नाताळच्या सुट्ट्या चालू आहेत, अन् ३१ डिसेंबर व नववर्षाच्या निमित्ताने पार्टी, समारंभ सुरू आहेत. नव्या युगातील हे सणासुदीचे दिवस म्हणता येईल. या दिवसात आपले खाण्यापिण्यावर नियंत्रण नसते. अति सेवनाने विषारी द्रव्ये पोटात जातात. या विषारी द्रव्यांपासून शरीरशुद्धी केल्यास शरीर निरोगी राहते. त्याबाबत प्रभावी उपाय सांगत आहेत नर्चर हेल्थ सोल्युशन्सच्या संस्थापिका व सफोला न्युट्रिशन पार्टनर, नोंदणीकृत आहार तज्ञ शेरील सॅलीस –
सणासुदीत मेजवानी घेताना तुम्ही ताटात किती खाद्यपदार्थ वाढून घेता, यावर लक्ष ठेवा. लहान प्लेट निवडून तुम्ही अन्नाची मात्रा कमी करू शकता. जेवणाआधी थोड्याशा पाण्याचा घोट घ्या. अन्न सावकाश चावा.
अतिसेवन केलेले खाद्यपदार्थ व मिठाया यांच्या दुष्परिणामापासून बाहेर पडण्याचा उत्तम उपाय म्हणजे गहू, दलिया, ज्वारी या धान्यांपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा जेवणात वापर करणे.
सणाच्या दिवसात तळलेले पदार्थ खाताना मजा वाटते. पण त्यातून मोठ्या प्रमाणात कॅलरीज पोटात जातात. यावर उपाय म्हणजे तुमच्या तेलावर लक्ष ठेवा. स्वयंपाक करताना तेल चमच्याने मोजा किंवा ते अनिर्बंधपणे ओतण्याऐवजी भांड्यात तेल पसरवण्यासाठी सिलिकॉन ब्रशेस वापरा.
मीठाचा वापर बेताने करा. मीठाने अंगातील सोडियमचे प्रमाण वाढते, ते आरोग्यास चांगले नाही. तेव्हा सॅलडवर मीठ किंवा चाट मसाला टाकण्याऐवजी लिंबाचा रस पिळा. चिंच, कोकम आणि आमचूर पावडर हे देखील चांगले पर्याय आहेत. लोणची, पापड, चटण्या यांचा मर्यादित वापर करा.
सणासुदीच्या या काळात गोडधोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन झाल्याने नंतरच्या काळात ते वर्ज्य करा. आपल्या अन्नात नैसर्गिक स्वरुपात नसलेली, वरून घातलेली साखर कोणत्याही प्रकारचे पोषक द्रव्य पुरवत नाही. तेव्हा नैसर्गिक साखर असलेले पदार्थ निवडा. अन् कमी गोड असलेले पदार्थ खा.
लो-फॅट असणारी प्रथिने निवडा. तुमच्या आहारात प्रथिने अधिक व कमी फॅट यांचा समावेश असणाऱ्या प्रथिनांचा उपयोग करा. प्रथिनांचा कोणताही स्रोत जोडण्याने स्वादिष्ट व आरोग्यमय भोजनात मदत होईल. शिवाय तुम्ही दिवसभर उत्साही राहाल व त्वचा केस देखील सुधारतील.
शारीरिक हालचाल वाढवा. आठवड्यातील किमान ५ दिवस ३० ते ६० मिनिटे मध्यम प्रमाणात व्यायाम केल्याने लक्षणीय फरक दिसून येईल.