Close

आजारपणानंतर अभिनेता श्रेयस तळपदेचं दमदार पुनरागमन; त्याच्या आगामी ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित (Shreyas Talpade Gauri Ingwale Match ‘Hi Anokhi Gath’ Trailer Released)

आजारपणानंतर अभिनेता श्रेयस तळपदेचं दमदार पुनरागमन झालं आहे. त्याच्या आगामी 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये श्रेयस आणि गौरी इंगवले ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘ही अनोखी गाठ’ असं या चित्रपटाचं नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचं असून यात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर म्हणाले, “नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयससोबत प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून स्वतःला नेहमीच समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तिरेखेला तो शंभर टक्के न्याय देतो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता.

या चित्रपटात ऋषीचीही भूमिका आहे. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. झी स्टुडिओजसोबत याआधी बरेच चित्रपट केले आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबतचा अनुभव हा नेहमीच कमाल असतो. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलेसे करतील.”

हा चित्रपट म्हणजे नावातच अनोखी असलेली एक प्रेमकहाणी असून झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर यांची ही विशेष भेट १ मार्चपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

Share this article