सध्या जगभरातील श्रीरामभक्त केवळ २२ जानेवारी २०२४ या दिवसाची वाट पाहत आहेत. या दिवशी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या भव्य-दिव्य अशा सोहळ्याचं याचि देही याचि डोळा दर्शन घेता यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र सर्वांनाच अयोध्येत उपस्थित राहणं शक्य नाही. या सोहळ्याला उपस्थित राहता येत नसलं, तरी थिएटरमध्ये तसेच घरबसल्याही याचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
पीव्हीआर-आयनॉक्स या देशातील अग्रगण्य थिएटर चेनने दर्शकांना थिएटरमध्ये सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशभरातील ७० शहरांमधील १६० चित्रपटगृहांमध्ये या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
"अशा भव्य ऐतिहासिक घटनांचा अनुभव देखील भव्य असायला हवा. चित्रपटगृहाच्या पडद्यावर हा सोहळा पाहिल्यामुळे तो अधिक जिवंत वाटेल. या सोहळ्याच्या माध्यमातून भाविकांशी जोडलं जाणं हे आमचं सौभाग्य असेल." असं मत पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेडचे को-सीईओ गौतम दत्ता यांनी व्यक्त केलं आहे.
"भारताच्या इतिहासातील हा एक बहुप्रतिक्षित क्षण आहे. मंदिरात सुरू असणारा मंत्रजागर, तिथली दृश्ये आणि तिथलं वातावरण हे थिएटरमध्येच लोकांना अनुभवता यावं हा आमचा प्रयत्न असणार आहे. हे मनोरंजन नसेल, तर भाविकांना तो क्षण जगता यावा यासाठीचा प्रयत्न असेल." असंही ते म्हणाले.
२२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी केवळ १०० रुपयांचं तिकीट आकारलं जाणार आहे. या किंमतीत दर्शकांना पॉपकॉर्न आणि बेव्हरेज कॉम्बो देखील मिळणार आहे.
तसेच घरबसल्या देखील भाविकांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या सोहळ्याला लाईव्ह पाहण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला टीव्हीवर हा कार्यक्रम पाहायचा असेल, तर २२ जानेवारी रोजी सकाळपासूनच दूरदर्शनवर याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स पोहोचवण्यासाठी दूरदर्शनची टीम तैनात असणार आहे. यासाठी अयोध्येत ठिकठिकाणी दूरदर्शनचे सुमारे ४० कॅमेरे लावण्यात येतील. सकाळी ११ वाजेपासून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. तुमच्याकडे दूरदर्शन चॅनल HD मध्ये उपलब्ध असेल, तर 4K HD क्लॅरिटीसह देखील तुम्ही हा सोहळा पाहू शकाल.
मोबाईलवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. यूट्यूबवर दूरदर्शनच्या चॅनलवर देखील याचं लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. डीडी न्यूजवर देखील याचं प्रक्षेपण करण्यात येईल.
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राम मंदिर ट्रस्टचे अधिकृत अकाउंट तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.