तीळ शेव बर्फी
साहित्य : अर्धा वाटी खवा, 1 वाटी तीळ, 2 वाटी डाळीचे पीठ, 2 वाटी साखर, अर्धा वाटी मलई, 1 वाटी दूध, पाव चमचा वेलदोड्यांची पूड, थोडे बदाम-पिस्ते काप, अर्धा चमचा पिवळा रंग, तळण्यासाठी तेल, तूप.
कृती : तीळ भिजतील इतक्या पाण्यात 2 तासांकरिता तीळ भिजत ठेवा. नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. डाळीचे पीठ चाळून त्यात चिमूटभर मीठ, पिवळा रंग आणि तिळाचे वाटण घालून हाताने कुसकरून चांगले एकजीव करून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ भिजवा. या पिठाची शेव पाडून गरम तेलात तळून घ्या. थंड होऊ द्या.
साखरेत मलई व दूध घालून पक्का पाक तयार करा. त्यात खवा कुसकरून घालून एकत्र करा. नंतर त्यात शेव घालून मिश्रण थोडे घोटून घ्या. हे मिश्रण एका तुपाचा हात लावलेल्या थाळीत ओतून सारखे करून घ्या. त्यावर वेलदोड्यांची पूड, बदाम-पिस्त्याचे काप पसरवा. साधारण 10-12 तासांनी त्याच्या वड्या पाडा.
तीळ नारळ वडी
साहित्य : 2 वाटी ओले खोबरे, दीड वाटी पांढरे तीळ, 3 वाटी साखर, 2 चमचे वेलदोड्यांची पूड, अर्धा वाटी काजूची भरड, अर्धा वाटी तूप, दीड वाटी दूध, प्रत्येकी एक मोठा चमचा पिठीसाखर व दुधाची पूड.
कृती : तीळ दुधात 3-4 मिनिटे भिजवून, नंतर बारीक वाटून घ्या. हे तिळाचे वाटण तुपावर खमंग भाजून घ्या. साखरेचा एक तारी पाक तयार करून त्यात तिळाचे मिश्रण, आले खोबरे व काजूची भरड घालून मंद आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रणाच्या कडेने तूप सुटू लागले की, आच बंद करा. मिश्रणात दुधाची पूड आणि पिठीसाखर घालून चांगले घोटा. हे मिश्रण तूप लावलेल्या थाळीत घालून पसरवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्या.