Close

असे झाले खरे (Short Story: Ase Zale Khare)

  • ज्योती आठल्ये

पुढचे आठ दिवस शांततेत गेले न गेले तोच शेजारच्या मुलाचा फोन आला. - काका लवकर ये. काकू विचित्र वागतेय.फफ हे ऐकून पंकज जवळजवळ धावतच घरी आला तर नीता फीट येऊन पडली होती. काहीतरी बरळत होती. तासाभराने नॉर्मल झाली. तशी पंकजकडे बघून म्हणाली, ममकाय झाले मला?

“हॅलो! मॅडम आत येऊ का?” पंकजने केबिनच्या दारातून विचारले तशी फाईलमधले डोके वर काढून चष्मा सावरत मॅडम म्हणाल्या “हो! ये ना. बस. रिलॅक्स!”
आणि तो खुर्चीवर बसला. पाच मिनिटे तशीच गेली. तेव्हा अस्वस्थ चुळबुळत त्याने विचारले,
“मॅडम! काही अर्जंट काम होतं का माझ्याकडे?”
“हो पण काम नाही, फक्त चौकशी करायची होती की हल्ली नेहमीसारखे तुझे काम व्यवस्थित होत नाही. थोडा डिस्टर्ब वाटतोस. सुट्टी घेणं वाढलंय. असं का होतंय ते सांगशील का? काही अडचणीत सापडला असशील तर ते मोकळेपणाने सांग मला. आणि मला सांगायला ऑकवर्ड होत असेल तर पवनजवळ तरी सांगा. तुझा खास दोस्त आहे ना तो.” चष्म्यातून बघत मॅडम ऊर्फ नयना म्हणाली.
तेव्हा कसं सांगावं, सांगावं की नाही अशा विचारात असताना, प्यून आत आला व म्हणाला, “मॅडम, एमडी साहेबांनी अगदी अर्जंट बोलावलं आहे.”
तेव्हा खुर्चीतून पटकन उठत ती म्हणाली, “परत कधीतरी बोलू.” असं बोलून ती पर्स घेऊन केबीनबाहेर पडली. तसा पंकजही कामासाठी आपल्या जागेवर गेला.
पण परत कधीतरी असं नयना म्हणाली तरी महिनाभर ना ती बोलू शकली, ना पंकज. कारण ऑडीट टीम आली होती. त्यामुळे ऑफिसमध्ये कामच काम वाढलं होतं. सारा स्टाफ शनिवार, रविवारसुद्धा येत होता. अन् मग महिन्याभराने सगळ्यांची धावपळ संपली. पण तरीदेखील नयना मोकळी झालीच नव्हती. शनिवार असून ऑफिसला आली होती. अन् मग समोर पंकजला पाहून आश्‍चर्याने म्हणाली. “अरे आज इतक्या दिवसानंतर सगळे शनिवारचा आनंद घेतात. अन् तू कसा काय आलास?”
तेव्हा अपराधी स्वरात म्हणाला- “खूप सुट्टया झाल्यात. तेव्हा म्हटले निदान वेळ मिळतोय तर काम करू आणि तसंही मॅडम, शनिवार असून तुम्ही नाही का आलात?”
“ठीक आहे. पण महिनाभरापूर्वी जे मी तुला विचारले होते त्याचे उत्तर मला देशील का?”
“हो सांगतो मॅडम. घरी थोडे गोंधळाचे, काळजीचे वातावरण आहे. काय करावे तेच कळत नाही.”
“म्हणजे कुणाला काही बरे वगैरे नाही का?” तिने विचारले. तसा पंकज म्हणाला- “हो. बायको नीता खूप विचित्र वागते हल्ली.”
“काय झालंय? कसलं आजारपण तिच्या पाठी लागलंय तेच कळत नाही.”
“अरे पण, डॉक्टरांकडे नेले नाहीस का तिला?”
“नेले नं. गेले दोन महिने हेच तर करतोय. म्हणून ऑफिसमधले काम अर्धवट सोडून जातोय.”
“पण मग डॉक्टर काय म्हणतात?”
“काय सांगू मॅडम? ते म्हणतात यांना शारीरिकदृष्ट्या कोणताच आजार नाही. पण तिचे एकेक वागणे पाहिले की, डॉक्टर म्हणतात ते पटत नाही. कारण काहीतरी शारीरिक बिघाड असल्याखेरीज कुणी असे विचित्र वागेल का?”
“म्हणजे?” मॅडमने विचारले.
तेव्हा तो म्हणाला, “मॅडम काय सांगू? खाते त्या दिवशी इतके खाते की, बघणारा बेशुद्ध पडेल. एकदम दहा पोळ्या व अर्धा पातेलं आमटी. नाहीतर चार दिवस अजिबात पाणी देखील पिणार नाही. माझ्या जुळ्या मुलांना एखादा दिवस इतकं मारेल की, दिवसभर ती रडतात. नाहीतर मध्येच प्रेमाचा उमाळा येऊन मुके घेऊन त्यांना गुदमरून टाकेल. त्या दिवशी तर कहरच केला. दिवसभर सुरी घेऊन हिंडत होती. अन् स्वतःशीच बडबडत होती, ‘मी सोडणार नाही एकेकाला!’ मॅडम खूप पेचात सापडलोय मी, काय करावं तेच समजत नाही.”
“मग बरोबर आहे तुझे, कामात लक्ष न लागणे.” सहानुभूतीपूर्वक मॅडम म्हणाल्या. पण पाच मिनिटे विचार केल्यावर म्हणाल्या, “एक सुचवू का? तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जा. खूप उपयोग होतो.”
“हो मी पण ऐकलंय! पण घरची माणसे तयार होतील की नाही देव जाणे. कारण, त्यांना वाटतंय डॉक्टरच्या औषधापेक्षा गावच्या भगताकडे घेऊन जाऊ. नक्कीच भुताने झपाटले असणार. तेव्हा मला पटले नाही तरी त्यांच्याकरिता घेऊन जायलाच लागेल.”
“अरे, ते तू कर त्यांच्या समाधानासाठी. पण मानसोपचार तज्ज्ञांकडेदेखील घेऊन जा. जेव्हा केव्हा तुझा निर्णय होईल तेव्हा सांग. डॉक्टर शेंडे माझ्या ओळखीचे आहेत.” आणि पुढे काही बोलणार इतक्यात पंकजचा मोबाईल वाजला. अन् त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलत गेले. झटकन उठून तो म्हणाला मॅडम, “माझ्या भावाचा फोन होता. म्हणाला नीता सुरी घेऊन घरभर पळतीय. खूप बेफाम झालीय. जातो मी.”
ते ऐकून नयनाच थिजली. विचारात पडली. पंकजच्या आयुष्याचा विचार करू लागली की, हेे वय मौजमजा करण्याचे, तर हे काय त्याच्या पाठीमागे लागलेय. खरंच काही कळत नाही. म्हणत परत कामात डोके खुपसून बसली.
नंतर पंकज आठवडाभर ऑफिसला आलाच नाही. तेव्हा मात्र त्याच्या खास दोस्ताने, पवनने फोन करून विचारले, “काय रे, बरे वगैरे नाही का?”
“नाही रे, मी ठीक आहे” म्हणत सगळी कहाणी सांगितली. तसा पवन म्हणाला, “बाप रे, मीच गांगरून गेलोय. काय बोलावं तेच सुचत नाही. तेव्हा भेटल्यावर बोलू,” असं म्हणत फोन ठेवून दिला.
दुसर्‍या दिवशी पंकज जरा लवकरच आला. कारण, एकतर सगळ्यांच्या आधी मॅडम येतात. अन् शिवाय माझी काळजी करत असतील. कारण ऑफिसमधला प्रत्येकजण जणू त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. आणि त्याचा अंदाज खरा ठरला. मॅडम आल्याच होत्या. त्यांना हॅलो करून सांगितले की, “भगताने नीतावरून मंत्रून ठेवलेले पाणी टाकले व विचारले, ‘तू जी कोण व्यक्ती आहेस, तू हिला का छळतेस? तिच्याकडून भीतीदायक कृत्ये करून घेतेस?’
ती म्हणतेय तिला गेलेले लोक दिसतात. मग ती त्यांच्या आवाजात बोलते, का असं वागते कळत नाही. ‘ही आणि हिच्या घरातील माणसे आमचे श्राद्ध पक्ष नीट करत नाहीत. त्यामुळे आम्हाला मुक्ती मिळत नाही. असंही ती बोलत असते.’
“मॅडम! हे जरी नीता बोलत असली तरी आवाज एका पुरुषाचा होता तेव्हा त्याला भगत म्हणाला, ‘यांनी जर तुमचे श्राद्ध पक्ष नीट केले तर सोडाल हिला?’ तेव्हा ही म्हणाली, ‘हो नक्की.”
तेव्हा भगताने अंगारा दिला व म्हणाला, ‘रोज हे लावत जा आणि महिनाभर वाट पहा. नंतर माझ्याकडे या’ म्हणून ठरवलं हा उपाय करून बघतो.” असं म्हणत उठला व म्हणाला, “बरं मॅडम, ते सगळं राहू देत. माझ्याकडे कोणतं काम आहे सांगा.”
मग ते तिने समजावून सांगितले व तो बाहेर पडला. तो निवांत झालेला बघून कुणीच काही विचारले नाही. पुढचे आठ दिवस शांततेत गेले न गेले तोच शेजारच्या मुलाचा फोन आला, ‘काका लवकर ये. काकू विचित्र वागतेय.’ हे ऐकून पंकज जवळजवळ धावतच घरी आला तर नीता फीट येऊन पडली होती. काहीतरी बरळत होती. तासाभराने नॉर्मल झाली. तशी पंकजकडे बघून म्हणाली, “काय झाले मला?”
“काही नाही जरा चक्कर येऊन पडली होतीस. काही आठवते का काय झाले ते?”
तेव्हा त्याच्या आईकडे बोट दाखवून म्हणाली, “या हल्ली मला काही-बाही लागेल असं बोलतात. अन् मग दिवसभर तेच चित्र डोळ्यासमोर येते म्हणून आज चक्कर येऊन पडले.”
अर्थात पंकजचा आईवर पूर्ण विश्‍वास होता म्हणून त्याने आईला काहीच विचारले नाही. पण आई बिचारी सुज्ञपणे दुसर्‍याच दिवशी निघून गेली. तेव्हा कुठे हिची तब्येत सुधारली.
दुसर्‍या दिवशी मॅडमने विचारायच्या आतच पंकज म्हणाला, “आता सगळे ठीक आहे.”
“पण तरीदेखील मला वाटतं पंकज, तू तिला डॉक्टर शेंड्यांकडे घेऊन जा. उभं आयुष्य घालवायचंय तुला तिच्याबरोबर.” नयना म्हणाली ते पटलं त्याला. म्हणून तिला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला सांगितली. ती पंधरा दिवसानंतरची मिळालीसुद्धा. मग भगत व डॉक्टर शेंडे दोघांची ट्रीटमेंट नीताला सुरू झाली. पहिल्याच भेटीत नीताला डॉक्टर आवडले. इतके छान बोलत होते, समजावून सांगत होते की,
‘आपण डॉक्टरकडे नसून कुठल्यातरी ओळखींच्याकडे गप्पा मारायला आलो आहोत, असं वाटतंय’असे ती पंकजला म्हणाली - पुढे असंही म्हणाली, ‘नाहीतर तो भगत केवढा ओरडत असतो.’
अन् मग पहिलं सिटींग, दुसरं सिटींग- असं करत करत दहा सिटींग्ज पुरी झाली अन् डॉक्टर म्हणाले, “आता मी हे जे टेप केलेले आहे, ते नीट ऐका. म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील.” असं म्हणत टेप चालू केली.
डॉक्टर- “तू अशी का वागतेस. आपल्यामुळे सगळ्यांना त्रास होतो असं नाही वाटत तुला? खरंच तुझ्या तोंडून पूर्वज बोलत असतात? काय ते सगळं सांग. भिऊ नकोस.”
“सांगते, डॉक्टर. मी एक दिसायला सुमार मुलगी, त्यातून गावाकडची. त्यामुळे जास्त शिकलेली नाही आणि तशीही खूप हुशार नव्हते. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचे लक्ष ताई व दादाकडे. ताई सुंदर म्हणून तर दादा हुशार म्हणून. त्यामुळे हळूहळू माझ्या मनात एक न्यूनगंड, असुरक्षित भावना तयार झाली. पुढे माझ्यासाठी यांचे स्थळ आले. खूप सुंदर आणि हुशार. त्यांना काय कुठलीही शिकलेली छान मुलगी मिळाली असती. पण त्यांच्या आईंना अगदी उत्तम पत्रिका जुळणारीच मुलगी हवी होती. अन् हे आईच्या शब्दाबाहेर नव्हतेे. मग आमचे लग्न होऊन संसार चालू झाला. नंतर माझ्या मनाने घेतले की हे फक्त आईचेच ऐकतील. हे रोज माझ्याशी गप्पा मारताना म्हणायचे, आता दहा मिनिटे आईशी बोलतो. पण माझ्यात त्या वाटेकरी आहेत असं वाटून मनातून त्यांचा राग व द्वेष करू लागले. नंतर कधीतरी ऑफिसातील मुलींचे फोन येत किंवा त्या घरी येत ते बघून मी अस्वस्थ होऊ लागले. वाटले हे मी सोडून कुणाच्या प्रेमात गुंतले तर.”
हे ऐकून पंकज काही म्हणणार तेवढ्यात डॉक्टरांनी गप्प राहायची खूण केली.
“मग नंतर काय झाले नीता?”


“काय होणार? दिवसभर हे माझ्यात कसे गुंततील याचा विचार करू लागले. पण असा विचार करत असतानाच आणखी एक गोष्ट घडत होती. यांना आधुनिक कपड्यांची आवड होती. मी जीन्स घालावी. केस कापावेत. मेकअप करावा म्हणून हे पाठीमागे लागू लागले आणि एवढंच कशाला माझ्या सगळ्या कपड्यांची खरेदी ते करू लागले. ऑफिसमध्ये पार्टीत मी कमी पडू नये म्हणून मला इंग्रजी शिकण्याची सक्ती करू लागले. याचा आता कुठेतरी वीट येऊ लागला होता. अन् अचानक एके दिवशी टी.व्ही. वर एक सिरीयल बघितली. त्यात नायिकेची अवस्था पण माझ्यासारखीच असते. मग ती युक्ती करते अन् गेलेल्या लोकांचे आवाज काढून तशी बोलायला लागते. अर्थात ही आयडिया तिला गावातील भगतच देतो. पण आस्ते आस्ते ह्या आयडियाने माझ्या मनावर कधी पकड घेतली ते समजलेच नाही.”
“पण समजा तुझ्या नवर्‍याने तुला आवडतील ते कपडे घालायची परवानगी दिली तर तू शांत होशील. अग, दोन जुळी मुलेसुद्धा आहेत हे विसरलीस का? खरं तर तू देवाचे आभार मानायला पाहिजेस की तू नवर्‍याबरोबर असावीस म्हणून त्याला तुला सगळ्यात नेऊन मिसळण्याची बुद्धी देतोय. तर तो विचार सोडून तू त्याला फक्त त्रासच देतेस. आपला नवरा एवढा हुशार आहे. याचा तुला अभिमान पाहिजे तर तू काहीतरी भलतेच मनात घेवून त्याला त्रास देतेस.” डॉक्टरांनी विचारले तशी ती म्हणाली, “डॉक्टर मी पण कंटाळले आहे. असं खोटं वागून. पण मला त्याच्याकडून एक वचन हवंय की मी जशी आहे तशीच मला राहू देत. उगाच मला बदलवू नये. तरच मी खूश राहीन.”
आणि मग डॉक्टरांनी पंकजकडे बघत टेप बंद केली. नीता जागी झाली. तसा पंकज हसला व तिला घरी घेऊन आला व नंतर तिला म्हणाला, “वेडाबाई, हे सगळे तू मलाच विश्‍वासात घेऊन सांगायचे नाहीस का? म्हणजे पुढचा मनस्ताप टळला असता.”
“हो चुकलंच माझं. या न्यूनगंडाच्या भीतीने मी वाहवत गेले. नाहीतर तुमचे व मुलांचे किती हाल झाले असते. याचे प्रायश्‍चित्त म्हणून तुम्ही सासूबाईंना कायमचे इथे घेऊन या. म्हणजे मग मी संसार करता करता मला जे आवडते ते शिकायला सुरुवात करेन.”
आणि मग दोघे कितीतरी दिवसांनी मनापासून हसले. आता नीता तिला आवडते ती मेंदी काढून देते लग्नघरी. नाहीतर छोट्या छोट्या पार्टीत तिची खासियत असलेली कचोरी बनवून देते.
आणि मग पंकजच्या प्रगतीचा वारू वेगाने दौडू लागला. तशी एक दिवस पंकज मॅडमना म्हणाला, “मॅडम, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलेत. तेव्हा जन्मभर उपकार विसरणार नाही.”
“अरे वेडा आहेस का? एकमेकांना मदत केली तर त्यात उपकार कसले? त्यापेक्षा उद्या माझ्यासाठी कचोरी घेऊन ये.” नयनाने हसत सांगितले.
ही सगळी कथा व्यथा मॅडमने म्हणजेच नयनाने तिच्या लेखिका असलेल्या मैत्रिणीला म्हणजे नंदूला सांगितली व म्हणाली, “याची गोष्ट लिहून मला दे व दिवाळी अंकासाठी एखाद्या मासिकाला पाठवून दे. म्हणजे नकळत केलेल्या गोष्टींमुळे काय रामायण घडू शकते हे वाचकांना कळेल.”
नीताची कथा प्रसिद्ध झाली आणि पती-पत्नी मध्ये नकळतपणे काही गोष्टींना अवाजवी महत्त्व देणार्‍या अनेक नीतांना याची जाणीवही झाली.

Share this article