२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरच्या गुन्ह्यातील रक्कम जाणूनबुजून स्वीकारत होती आणि त्याचा वापर करण्यात ती सहभागी होती, असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली उच्च न्यायालयासमोर केला आहे.
जॅकलिन फर्नांडिसच्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ईडीने हा युक्तिवाद केला आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीने तिच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
हा खटला न्यायाधीश मनोज कुमार ओहरी यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. जॅकलिनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने ईडीच्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली आहे.
जॅकलिनने चंद्रशेखरसोबतच्या आर्थिक व्यवहाराबाबत सत्य कधीच उघड केले नाही आणि पुरावे मिळेपर्यंत तथ्य लपवून ठेवल्याचा दावा ईडीने आपल्या उत्तरात केला आहे.
जॅकलीन शेवटची अक्षय कुमारच्या 'सेल्फी' चित्रपटात दिसली होती. यामध्ये एका गाण्यात तिची खास भूमिका होती. सध्या ती 'फतेह' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.