‘आईच्या गावात मराठीत बोल’ चे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबई मध्ये सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मीडिया यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाद्वारे ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते तद्दन खूश आणि हसून लोटपोट होणार आहेत. याला ओमीच्या नव्या भाषेचा चमत्कार म्हणायचे की विनोदाची एक नवी भाषा म्हाणायचे हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मराठी मुलीसोबत लगीनगाठ बांधली की तिच्या वडिलांची संपत्ती आपलीच असा विचार करून परदेशस्थ समर (ओमी) भारतात येतो. दोन महत्त्वाची कामे घेऊन तो आलेला आहे. एक म्हणजे मराठी मुलगी शोधणे आणि दुसरे आणि अधिक महत्त्वाचे अस्खलित मराठी बोलायला शिकणे ही कामे त्याला करायची आहेत. भारतातला या संबंधातला त्याचा प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे. त्यात लग्नासाठीचा खटाटोप तर तुम्हाला गुदगुल्या करेलच पण पुढे जे काही घडणार आहे त्याने तर तुम्ही लोटपोट होणार आहात. तर १९ जानेवारी २०२४ निश्चित करून ठेवा. मुहूर्त चुकवू नका...
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाची गाणी व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती आहे तर संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वनाथ यांचे आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल' या शीर्षक गीताचे धमाल बोल वैभव जोशी यांनी लिहीले आणि ठेका धरायला भाग पाडणाऱ्या या गीताला स्वप्निल बांदोडकर, विश्वजीत जोशी, मनीष राजगिरे आणि रोहित राऊत यांनी अस्सल मराठी आवाज दिला आहे. ‘तू हवीशी’ हे गाणे विश्वजीत जोशी यांनी लिहले आहे . तर ऋषिकेश रानडे याने गायलेलं गाणं कॉमेडीची मेजवानी असलेल्या चित्रपटात सुद्धा रोमॅंटीक माहोल तयार करत आहे.
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटामधील प्रमुख भूमिका ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष आणि सुधीर जोगळेकर अशी दमदार आहे.