बदलत्या काळात महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असल्या तरी एकूणच विमा खरेदी करण्यामध्ये त्यांचे प्रमाण कमी दिसते. तसेच पॉलिसी घेताना त्याचे विविध फायदे व त्याची व्याप्ती याबाबत देखील काही महिला अनभिज्ञ असतात. अशा परिस्थितीत जीवन विमा खरेदी करण्याचे बारकावे समजून घेणे आवश्यक आहे. या संदर्भात, महिला दिनाच्या निमित्ताने एगॉन लाइफ इन्शुरन्सचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर श्रीनिधी शमा राव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात -
आर्थिक नियोजनात सक्रिय सहभाग : आर्थिक नियोजन आणि निर्णय अद्याप कुटुंबातील पुरुषांच्या हातात, म्हणजे नवरा किंवा वडील यांच्या हातात असतात. परिणामी अशा परिस्थितीत स्त्रिया दुर्लक्षित राहतात. अधिकाधिक स्त्रिया, त्यांचे पालक, भावंडं, मुले आणि स्वतःसाठी प्रदाता म्हणून भूमिका घेत असल्याने, पुरेशा विमा संरक्षणाला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या लोकांची काळजी घेणारे, पुरेसे आयुर्विमा संरक्षण त्यांना मिळावे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्त्रियांनी मध्यम ते दीर्घ पल्ल्याच्या बचतीचे नियोजन केल्यास त्यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक सक्षमता मिळू शकते.
जागरूकतेचा अभाव : विवाहित स्त्री, ‘विवाहित स्त्री मालमत्ता कायद्या’खाली विमा पॉलिसी खरेदी करू शकते आणि लाभार्थी म्हणून तिच्या मुलांचे नामांकन करू शकते. पॉलिसीतून मिळणारी रक्कम केवळ लाभार्थींकडेच जावी, अन्य कोणाला मिळू नये, ह्यासाठी ही महत्त्वाची तरतूद आहे. आपल्या अनुपस्थितीत आपल्या मुलांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करू इच्छिणाऱ्या कोणत्याही स्त्रीसाठी हे महत्त्वाचे साधन ठरू शकते.
गृहिणींसाठी जीवन विमा : घरी राहणाऱ्या माता/गृहिणी अनेकदा विमा खरेदी करण्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात. त्या घरातील प्राथमिक कमावणाऱ्या नसल्यामुळे, त्या असे गृहीत धरू लागतात की विमा केवळ पुरुष कमावत्यासाठी आवश्यक आहे. तथापि, घराचे व्यवस्थापन करणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीत, कुटुंबासाठी भावनिक आणि आर्थिक दोन्ही ताण येऊ शकतात. त्यामुळे, काम न करणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबांना विमा संरक्षणाची आवश्यकता आणि फायदे याबद्दल शिक्षित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्वयंरोजगार असलेल्या महिलांना पारंपारिक वेतन स्लिप नसल्यामुळे जीवन विमा मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. पारंपारिकपणे, त्यांचे मूल्यमापन आयकर रिटर्न आणि उत्पन्नाच्या कागदपत्रांच्या गणनेवर आधारित होते. तथापि, ही कागदपत्रे अनेकदा अनुपलब्ध नसतात, ज्यामुळे विमा कंपन्यांकडून नाकारण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी, अनेक स्वयंरोजगार महिला जीवन विमा संरक्षण घेण्यापासून परावृत्त होतात. AI आणि अकाउंट एग्रीगेटर सारख्या टूल्सच्या आगमनाने, त्यांना आज जीवन विमा प्रदान करणे शक्य झाले आहे, त्यामुळे स्वयंरोजगार महिला त्यांच्या उपक्रमांचे आणि अवलंबितांचे संरक्षण करण्याचे संधीचा सर्वोत्तम उपयोग करू शकतात.
नामनिर्देशित व्यक्तीशी मुक्त संवाद: विम्याच्या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित करण्यासोबतच कुटुंबियांच्या, विशेषत: जोडीदार किंवा आईवडील यांच्या विम्याचे तपशील माहीत असणेही आवश्यक आहे. अनेकदा कुटुंबातील सदस्यांच्या/जोडीदारांच्या आयुर्विमा पॉलिसीमध्ये स्त्रीला नामांकित केलेले असते पण ते तिला माहीतही नसते. अचानक आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास हे तपशील माहीत नसल्यामुळे दावा सादर करण्यात अडचणी येऊ शकतात. नामांकित व्यक्तीशी (किंवा व्यक्तींशी) संवाद साधला जाईल, त्यांना सर्व तपशील आणि प्रक्रियांची माहिती असेल ह्याची काळजी प्रत्येक कुटुंबाने घेतली पाहिजे.