Close

कांचन अधिकारी यांच्या ‘जन्मऋण’ या नव्या चित्रपटाचे पोस्टर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च (Poster Of Marathi Film ‘Janmarun’ Launched By NCP State President Sunil Tatkare: Kanchan Adhikari’s New Film Releasing Soon)

अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी 'जन्मऋण' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. 'आभाळमाया' या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचा अष्टपैलू अभिनय पाहण्याची पर्वणी २२ मार्च पासून पुन्हा एकदा या चित्रपटामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, "कांचन अधिकारी यांच्या या चित्रपटाने अत्यंत वेगळ्या आणि संवेदनशील विषयाला हात घातला आहे. अभिनेते पद्मश्री मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचा लाजवाब अभिनय, उत्कृष्ट सामाजिक आशयाच्या कथेसोबत कोकणाचे मोहक रूप प्रेक्षकांनी या चित्रपटातून नक्की अनुभवावे."

अंधकारमय शून्यात हरवलेली सुकन्या कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरील आर्तता आणि शांत, संयमी, सारं काही निसटून गेल्याने कष्टी झालेल्या मनोज जोशींच्या चेहऱ्यावरील भाव चित्रपटातील आशयाची खोली दर्शवतात. नव्या क्षितिजाकडे वाटचाल करण्यासाठी निघालेला अभिनेता तुषार आरकेच्या चेहऱ्यावरील आनंद कुतूहल जागवतो. तांबडं फुटलेलं आकाश आणि त्यात झेपावलेलं विमान चित्रपटाच्या गहिऱ्या आशयाची ओळख करून देते. पुसटश्या काळ्या गोल कडेच्या आत लाल गडद रंगावर सफेद 'जन्मऋण'चा लोगो भलताच उठावदार दिसत असून तो आईवडिलांच्या नितळ शांत संयमी प्रेमाचे प्रतीक वाटतो. सुंदर खेड्यातील परिसर-घरे यातील स्थळकाळाची खूणगाठ करून देतात.

आई वडील मुलांना जन्म देतात व मुलं मोठी झाली तरी पालकांचं मुलांवरचं प्रेम तसंच असतं अगदी त्यांच्या म्हातारपणी सुद्धा. पण मुलांच्या बाबतीत मात्र वेगळेपणा दिसून येतो. आई बापाची मुलांना अडगळ होऊन जाते व मग सुरू होते ती पालकांची शोकांतिका. मग अशा अवस्थेत पालकांनी काळाची पावलं ओळखून अगोदरच कोणत्या खबरदाऱ्या घ्यायच्या? आपल्या मालमत्तेचे रक्षण आपल्या अंतकाळापर्यंत कसे करायचे? मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यात होणारे बदल कसे ओळखायचे? नातेसंबंधाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारा चित्रपट ‘जन्मॠण’ घेऊन येत आहेत लेखिका, निर्माती, दिग्दर्शक कांचन अधिकारी.

या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के., अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण आणि पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट अभिनेते महेश ठाकूर, निहारिका रायजादा यांनी काम केले आहे. जन्म ऋणचे कथा - संवाद कांचन अधिकारी, मंजुश्री गोखले यांचे असून डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून अखंड कोंकणचे सौन्दर्य खुलले आहे. संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा ह्रदयाला थेट भिडते. २२ मार्चला सर्व चित्रपटगृहात हा चित्रपट पाहता येणार आहे.

Share this article