दहावी बारावीच्या मुलांना उघडउघड कॉपी करण्यास मुभा देणाऱ्या आज कित्येक शाळा अस्तित्वात असून त्यावर खूप दुर्मिळ बोललं जातं. परंतु दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या लेखक दिग्दर्शकाच्या जोडीने ‘कॉपी’ या चित्रपटातून या दुर्मिळ भाष्याला छेद देऊन समाजासमोर एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा केला आहे. चित्रपटाचा ८ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून चित्रपट प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणार आहे.
‘कॉपी’ हा चित्रपट ५५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पदार्पण, १० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकार आणि इतर अनेक नामांकित चित्रपट महोत्सवात पुरस्कृत झाला आहे. लोकप्रिय अभिनेते मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, अनिल नगरकर, जगन्नाथ निवांगुणे, विपुल साळुंखे, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. दया प्रभा, आश्रू वानखेडे आणि हेमंतकुमार धाबडे या त्रिकुटाने कॉपीचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाच्या कथेतून ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापनाकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराचा उलगडा केला आहे. शिवा, प्रकाश आणि प्रिया एका खेड्यात राहत असून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत आहेत. एकीकडे शाळेतील इतर मुले कॉपी करून परीक्षा देत आहेत तर दुसरीकडे कित्येक मैल चालत येऊन हे गरीब त्रिकुट प्रामाणिकपणे परीक्षा देत आहे. पण त्याचवेळी शिक्षण अधिकारी कॉपीचे दृश्य बघून शाळा बंद करण्याचे आदेश देतो. चित्रपटाच्या या वळणावर मूळ कथानक सुरू होऊन पुढे काय घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.
‘कॉपी’ चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षण हा अतिशय संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.