Close

अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेला ‘मोऱ्या’ हा मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीमुळे अडचणीत (Internationally Acclaimed Marathi Film ” Morya”s Release In Trouble : Censor Board Shows Indifference To Issue Certificate)

लंडन येथे प्रदर्शित होऊन प्रेक्षकांची पंसती पावलेला, तसेच कान्स, बार्सिलोना, पेनझान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तसेच खजुराहो, झारखंड, अयोध्या, लेक सिटी इत्यादी देशांतर्गत चित्रपट महोत्सवात विविध पुरस्कार मिळविलेला ‘मोऱ्या’ हा मराठी चित्रपट आता मात्र सेन्सॉर बोर्डाच्या आडमुठ्या व अडवणुकीच्या धोरणामुळे अडचणीत आला असून येत्या १२ जानेवारीस तो प्रदर्शित कसा करायचा, हा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे.

गेले काही महिने सातत्याने पाठपुरावा करून देखील सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र का दिले नाही, याबाबतची माहिती ‘मोऱ्या’चे लेखक-दिग्दर्शक जितेन्द्र बर्डे यांनी पत्रकारांना दिली. “२०२२ साली सप्टेंबर महिन्यात या चित्रपटास प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तो बोर्डापुढे सादर करण्यात आला. तेव्हा त्यांनी खूप कटस्‌ दिले. जे आम्हाला मान्य नव्हते. त्यावर रिवायजिंग कमिटीकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले. तो केल्यावर सदर कमिटीने आणखी नवे कटस्‌ सुचविले. जे ग्राफिक डिझायनिंग मधले होते. त्याचा खर्च मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना परवडण्यासारखा नव्हता. सदर भागाचे रिशूटिंग करणे देखील आवाक्याबाहेरचे होते. हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी निर्मात्यांनी रक्ताचे पाणी केले होते. ही बाब तेव्हाचे विभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिली. तरी पण पुन्हा निर्मात्यांनी कर्ज काढून सदर ग्राफिक्समध्ये सुधारणा करून दिल्या. सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचं पालन करून ही प्रक्रिया केली अन्‌ केलेल्या बदलानुसार, ते पाहून चित्रपटास प्रमाणपत्र देण्याची आम्ही सेन्सॉर बोर्डास विनंती केली. दरम्यान महेश पाटील यांची बदली होऊन त्यांच्या जागी हाश्मी नावाचे विभागीय अधिकारी आले आहेत. ते अनेक दिवसांपासून आमची भेट नाकारत आले आहेत. आम्हाला चित्रपटाचे प्रदर्शन करण्याची निकड असल्याने आम्ही अनेकदा त्यांचे उंबरठे झिजवले. पण त्यांनी मदत केली नाही. आम्ही फारच मागे लागल्याचे पाहून हाश्मी यांच्या वतीने सदर चित्रपट पुन्हा अर्जदाखल करा, असे सांगण्यात आले. आधी दोन वेळा प्रदर्शनाची तयारी करून प्रमाणपत्र न मिळाल्याने ती पुढे ढकलावी लागली, त्यात निर्मात्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता चित्रपट पुन्हा अर्जदाखल करण्यासाठी पैसे खर्च करणे आम्हाला शक्य वाटत नाही. त्याचा विचार करून आम्हाला सहकार्य करावे, अशी मागणी आहे.”

बर्डे यांच्या या भूमिकेला उपस्थित निर्मात्या तृप्ती कुलकर्णी व पूनम नागपूरकर यांनी पाठिंबा दिला.

सफाई कामगार ते सरपंच असा कलाटणीपूर्वक जीवनप्रवास करणाऱ्या नायकाची कथा ‘मोऱ्या’मध्ये मांडण्यात आली आहे. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर गावात चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले आहे. उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील व शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. सफाई कामगाराच्या जीवनावरील या चित्रपटास सेन्सारच्या कात्रीतून सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत घेण्याचा मानस या प्रसंगी बर्डे यांनी व्यक्त केला.                                                                          

Share this article