अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे 'झिंग चिक झिंग' या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात गंभीर विचारांची दाहकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाला अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठी कमालीचा प्रतिसाद मिळत आहे.
एका संवेदनशील शेतकऱ्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे. परिस्थितीने गांजलेला हा शेतकरी आपला संपूर्ण आत्मविश्वास हरवून बसला असून जगासमोर मान उंच करून चालणं त्याच्यासाठी लज्जास्पद झालं आहे. हा अगतिक शेतकरी कर्जाचा डोंगर फोडून काढेल की त्याखाली दबून मरेल, हे चित्रपटात कळणार आहे. नितीन नंदन यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटात भरत जाधव, माधवी जुवेकर, संजय मोने, उदय सबनीस, चिन्मय कांबळी, आरती मोरे आणि दिलीप प्रभावळकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत.
२०१० च्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच आणखी बऱ्याच पुरस्कारांनी हा चित्रपट पुरस्कृत झालेला आहे.