- विनायक शिंदे
लबडेवाडी गावात सर्वच माणसे लबडे आडनावाची. तिथे वाघ, लांडगे, डुकरे, ससे या आडनावाची माणसे चुकूनही सापडायची नाही. इतर नावाच्या माणसाला तिथली माणसे चुकूनही थारा द्यायची नाहीत. तेव्हाच की काय, त्यांच्या आजूबाजूच्या झगडेवाडी, रेमडोकेवाडी, लोचटवाडी गावचे लोक त्यांच्या अपरोक्ष म्हणायचे की, ‘ही कसली लबडेवाडी… ही तर एक नंबर लबाडवाडी!’ दिवसाढवळ्या आणि रातच्यालाबी लबाडी करण्यात महाराष्ट्रात काय पण जगातबी यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्या काळात हे गाव तसे महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमारेषेवर असल्यामुळे पुण्या-मुंबईच्या खिजगणतीत नव्हते. त्यामुळे त्यावेळचे सुप्रसिद्ध ग्रामीण कथालेखक - व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, शंकर खंडू पाटील तिकडे फिरकले नसतील. नाहीतर त्यांना भरपूर रसरशीत स्टोर्या मिळाल्या असत्या. आणि शंभराच्या वरती इरसाल नमुने तिथे हमखास सापडले असते; त्यातलाच एक अस्सल नमुना म्हणजे मारुती ऊर्फ आबासाहेब लबडे! त्यांच्या घराण्यात त्यांच्या पंजापासून ते बापापर्यंत सगळे एकजात राजकारणात लोणच्यासारखे मुरलेले होते. आलिशान बंगला, ए.सी. कार, बुलेट, नोकर-चाकर ही त्याची फलश्रुती होती.
गावात कायम राजकारणाचा धुरळा उडत होता. आबांनी ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून आपल्या पूर्वायुष्याला सुरुवात केली. नंतर त्यांच्या चळवळ्या व विश्वासघातकी स्वभावाचा इंगा दाखवून त्यांचा वेळू गगनाला गेला होता. एक एक युद्ध जिंकीत ते एके दिवशी आमदार झाले होते. दर पाच वर्षांनी येणार्या निवडणुका त्यांना व त्यांच्या फंटरना - चमच्यांना सोन्याच्या सुगीचे दिवस वाटायचे. जिथे दिसेल तिकडून मलिदा खायला मिळायचा. गावातला डॉक्टर असो, हेडमास्टर, कारखानदार, हॉटेलमालक या सर्वांपुढे हात पसरून निवडणुकीच्या नावाखाली ते भरपूर कमाई करायचे. आबासाहेबांचा त्यांना फुल्ल सपोर्ट. त्यामुळे इरसाल व नंबरी फंटरनी निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवाराला (त्याने दिलेले घसघशीत मानधन खिशात टाकून) सांगत की, आम्ही तुमच्या विजयासाठी रान उठवले आहे. अंतिम विजय तुमचाच आहे, तेव्हा देवावर विश्वास ठेवून निर्धास्त राहा. आपल्या गावाच्या विकासासाठी आगामी काळात रंजलेल्या गांजलेल्यांसाठी अनेक विकास योजना राबवायच्या आहेत आणि रात्री गावात सामसूम झाले की झोपलेल्यांना उठवून प्रथम त्यांच्या हातावर शंभरची नोट ठेवून ते हळूच कानात सांगायचे, “आपले अमूल्य मत आबासाहेबांना द्या आणि ऐका, आम्ही हिथं रातच्याला आलो होतो हे कुनालाबी कळता कामा नये. नायतर आमच्याशी गाठ आहे.”
त्यांच्या मेहनतीला फळ यायचे. आबासाहेब हमखास निवडून यायचे. डिपॉझिट जप्त झालेला उमेदवार कपाळाला हात लावून बसायचा. नाम्या, गणेश, मुलाणी, बबन, गणपा या फंटरांची आयमाय काढीत त्यांच्या बेचाळीस पिढ्यांचा दिवसाढवळ्या उद्धार करीत बसायचा. हे फंटर आदल्या दिवशीच गावातून नायनिपट व्हायचे. ट्रक, टेंपो, दुधाची गाडी काय मिळेल ते वाहन पकडायचे आणि सरळ कोल्हापूर गाठायचे. एखाद्या जुनाट लॉजमध्ये उतरायचे. तिथलेच कदान्न घशाखाली घालायचे. रात्रीच्या लास्ट खेळाची स्वस्तातली तिकिटे काढून तमाशापट पाहायचे. नायतर तमाशाच्या थेटरात जाऊन लता-लंका नांदुरेकर नायतर कोण असेल त्या लावणीसम्राज्ञीचा तमाशा बघायचे. तो संपल्यावर लॉजवर जाऊन मेलेल्या माणसागत झोपायचे, ते दुसर्या दिवशी बाराच्या ठोक्याला उठायचे. हे सगळे आटोपल्यावर सरळ देशी दारूच्या बारचे दर्शन घेऊन तिथेच ठिय्या मांडायचे. हे सर्व आबासाहेबांना माहीत होते, पण ते त्यांच्याबद्दल तोंडातून अवाक्षरही काढायचे नाहीत. अगदीच एखादा गळी पडला तर त्याला सरळ ठोकून द्यायचे, “अरे बाबा, गणप्याची आत्या निपाणीला दिलेली, ती फार आजारी हाय. जगतेय की मरतेय अशी अवस्था हाय तिची… निदान शेवटचे दर्शन मिळाले तरी लय झाले म्हणून एवढा आटापिटा करून गेलेयत निपाणीला.” आबासाहेबांचा विश्वासातला नोकर वशामामा तिथे उभा होता. आबासाहेबांचे बोलणे ऐकून त्याला जाम हसायला आले. तो म्हणाला, “आबा, खोटं बोलायला काय तरी सीमा असते.”
“काय झालं? तुला फुरसं चावलं वाटतं. पयल्यांदा वश्या, ही तुझी चोरून ऐकायची खोड सोडून दे.”
“ती मी सोडतो, पण तुमची ही मिन्टामिन्टाला खोटं बोलण्याची…”
“वश्या, डोक्यावर चढू नगस. न्हायतर पायताणानं हाणीन.”
“आबा, त्यासाठी आपलं दोन्हीबी गाल तयार हैत. पण तुम्ही त्या रिक्षावाल्या बजाला खोटं का सांगितलं, गणपाची निपाणीची आत्या लय आजारी हाय म्हणून तो निपाणीला गेलाय… गणप्याची आत्या शकुताई मुंबैला-नायगावला र्हाते हे मला ठावं हाय.”
“वश्या, लय बोललास, जास्त शाना होऊ नगस, न्हायतर कानफाड फोडीन.” तसा वश्यामामा हसत हसत आपल्या कामाला गेला.
आबांचे भाषण हा गावात चेष्टेचा विषय होता. त्यांनी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, अर्बन बँक अध्यक्ष, पक्षाचे सरचिटणीस ही पदे नॉनमॅट्रीक (हा त्यांचाच शब्द) असूनही सतराशेसाठ लटपटी करून मिळवली होती. अर्बन बँकेत आपल्या नातेवाइकांच्या नावाने सुपरलोनच्या नावाखाली पैसे उचलून त्या भारी रक्कमा स्वतःच गिळंकृत केल्या होत्या व नातेवाइकांचा अक्षरशः केसाने गळा कापला होता. हे अख्ख्या गावाला माहीत असूनही त्यांच्या विरोधात कोणीही ब्र काढला नव्हता.
ते नेहमी आपल्या भाषणात म्हणायचे, “मित्रांनो, मी जरी राजकारणी असलो तरी, सर्वधर्मसमभाव या धोरणाचा अंगीकार करणारा आहे. आजपर्यंतचा माझा व्यवहार, वाटचाल ही अत्यंत पारदर्शी आहे. म्हणून तुम्ही मला मदत करून निवडून देता. तुमच्या या प्रेमाचा अमूल्य ठेवा शेवटपर्यंत राहावा असे मला वाटते. तुमच्या या ऋणातून या जन्मी नव्हे तर पुढील सात जन्मीही मुक्त होऊ नये असे मला वाटते. (टाळ्या) 15 ऑगस्टला हेडमास्टर येडके गुरुजी त्यांना बोलवायचे तेव्हा मुलांना ते एकच गाणे न थकता नेमाने ऐकवायचे. एव्हाना शाळेतल्या मुलांना दरवर्षी ऐकून ऐकून पाठ झाले होते. त्यांनी सुरुवात करण्यापूर्वी मुलेच सुरू करायची. ते गाणे असे होते.”
इन्साफ की डगर पे बच्चो दिखावो चल के
ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के
यावर शिक्षकवर्ग कडकडून टाळ्या वाजवायचे. तेव्हा त्यांना आणखीनच चेव यायचा आणि ते म्हणायचे,“जीवन नया मिलेगा अंतिम चिता मे जलके”(टाळ्या)
कालचक्र कधी कधी उलटे फिरते म्हणतात तसेच आबासाहेबांचे झाले. अथणीच्या एका गरीब बाईची 15 एकर जमीन आबासाहेबांनी लुबाडली असे एक प्रकरण त्या भागातील एक आमदार थल्लपा पाटील यांनी पुराव्यानिशी छापून आणले आणि बाजी पालटली. आबासाहेब लबडे यांना पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीचे तिकीट देण्याचे नाकारले. त्यामुळे आबासाहेब हबकले. पक्षाचे लोक म्हणाले, या प्रकरणाची चौकशी झाली तर तुम्ही खडी फोडायला जाल आणि आमच्या पक्षाची नाचक्की होईल ते वेगळेच. तेव्हा आम्ही तुम्हाला या कचाट्यातून सोडवतो. त्यामुळे आबासाहेब चार वर्षे जवळजवळ अज्ञातवासात होते. या वेळी पक्षात बंडखोरी करून अपक्ष उभे राहायचे त्यांनी ठरवले. त्यांच्या फुक्कटखाऊ फंटरना आनंद झाला. इतर उमेदवार त्यांना वार्यावर उभे करीत नव्हते. कारण त्यांचेच पैसे खाऊन काम न करता त्यांनी अगोदरच आपली लायकी घालवली होती. आबानी त्यांना खूप लाडावून ठेवले होते. त्यांना पैसे वाटता वाटता आबांच्या हातातले पाचशेच्या नोटांचे बंडल बघता बघता संपायचे तरी ते लोचटासारखे हात पुढे करायचे.
तालुक्याला जाऊन आपली निशाणी साडी ठरवली. त्यांना माहीत होते आपल्या घरात, नात्यात महिलांचा भरणा होता. प्रत्येकीला एक एक दिली तरी अर्धी मते फिक्स होतील. घरातल्या आतल्या कोपर्यात त्यांनी मुद्दामच पाण्याची टाकी बसवून घेतली होती. तिच्या पाठीमागे चोरकप्पा होता. त्यात एक छोटेसे लोखंडी कपाट होते. त्यात त्यांनी लांडीलबाडी करून कमावलेल्या पैशांच्या राशी होत्या. हे गुपित त्यांच्यापुरते मर्यादित होते. त्यामुळे त्यांना पैशांची तशी काळजी नव्हती. शिवाय बाजारपेठेत त्यांचा मारवाडी मित्र सूरजमल जैन याचे ‘माहेरची साडी’ नावाचे साड्यांचे जंक्शन दुकान होते. दादासाहेब तसे पहिल्यापासून धोरणी म्हणून तर त्यानी ठेवली साडी निशाणी! ते म्हणायचे बायकांना कधीही विचारा तुम्हाला प्राणाहून प्रिय काय? तर त्या म्हणतील… साडी आणि सोन्याचे दागिने. आबासाहेबांना प्रसिद्धीचा भरपूर सोस. त्यांनी लगेच आपल्या फंटरतर्फे आपली प्रसिद्धी यंत्रणा गावात फिरवली. एस. टी. स्टँड, धी न्यू मराठी सलून, जुनी शाळा, नवीन हायस्कूल इकडे इस्टमन कलर रंगीत फ्लेक्स लावले. त्यात कोलगेट हास्य असलेला हात जोडून मतांची भीक मागणारा फोटो व पाठीमागे साडी घेऊन मतासाठी उजवा हात दोन बोटे व्ही फॉर व्हिक्टरी म्हणून ताणलेल्या महिला… गावात एकच विषय “आबासाहेबांचं वय झालं तरी डोकं शाबूत आहे.“ त्यातली खरी गोम अशी होती. त्यांच्या दोन नंबर मुलाचे इंद्रजितचे लग्न तालुक्यात प्रख्यात असलेले मटणाच्या - मच्छीच्या पदार्थांसाठी अतिशय फेमस हॉटेल ’जिभेची चव’ चे मालक अरुण भातकांडे यांची मुलगी दीपिका हिच्या सोबत लग्न होणार होते. खरं तर आबांचा संपूर्ण इतिहास भातकांडेला माहीत होता. तर कर्नाटकातल्या उदय शेट्टी नावाच्या मालकाचे ते हॉटेल होते. एका रात्री त्याला गुंडाकरवी मरणाची भीती घालून त्यांनी त्याला रातोरात कर्नाटकात पळवून लावले व त्याचे हॉटेल अक्षरशः बळकावले होते, हेही आबासाहेबाना ज्ञात होते.
शंभर उंदीर खाऊन या बोक्याने आता संन्यास घेऊन अध्यात्माचे कातडे पांघरून तो सोवळा झाला होता. लग्नाला या दोघाही पालकांचा विरोध होता. मग इंद्र आणि दीपूने हसून एकमेकांच्या कानात काहीतरी सांगितले व मुंबई किंवा गोव्याहून येईल त्या गोरज मुहूर्तावर वेळ 12.54 दुपार… धावत्या पॅसेंजर खाली उडी मारून या जगाला कायमचे सोडणार… विरोध करणार्यांची वाचाच बसली मग गोरज मुहूर्तावर दीपू व इंद्र यांचे थाटामाटात लग्न पार पडले. आबासाहेबांनी व्याह्याला कडकडून मिठी मारली तेव्हा भातकांडे त्यांच्या कानात म्हणाले, “आबा तुमच्याबद्दल मला सर्व काही माहीत आहे. तेव्हा मी कसा मागे राहीन… मला पण माहीत आहे… पण व्याही ते जाऊ द्या. एकमेका सहाय्य करू, धरू अवघे सुपंथ , असे म्हणून आबानी त्यांना शेक हॅण्ड केले.” मग आबानी आपल्या ठरावीक गोतावाळ्यासोबत सरस्वती विद्यामंदिर हायस्कूलच्या सरस्वती वाचनालयाच्या हॉलमध्ये बैठकी रोज घ्यायला सुरुवात केली व त्यांचे खास मित्र का. य. येडके (एम. ए. डीयेड) यांच्या हस्ते साडी प्रधान सोहळा पार पाडला. शाळेतल्या शारीरिक शिक्षण टीचर गावात जरा उठून दिसणार्या -जाहिरातीत दिसतात तशी अंगकाठी व मधाळ हास्य असलेल्या कु. शर्वरी नलावडे यांना भरजरी साडी प्रदान करून धूमधडाक्यात साडी वाटप कार्यक्रम सुरू केला. आबासाहेबांच्या मिसेस सौ. कौसल्या यांना सर्वजणी महिला आघाडीच्या अति विशाल महिला त्यांना आऊ म्हणत तर त्या आऊसाहेबांनी दोन दिवसात तीन हजार साड्या वाटल्या. (यात परगांवच्या महिलाही हात धुऊन घ्यायच्या.)
इकडे गावात आबासाहेबांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हरी हळकुंडे (यांची तालुक्याला मोठी हळदीची कंपनी होती, आहे.)यानी वेगळाच प्लॅन आखला होता. निवडणुकीच्या तोंडावर टोपीवर टोपी या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली होती व 21 वर्षावरील तरुण व तरुणींना या चित्रपटात अभिनय करण्याची मोफत संधी दिली जाईल अशी जाहिरात केली. दुसर्या सकाळी रणरणत्या उन्हात (कुठून आले हे?) असा महासागर लोटला होता. गर्दीला काबूत आणण्यासाठी कार्यालयाबाहेर पोलिसांची कुमक मागवावी लागली. तो अफाट तरुण जनसागर पाहून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले आणि छाती हबकली.
हळकुंडेची निशाणी होती - पिवळे सूर्यफूल! ती गर्दी पाहून आबासाहेबांच्या छातीत धस्स झाले आणि पोटात भीतीचा गोळा उठला. गावात उत्साही मतदारांचा धुरळा उडायला लागला. रस्त्याला माणसे कमी व उमेदवारांच्या चमच्यांनी गच्च भरलेल्या जीप्स जास्त दिसायला लागल्या. आणि एका दिवशी गावावर बॉम्बच पडला. निवडणूक आयोगाने एकमुखी निर्णय घेतला. या वर्षी पावसामुळे निवडणुका घेता येणार नाहीत, कारण या वर्षीचा उन्हाळा कडक असल्यामुळे पाऊसही या वर्षी तितकाच बेधडक पडणार आहे. गावावरच नव्हे तर सर्व जिल्ह्यात पर्जन्य संकट येणार आहे. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन पावसानंतरच काही तो निर्णय घेण्यात येईल. उमेदवारांनी आपल्या प्रसिद्धीसाठी केलेल्या अफाट पैशांच्या खर्चाबद्दल आम्ही (सरकार) सहानुभूती व्यक्त करीत आहोत.
आबासाहेबांच्या तर तोंडचे पाणी पळाले. साड्यांची उधारी जवळजवळ पाच सहा लाखावर गेली होती. त्यात आबांना एक बचावाची संधी उपलब्ध झाली. त्याने त्या साड्या सुरत मार्केटमधून पाव किंमतीत आणून दिल्या होत्या. (सुरजमलला पेचात पकडायला आयता मार्ग आबांना सापडला) दुसर्या दिवशी पेपरात हळकुंडेची जाहिरात झळकली होती. ‘टोपीवर टोपी’ हा आपल्या जिल्ह्यातील तरुण तरुणींना अभिनयाची संधी देण्यासाठी सुरू केलेला सिनेमाचा प्रोजेक्ट बंद करीत आहे. मी समस्त तरुण वर्गाची माफी मागत आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्याला दोन दिवस झाले नसतील तर सकाळी दहाच्या सुमाराला हजारो तरुण आणि तेवढ्याच तरुणींनी हातात काळे झेंडे घेऊन गावात हळकुंडेच्या नावाने ‘सोडणार नाही… हळकुंडेना माफी नाही. लवकर प्रोजेक्ट चालू करा. नाहीतर मरा.’ असल्या चमत्कारिक घोषणा देत त्यांच्या हळदीघाट बंगल्यापुढे ठिय्या मांडला. हा सर्व तमाशा आबासाहेब आणि कौसल्याबाई त्यांच्या बंगल्याच्या टेेरेसवरून पाहत होते. त्यावर कौसल्याबाई म्हणाल्या, “काय आबासाहेब, या पुढे खेळणार का राजकारणाची होळी?” खी… खी…. ते वैतागून म्हणाले, “मायला त्या खेळाच्या … आता राजकारण गेलं चुलीत. आपण आपला दूध डेअरीचा जुना धंदा चालू करू. त्यात पाणी घालायला तरी चान्स आहे. नुकसान नाहीच.
फायदाच फायदा.”
Link Copied