तिळाची खिचडी
साहित्य : अर्धा कप तांदूळ, पाव कप मुगाची डाळ (धुऊन अर्धा तास भिजत ठेवा), पाव कप भाजलेले तीळ, 3-4 चमचे तूप, फोडणीचे साहित्य (कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग, हळद), काळे मीठ, 1-2 हिरव्या मिरच्या, पाव इंच आले (बारीक चिरलेले), सजावटीसाठी कोथिंबीर व खोवलेले ओले खोबरे.
कृती : तूप गरम करून त्यात फोडणी द्या. नंतर त्यात मुगाची डाळ, तांदूळ व तीळ घालून चांगले परतवा. नंतर त्यात 2 कप पाणी घालून उकळी येऊ द्या. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्या व आले घालून परतवा. खिचडी शिजल्यावर आच बंद करा. खिचडी वाढताना, त्यावर तूप सोडून बारीक चिरलेली कोथिंबीर व ओले खोबरे घाला.
तीळ भरलेली भेंडी
साहित्य : अर्धा वाटी भाजलेले तिळकूट, पाव किलो भेंडी, पाव वाटी भाजलेले दाणेकूट, 4 चमचे तेल, स्वादानुसार आमचूर पूड, धणे-जिरेपूड, हळद, मीठ, तिखट व गूळ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे भाजलेले तीळ.
कृती : भेंडी स्वच्छ धुऊन, त्यास मधोमध चिर पाडून घ्या. एका भांड्यात भेंडी व तेल व्यतिरिक्त इतर सर्व साहित्य चांगले एकत्र करून घ्या. हे मिश्रण प्रत्येक भेंडीमध्ये व्यवस्थित भरा. कढईत तेल गरम करून त्यात भेंडी शिजेपर्यंत परतवा. वरून भाजलेले तीळ व कोथिंबीर घाला.