‘बहनों और भाईयो, …’ असे म्हणत अनेक वर्षे रेडिओवर बिनाका गीतमाला सादर करत संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले निवेदक अमीन सयानी यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अमीन यांचा मुलगा रझील सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्यावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
अमीन सयानी यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी मुंबईत झाला. अमीन सयानी यांनी रेडिओच्या जगात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या आवाजाची जादू लोकांच्या मनात घर करून गेली. अमीन सयानी यांनी आपल्या कारकिर्दीला ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथून रेडिओ प्रेजेंटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अमीन सयानी यांनी ५४,००० हून अधिक रेडिओ कार्यक्रम केले आहेत. त्यांनी जवळपास १९,००० जिंगल्सना आवाज दिला.
रेडिओ सिलोन आणि त्यानंतर विविद भारती वर तब्बल ४२ वर्षे चाललेल्या 'बिनाका गीतमाला' या त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'गीतमाला' या कार्यक्रमामुळेच अमीन यांना लोकप्रियता मिळाली. १९५२ ते १९९४ इतका दीर्घकाळ चाललेला हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून गीतमालाची नोंद झाली आहे. माझा आवाज फुटला म्हणून मी गाणी गाऊ शकलो नाही, ती सगळी कसर मी भरपूर गाणी ऐकून भरून काढली, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. अमीन सयानी यांनी केवळ निवेदन केले नाही तर अनेक गायक, गीतकार संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते करून त्यांच्या गाण्यांचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये रेडिओ निवेदक म्हणून काम केलं. यात भूत बांगला, तीन देवियां, बॉक्सर आणि कटल यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
अमीन सयानी यांच्या पार्थिवावर उद्या (२२ फेब्रुवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत.आज त्यांचे काही नातेवाईक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. खरोखर अमीन सयानी यांच्यासारखा निवेदक पुन्हा होणे नाही.