बिग बॉसमध्ये गाजलेला आदर्श शिंदे सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर त्याचा एक अनुभव शेअर केला आहे. “हातावर मिळवायचा पानावर खायचा”
शूटिंग संपवून मुरुड ला गेलो.समुद्र,हिरवीगार झाडी,पद्मदुर्ग किल्ला,पाण्यात डोलणाऱ्या होड्या ,पाटीलवाडा खानावळ,आणि मच्छीमार बांधव=स्वर्ग.
मासे खाण्याचा मोह आवरेना मग काय मुरुड-जंजिरा मच्छी मार्किट मधे गेलो.म्हंटल जाळ्यात अडकलेले ताजे मासे पाहू पण काय तिकडे एका मच्छी विकणाऱ्या आईला भेटलो आणि त्यांच्या प्रेमाच्या आपुलकीच्या गोडमखमली जाळ्यात मीच स्वतःला हरवून बसलो.
सकाळ सकाळी मच्छी मार्किट मधे मासे विकणाऱ्या वासंती मावशीची भेट झाली.थोडे सुकट,बोंबिल,करडी,सोडे,घेऊ म्हंटल.मावशीसोबत गप्पा रंगल्या बोलता बोलता आज थोडा ताप आहे बाळा म्हणत व्यथा सांगता सांगता मावशीच्या डोळ्यात पाणी दिसल. मी मावशी जवळ जाऊन बसलो पूर्ण व्यथा ऐकली. त्यांना येऊन गेलेले २ हार्टअटॅक, अक्सिडेंट मुळे पायात आलेले रॉड,घरची परिस्थिती नाजुक तरीही न हरणारी ती माऊली मन जिंकून गेली.उन्ह वाढल तरी बसावतर लागणारच ना बाळा आजचा म्हावरा विकला की घरी जाऊन आराम करता येईल म्हणाली.
“हातावर मिळवायचा पानावर खायचा”.हे शब्द त्या मावशीचे ,जे शब्द मनाला चटका लावून गेले.थोडा फार म्हावरा घ्यायला गेलेलो मी त्यांच्या कडे असलेलं आखा माल त्यांच्या सर्व पाट्याच रिकाम्या करुन आलो.का घेतला माहित नाही पण गोन्या भरुन म्हावरा आणला आणि वासंती मावशीला तुम्ही घरी जा औषध घेऊन आराम करा म्हंटल.मला ताजा म्हावरा तर मिळालाच पण त्या पेक्षा मोठा त्या मावशी कडून आशीर्वाद मिळाला.तुला माझ्या बलालेश्वराने पाठवला आहे बाळा म्हणत ती मावशी आनंदली.काही वेळेला आपण आपल्या कृतीतून आपण बरच काही मिळवतो.जन्मं एकदाच आहे हसत मिळून मिसळून जगा.तुमच्या मुळेदुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलुद्या.वासंती मावशीचा मुरुडचा त्या निरागसतेचा निरोप घेतला.सोबत आला वासंती मावशीचा आशीर्वाद आणि म्हावरा.