Close

प्राजक्ता माळी सुरू करणार ‘भिशी मित्र मंडळ’! (Bhishi Mitra Mandal Film Muhurta)

मालिका, वेबसीरीज आणि चित्रपट या तीनही माध्यमांतून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्राजक्ता माळी लवकरच ‘भिशी मित्र मंडळ’ सुरू करणार आहे. आता तिची ही ‘भिशी मित्र मंडळ’ एखादी संस्था किंवा गट नसून, तिचा आगामी धमाल चित्रपट आहे. कॉमेडी, धमाल आणि निखळ हास्याचा धबधबा असणारे एक जबरदस्त कथानक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच प्राजक्ता माळी हिने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर प्राजक्ता 'भिशी मित्र मंडळ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या आगामी चित्रपटाबद्दलची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती कायमच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांबद्दल, बिझनेसबद्दल किंवा तिच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या मुहूर्त दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, "ह्या वर्षातल्या पुढील चित्रपटाला प्रारंभ; नुकतंच पुण्यामध्ये चित्रपटाचा मुहूर्त पार पडला.. २०२४ हे वर्ष मला खूप बिझी ठेवणार अशी शक्यता आहे. मी पोस्ट कोल्हापूरातून लिहितेय. माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी मी खूपच उत्सुक आहे." मुहूर्तावेळी प्राजक्तासोबत चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शकांसह चित्रपटाची संपूर्ण टीमही उपस्थित होती. ‘भिशी’ म्हटलं की डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. ‘भिशी’च्या संकल्पनेत एका ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून, काही चिठ्ठ्या उडवून त्यातून एक नाव निवडून त्या सदस्याला सगळे पैसे दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. याच ‘भिशी मित्र मंडळा’चं धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे

Share this article