला मी फटकावले. तो तरुण मला म्हणाला.
“बापरे! काय विलक्षण अनुभव आहे हा.” मी म्हणालो, “तुम्ही कुठे वाचलात की तुम्हाला कुणी सांगितला?”
मंद हसत तो म्हणाला, “सांगायला कशाला पाहिजे? तो वाचलेला मुलगा मीच होतो.”