आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘दंगल’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर होती. याशिवाय सुहानी सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती.
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, सुहानी भटनागरच्या संपूर्ण शरीरात फ्लूइड साठले होते, असे सांगितले जाते. काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान चालू असलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. अहवालानुसार, तिच्या शरीरात अतिरिक्त द्रव जमा होऊन तिचं निधन झालं. हेच सुहानीच्या अकाली निधनाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुहानीवर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) रात्री तिचं निधन झालं. आज शनिवारी फरीदाबाद येथे तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. ती आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'दंगल' (2016) मधील बबिता फोगटच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्येही काम केले आहे.
'दंगल' चित्रपटानंतर सुहानीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, मात्र तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या अभ्यासात लक्ष घालायचे होते. अभिनेत्री २५ नोव्हेंबर २०२१ पासून तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सक्रिय नव्हती. मात्र, याआधी तिने अनेकदा तिचे फोटो शेअर केले आहेत.