जेवण झाल्यावर सात फेरे घेण्याचा रिवाज पूर्ण करण्याआधी रिया व शिरीष सर्व नातेवाईकांसोबत मंडपामध्ये सुस्तावल्यासारखे बसून राहिले. लग्न आणि फेर्यांचा मुहूर्त रात्री दीड वाजताचा होता. बारा वाजले आणि हॉलचे दिवे अचनाक गेले.
“रिया, तू आणि शिरीष 21 फेब्रुवारीला, संध्याकाळपर्यंत जयपूरला पोहचा हं. कसंही करून या. आपल्या घरातील कुळाचार आहे. तेव्हा तू तिथे असायलाच हवीस नाही का? खरेदीची काळजी नको. मी तुझ्यासाठी तीन-चार हेवी ड्रेसेस आणि दागिने घेऊन ठेवले आहेत. आमची सूनबाई सगळ्यांमध्ये उठून दिसली पाहिजे नं…”
“हं मम्मी,” असं उत्तर देऊन रियानं आपल्या सासूचा फोन शिरीषकडे सोपविला.
तिचं मन जोरजोरात आक्रंदत होतं. पण आता काही उपयोग नव्हता. शिरीषचा तिला मनापासून खूप राग आला होता. 24 फेबु्रवारीला आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, हे त्याला 24 फेब्रुवारीला आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, हे त्याला घरच्या लोकांना सांगत येत नव्हतं. जणू त्याचे ओठ शिवले होते. या फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरीसाठी त्यांनी कितीतरी आधीपासून बेत आखले होते. हा पहिला वाढदिवस अगदी रोमॅन्टिक पद्धतीने गोव्याला साजरा करण्याचे त्यांनी ठरविलं होतं. हातात हात गुंफून समुद्र किनार्यावरील वाळून लांबवर चालायचे ठरविले होते. समुद्रतटावरील लाटांच्या साक्षीने, गळ्यात गळा घालून धुंदीत वर्षभराच्या आठवणी जागवायच्या होत्या… पण हे सर्व रोमॅन्टिक बेत धुळीस मिळाले होते. कारण शिरीषने 21 तारखेची गोव्याची तिकिटं रद्द करून जयपूरची तिकिटं काढली होती. त्याचा चुलत भाऊ ध्रुव याच्या लग्नाला जाणं भाग होतं. अन् आपला आधीपासून ठरलेला बेत, त्याची केलेली आखणी घरच्यांना सांगायची शिरीषची हिंमत झाली नव्हती. जर त्याने निर्धारपूर्वक या गोष्टीची कल्पना आपल्या नातेवाईकांना दिली असती, तर ते काही नाही म्हणाले नसते. अन् गोव्याचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला असता. पण हा शिरीष आपली आई आणि काका-काकूंच्या आग्रहाला बळी पडला होता. गोव्याला जाण्याचे मनसुबे पार लयाला गेले होते.
शिरीष-रिया यांच्या लग्नाचं हे पहिलंच वर्ष आहे. लग्नानंतर हे पहिलंच वर्ष कसं भराभर निघून गेलं, ते कळलंच नव्हतं. दोघंही नोकरी करीत होते. त्यामुळे लग्नानंतर रिया सासरी आठ-दहा दिवस राहिली होती. अन् मग गुडगांवला दोघं भाडेकरू म्हणून राहत होते.
लग्नानंतर ते दोघं चार-पाच दिवस हनीमून साजरा करायला गोव्याला गेले होते. मधुचंद्राच्या मधुर आठवणी जागवत ते परत येत होते, तेव्हाच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस गोव्याला, त्याच रिसॉर्टमध्ये राहून साजरा करण्याचा संकल्प सोडला होता. मधुचंद्राच्या मधुर आठवणींना उजाळा देत भावी गोवा ट्रिपचे बेत त्यांनी आखायला सुरुवात केली होती. त्यानुसार त्यांनी आपापली रजा मंजूर करून घेतली होती. पण शिरीषचा चुलत भाऊ धु्रव याने झटपट लग्न ठरवून खलनायकी साकारली होती. त्याचं लग्न 23 तारखेला व्हायचं होतं नि 24 तारखेला शिरीष- रियाची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती. 21 ते 27 फेब्रुवारी अशी दोघांनी सुट्टी टाकली होती. त्यातील चार दिवस जर लग्नात वाया गेले, तर उरलेल्या दोन-तीन दिवसांसाठी गोव्याला जाण्यात काही मतलब नाही, हे रियाच्या लक्षात आलं. अन् ती खूपच कष्टी झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रवास करणं अगदी चुकीचं ठरलं असतं. अन् तिथे लग्नघरी पाहुण्यारावळ्यांच्या संगतीत राहणं अगदीच वाईट प्रकार ठरला असता… आता लग्नाला जाणं ही प्राधान्याची बाब म्हटली तर हरकत नाही. तिथेच जाऊन पाहूया… 23 तारखेचं लग्न उरकून सरळ गुडगांवला परत येऊया. दुसरं काय?…
रियाने हा निर्णय हट्टानेच घेतला होता. पण या हट्टामागे ठरलेल्या वेळात गोर्याला जात येणार नाही, याचं दुःख होत. थोडीशी तडजोड करून आपण लग्नघर आणि गोवा, असं दोन्ही ठिकाणी जाऊ शकतो, असा दिलासा देत, अपराधी भावनेनं शिरीष रियाची समजूत घालत होता. पण शिरीषला आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापेक्षा धु्रवच्या लग्नाला जाणं महत्त्वाचं आहे, हे समजून रिया अधिकच चिडली असल्याने तिने लग्नालाच जाण्याचा हट्ट धरला होता. “आता मी गोव्याला जाणारच नाही,” असं चिडून जाऊन तिनं सांगितलं. तेव्हा शिरीष बेचैन झाला होता, अन् गोव्याचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून रिया देखील मनातून दुःखी होती. तरीपण एक प्रयत्न करायचा म्हणून तिनं आपली सासू नर्मदाबाईंना सांगून पाहिलं, तेव्हा त्या बोलल्या, “हे बघ, तुझ्या सासरी, तुझ्यासमोर होणारं हे पहिलंच लग्न आहे. तेव्हा या लग्नाला येणं गरजेचं आहे. नवीजुनी नाती जोडण्याची, दोन पिढ्या एकमेकांच्या संपर्कात येण्याची, एकमेकांना भेटण्याची, समजून घेण्याची ही योग्य वेळ आहे. तुझ्या लग्नात, इतक्या सगळ्या लोकांशी नीट ओळखपाळख झालेली नाही. तू आमच्या घरातील सगळ्यांना भेटलीस तर आम्हालाही बरं वाटेल… धु्रवच्या लग्नानंतर तुम्ही गोव्याला जा ना!… पण इथे आली नाहीस, तर चर्चेचा विषय होईल.”
सासूबाईंना आपला प्रस्ताव पटत नाही म्हटल्यावर रियाने कडक धोरण स्वीकारत शिरीषला सुनावलं, “काय वाट्टेल ते झालं तरी आपण आपला प्लॅन बदलायचा नाही… तू कसंही करून लोकांची समजूत घाल.”
तिची कडक भूमिका ऐकल्यावर आपली मॅरेज अॅनिव्हर्सरी आधी नंतर ध्रुवचं लग्न अशी नरमाईची भूमिका आरंभी शिरीषने घेतली. कोणत्याही परिस्थितीत आपल्या आधी ठरलेल्या गोव्याच्या ट्रिपमध्ये बदल करायचा नाही, असा निश्चय त्याने व्यक्त केला. पण काका-काकू आणि मम्मी-पप्पा यांच्या आग्रहाने त्याचा निश्चय डळमळू लागला. आपल्या लग्नासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, सुट्टीसाठी बॉसशी भांडण करून ध्रुव कसा आला होता, हे शिरीषने रियाला पटवून दिले. अनेक वादविवाद झडले, नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले. तेव्हा आपण 21 फेब्रुवारीला जयपूरला पोहचायचं आहे, असा निर्वाळा शिरीषने दिला. पण रियाची नाराजी पाहून चारचौघात आपल्यावर टिका तर होणार नाही ना, याची धास्ती शिरीषला पडली होती.
जयपूरला रियाचे आपुलकीने, प्रेमाने स्वागत झालं. नवी सून आली म्हणून काका-काकू खूश होते. लहानमोठे असा भेदाभेद न करता लोक आपला व इतरांचा अशा रितीने परिचय देत होते…
“वहिनी, मी नेहा… तुमची पाठवणी करताना, मी तुमच्या सोबत होत…”
“आणि वहिनी, मी श्रेया… धु्रवभैयाची धाकटी बहीण. शिरीषभैया जेव्हा तुम्हाला घरी घेऊन आले होते नं, तेव्हा दरवाजात तुम्हाला रोखून धरणारी मी सर्वात शक्तिशाली योद्धा होते…”
“…आणि मी तुमचा दीर शोभित. तुमच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जे एकामागून एक घड्याळाचे अलार्म वाजले होते नं, त्याचा एकमात्र कर्ताधर्ता म्हणजे मीच होतो…”
असे अनेक दाखले देत जवळपास डझनभर तरी मामे-मावसभाऊ, आते भाऊ, चुलतभाऊ अन् बहिणींनी आपला परिचय दिला. आपल्या लग्नात अगदी थोडावेळ भेटलेले हे सगेसोयरे रियाला अंधूक अंधूक आठवत होतं. काही काळ रिया व शिरीष आपल्या लग्नाच्या निवडक आठवणींमध्ये रमले. रियाच्या सासूबाई मुलगा व सून आल्याच्या आनंदात होत्या. या लोकांसमोर रिया उतरलेल्या चेहर्याने वावरेल, ही शिरीषची भिती वृथा ठरली. कारण रिया सगळ्यांशी आनंदी चेहर्याने मिळून मिसळून वागत होती. तरुण मंडळींशी चेष्टामस्करी करून झाल्यावर काका-काकू, आत्या-मामी यांसारखी नातेवाईक मंडळी रियाशी गप्पा मारत तिच्याशी जवळीक वाढवू लागली. हळद लावण्याच्या समारंभात रियाने आपल्या सर्व दिरांना भरपूर हळद फासली. हसतखेळत मेंदी लावली तेव्हा तर तिची सेवा करायला शिरीषचे सगळे भाऊबंद तिची सेवा करायला तत्पर होते. कुणी तिला आपल्या हाताने पाणी, कॉफी पाजत होते.
लग्नाचे विधी पार पडत असताना संधी साधून रियाने गोव्याला जाता येत नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली. तर तिला खूष करण्यासाठी शिरीष तिच्या कानात कुजबुजला, “आज तर तूच नवी नवरी दिसते आहेस.”
त्यावर फारसा आनंद व्यक्त न करता, चेहर्यावर नाराजीचे स्मित आणत रिया बोलली, “उद्या आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस, जो आपण खास पद्धतीने साजरा करू पाहत होतो. वर्षभरातल्या मधुर आठवणींना उजाळा देत तुझ्याशी गप्पा मारण्याचा उद्याचा विचार होता. पण काय करणार उद्याचा आपला स्पेशल दिवस इथे नातेवाईकांच्या गर्दीत गुदमरून जाईल. अन् आपला पहिला वाढदिवस असा नीरस होऊन जाईल.” तिचे निराश उद्गार ऐकून शिरीष गप्प झाला.
“ओ हो! हे लव्ह बर्डस् तर राहून राहून आपल्याच लग्नाच्या आठवीत रंगून जातात…” श्रेयाने टोकलं तर दोघंही चपापले.
“शिरीष भैया, धु्रवच्या मेहुण्यांना आपण त्याचे जोडे सहजासहजी चोरू द्यायचे नाहीत हं. चल, काहीतरी प्लॅन बनवूया…”
आपल्या भावाच्या जोड्यांचे रक्षण करण्यासाठी श्रेया तिचा प्लॅन समजावून सांगू लागली तर रियाला आपलं लग्न आठवलं. शिरीषचे जोडे चोरून नेल्याचा प्रसंग आठवला आणि रियाच्या चेहर्यावर हास्याची लकेर पसरली.
जेवण झाल्यावर सात फेरे घेण्याचा रिवाज पूर्ण करण्याआधी रिया व शिरीष सर्व नातेवाईकांसोबत मंडपामध्ये सुस्तावल्यासारखे बसून राहिले. लग्न आणि फेर्यांचा मुहूर्त रात्री दीड वाजताचा होता. बारा वाजले आणि हॉलचे दिवे अचनाक गेले. नंतर मग गलका ऐकू आला. एका ट्रॉलीत केक आलेला दिसला आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात हॉल उजळला. शिरीष आणि रिया यांना मित्रांचा, दिरांचा आणि नणंदांचा वेढा पडला. “हॅप्पी अॅनिव्हर्सरी’चे सूर निनादले, तसे ते दोघे आश्चर्यचकित झाले. मागच्या रांगेत काका, मामा, आत्या आणि सासरे “मुलांनो लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा” असं म्हणत आशीर्वाद देऊ लागले. मध्यरात्री बारा वाजता सगळ्यांच्या अनपेक्षित शुभेच्छा स्वीकारत ते दोघे दिङ्मूढ होऊन उभे राहिले होते. तेवढ्यात कुणीतरी बोललं, “आता सगळे जण एका बाजूला उभे राहा. आता भावी नवरा-नवरी या जोडप्याला शुभेच्छा देतील.”
ध्रुव त्याच्या नवपरिणीत वधूला घेऊन पुढे येत होता. नवपरिणीत जोडप्याकडून शुभेच्छा स्वीकारण्याचा हा प्रसंग रिया- शिरीषसाठी अविस्मरमीय आणि हृदयस्पर्शी ठरला. हे सर्व सरप्राईज धु्रवने ठरविलं होतं, हे लवकरच त्यांच्या लक्षात आलं.
रिया-शिरीषला शुभेच्छा देऊन झाल्यावर नवरा-नवरी मंडपात जाऊन बसले. लग्नाचे पुढचे विधी सुरू झाले. रिया-शिरीषला त्यांचे लग्नविधी आठवून अंगावर रोमांच फुलत होते. लोक पण त्यांची चेष्टा करतच होते. त्यांच्यासह धु्रवच्या लग्नविधीमध्ये मिसळून जात ते दोघंही आपल्या लग्नविधींचे क्षण अनुभवत राहिले. 24 फेब्रुवारीला सकाळी नव्या वधूच्या ‘मुंह दिखाई’ कार्यक्रमात रियाला पण सगळ्यांनी पहिल्या वाढदिवसाच्या तोंडभरून शुभेच्छा दिल्या. काकू, मामी, आत्या, सासू यांनी तर भेटवस्तूपण दिल्या. या उत्सापूर्ण, उत्सवाच्या वातावरणात गोव्याला पोहचू न शकल्याचं किल्मिष रियाच्या मनातून निघूनच गेलं. लग्नघरातील गडबड, उत्साह मागे टाकून ते दोघं रेल्वे स्टेशनाकडे निघाले, परंतु पोहचले मात्र विमानतळावर. रियाच्या चेहर्यावर गोंधळल्याचे भाव पाहून शिरीषने तिचा हात धरला आणि म्हणाला, “काल तुझ्या चेहर्यावरील आनंदाचे, उत्साहाचे भाव पाहिले नि माझी हिंमत वाढली. म्हणून मग मी तुला न सांगताच गोव्याची विमानाची तिकिटं काढली.”
रियाला खूपच आनंद झाला. रात्री विमानातून तिनं चंद्र पाहिला. अन् भावुक होत म्हणाली, “शिरीष, गोव्याला न जाण्याचा हट्ट मी धरला खरा, पण तो मला जन्मभर बोचत राहिला असता. पण गोव्याला अशा रितीने निघण्याचा जो निर्णय तू घेतला तो मला जन्मभर रोमांचित करत राहील. थँक्यू सो मच…”
गोव्याला ते संध्याकाळी पोहोचले. ज्या ठिकाणी त्यांनी पूर्वी मधुचंद्र साजरा केला होता, त्याच रिसॉर्टमध्ये ते उतरले होते. आनंदाच्या, हर्षाच्या भावनांमध्ये ते आकंठ बुडाले होते. रूममध्ये पोहोचताच शिरीषने रियाला मिठीत घेतलं. नंतर तिची नजर आपल्या सूटकेसवर पडली. त्यांना मिळालेले गिफ्टस् उघडून पाहण्यास ती उत्सुक होती. तिनं एकामागून एक बॉक्सेस उघडले. आशीर्वाद आणि शुभेच्छांसह मिळालेल्या भेटवस्तू पाहून रिया हरखून गेली होती. थोड्या वेळाने तिने शिरीषकडे पाहिलं तर तो झोपी गेला होता. रात्रभर झालेलं लग्नाचं जागरण व दुसर्या दिवशीची दगदग याने थकून त्याला झोप लागली होती. थकली तर ती देखील होती. शिरीषच्या हातांच्या उशीवर डोकं ठेवून ती पण झोपी गेली.
सकाळी तिचे डोळे उघडले तर शिरीष तिच्याकडे प्रेमानं पाहत होता. त्याला बिलगून रियाने विचारलं, “काय बघतो आहेस?…” शिरीष चेष्टेनं म्हणाला, “माझ्या नवरीला बघतोय. एक वर्षापूर्वी मी जिला अशाच वेळी चांदण्याच्या प्रकाशात घेऊन आलो होतो…”
“ओह, म्हणजे माझा प्रिया, मला सोबत घेऊन आलाय…”
“हं. लग्नबिग्न लागलं, आता हनीमून साजरा करण्याची वेळ आहे.”
“चल, चावट कुठला!” रिया गुदगुल्या झाल्यागत बोलली. उत्साहाची, तृप्तीची लहर त्यांच्या अंगात दौडली. दोन-तीन दिवस गोव्यात राहून ते परतीच्या प्रवासाला निघाले. तर शिरीष भावुक होत म्हणाला, “आपण जे ठरवलं असतं, ते कधी कधी सिद्धीस जात नाही. जीवनात होतं असं कधी कधी…”
शिरीषला पूर्ण बोल न देता रिया म्हणाली, “कारण त्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या जीवनात घडायचं असतं. आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस असा आश्चर्यकारक रितीनं होणं, हे आपल्या नशिबात होतं. म्हणूनच आपण धु्रवभैयाच्या लग्नाला गेलो. त्याच्या लग्नाला न जाता सरळ गोव्याला आलो असतो, तर तिथे घडलेली सगळी एक्साइटमेंट मिस केली असती. जे घडलं त्यापेक्षा अधिक चांगलं काही घडू शकलं नसतं.”
“हूं…” शिरीष पुन्हा चेष्टेच्या स्वरात म्हणाला, “मला नं, मनापासून वाटत होतं की, लग्नाआधी हनीमून करता कामा नये. म्हणून तर 24 फेब्रुवारी ही तारीख उलटल्यावर हा हनीमून रंगविला.”
“ओह! म्हणजे धु्रवभैयाचं लग्न हे तुझं एक कारस्थान होतं तर! माझ्या हे लक्षातच नाही आलं. असो, एवढ्या स्पेशल मॅरेज अॅनिव्हर्सरीबद्दल थँक्स!”
रियाच्या या बोलण्यावर शिरीष लगेच बोलला, “आपला दुसरा हनीमून साजरा करण्यासाठी, अन् ते अविस्मरणीय करण्यासाठी तू तुझा अहंकार, आणि नाराजी दूर सारलीस, त्याबद्दल तुला पण खूप खूप थँक्स!” दोघं हसले. विमानातून दूर जाणारा समुद्र पाहत, या प्रेमी युगुलाने पुन्हा, पुढल्या वर्षी गोव्याला येण्याचा, मनातल्या मनात संकल्प सोडला होता.