Close

सत्यनारायण (Short Story: Satyanarayan)

  • ऋषीकेश वांगीकर
    गोपाळभटजींना खूप आनंद झाला आणि बर्‍याच वर्षांनी त्यांच्या चेहर्‍यावरचे हसू पाहून रत्ना आणि सुमनला सुद्धा खूप आनंद झाला.वर्षानुवर्षे सत्यनारायणाच्या पूजा सांगणार्‍या गोपाळभटजींना अखेर आज तो सत्यनारायण खर्‍या अर्थाने पावला होता.
    नेहमीप्रमाणे गोपाळभटजी पहाटे पाचच्या ठोक्याला उठले. आज इतक्या वर्षांची सवय असल्याने त्यांना घड्याळाचा गजर लावायची कधीच गरज वाटली नाही. वडीलांचा धाक आणि शिस्त यांच्या बडग्याखाली त्यांचे तरुणपण कधी आले आणि कधी ते प्रौढ झाले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. वडीलांच्याच एका पुजारी मित्राची मुलगी त्यांना सांगून आली. सर्व आधीच ठरल्याने पसंती नापसंतीचा प्रश्नच नव्हता. चारचौघांचे लग्न व्हावे तसे गोपाळभटजींचेही झाले. थोराड वाटणार्‍या गोपाळभटजींपुढे त्यांची बायको मात्र नाजूक चणीची आणि अत्यंत गृहकृत्यदक्ष होती. आतापर्यंतचा संसार तिने अतिशय नेटाने चालवला होता. त्यांना एक मुलगीही होती आणि आता ती 12-13 वर्षांची झाली होती. स्वभावात जात्याच एक रूक्षपणा होता गोपाळभटजींच्या. इतके वर्षात त्यांच्या मुलीनेच काय पण बायकोनेही कधी गोपाळभटजींच्या चेहर्‍यावर हास्य पाहिले नव्हते. सत्यनारायणाच्या पूजा सांगून सांगून त्यांच्या चेहर्‍याचीही जणू वाळलेल्या खारकेसारखी अवस्था
    झाली होती.
    पण आजच्या दिवसाच्या नशिबात काहीतरी वेगळे होते. आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच त्यांना गावातल्या मोठ्या सराफाकडे आमंत्रण मिळाले होते. सराफाच्या खूप पेढ्या होत्या. श्रीमंतीचा धूर आजूबाजूच्या शहरांमधूनही पसरला होता. त्यांचे घर म्हणजे जणू महालच होता. त्याच्या आसपास जातानाही खूप पहार्‍यातून जावे लागत असे. अशा ह्या घरंदाज मंडळींमध्ये गोपाळभटजी जाणार होते. सत्यनारायणाची पूजा सांगितली होती. पण पूजेची दक्षिणा हा एकच विषय नव्हता, तर त्यांच्या घरी जाऊन गोपाळभटजींची वर्णी ही गावातल्या इतर पंडितांमध्ये लागणार होती. त्यामुळे स्वारी आज खूश होती.
    आंघोळ, देवपूजा उरकून झाल्यावर रत्नाने, म्हणजे त्यांच्या बायकोने कपभर दूध दिले. ते पिऊन आपल्या मिशांवरून हलकेच मूठ फिरवून ते घराबाहेर पडले. इतक्यात समोरून त्यांची मुलगी सुमन, पाण्याची कळशी काखेत घेऊन येताना दिसली. थोडी लंगडत येत होती ती. कारण पाणी आणताना ठेच लागून अंगठा रक्तबंबाळ झाला होता. पण गोपाळभटजींना घाई असल्याने त्यांनी फक्त एकदाच तिच्या अंगठ्याकडे पाहिले आणि ते सरळ तिच्या समोरून निघून गेले. सुमन त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात राहिली आणि तशीच लंगडत लंगडत घरी आली.
    साधारण नऊच्या सुमारास गोपाळभटजी सराफाच्या बंगल्याजवळ पोहोचले. बंगल्याच्या आवारात एकदम सामसूम होती. नक्की ह्याच घरात पूजा आहे ना? असा प्रश्न पडला भटजींना. त्यांनी गेटवरच्या वॉचमनला विचारले, “इकडे आज पूजा आहे ना?” वर्दीतला वॉचमन त्यांना तिथेच उभे करून आत विचारायला गेला. थोड्या वेळाने बाहेर आला तो आतल्या नोकरवजा इसमाला घेऊन. त्या इसमाबरोबर गोपाळभटजी आत गेले. त्या माणसाने त्यांना दिवाणखान्यात बसविले. दिवाणखाना अतिशय प्रशस्त होता. मऊ गालिचे, सोफा सेट, त्याच्या रंगाला साजेसे इतर फर्निचर, झुंबरे, भिंतीवरची चित्रे, उंची फ्लॉवर पॉटस्, वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती. काही मूर्ती ह्या खजुराहो स्टाइल मधल्या होत्या आणि त्यांच्याकडे एकटक पाहणेही गोपाळभटजींना ओशाळवाणे वाटत होते. इतक्यात तो मघाचाच नोकर पाणी घेऊन आला. पाणी पिताना गोपाळभटजींना जाणवत होते की पूजेचे निर्मळ वातावरण कुठेच नाहीये.
    इतक्यात आतून आवाज आला, “अरे मनोहर,तो भटजी आलाय का? त्याला म्हणावं चल आटप लवकर.”
    आपल्या नावाचा असा एकेरी उल्लेख गोपाळभटजींना आवडला नाही. उभ्या आयुष्यात त्यांना कुणी अरे-तुरे केले नव्हते. मनोहर गोपाळभटजींना आत घेऊन गेला. आत सराफ आणि त्याची बायको मोठ्या टेबलावर नाश्ता
    करीत होती.
    “पूजा कुठे मांडलिये?” गोपाळभटजींनी विचारले. “पूजेला कोण बसणार आहे?”
    सराफ म्हणाला, “पूजेला मी आणि माझी बायको बसणार आहे आणि हे बघ, आम्हाला आज फार्म हाऊसवर पोचायचंय्. संध्याकाळी फंक्शन आहे. त्यामुळे तुझी पूजा लवकर आटप. वेळ नाहिये आमच्याकडे. कळलं?” गोपाळभटजींची कपाळावरची शीर तटतटून फुगली. आधीच ते तापट आणि त्यातून सराफाकडचे वातावरण पाहून अजून भर पडलेली. सराफ पुढे म्हणाला, “आमच्या म्हातारीची इच्छा, म्हणून पूजा घालतोय. तिची शेवटची इच्छा पूर्ण झाली पाहिजे ना? काय?”
    काहीही न बोलता गोपाळभटजींनी सर्व तयारी केली. पूजेचे खांब लावले, बाळकृष्ण मांडला, तुळशीपत्रे आणि फुले मांडली आणि ते उदबत्ती, धूप लावून यजमानांची वाट पाहत बसले.
    अर्ध्या तासाने यजमान आणि त्यांची बायको आली. ती पाटावर बसणार इतक्यात तिचा पाय उदबत्तीवर पडला आणि त्या सौम्य चटक्याने तिने आकांततांडव सुरू केले.
    “अरे भटजी जरा बघून लाव ना उदबत्ती, इतके कळत नाही तुला.” गोपाळभटजींच्याहून नक्कीच लहान असणारी सराफाची माजोरी बायको म्हणाली. क्षणभर डोळे मिटून त्यांनी लंगड्या बाळकृष्णाकडे पाहिले. आणि त्याच क्षणी त्यांना सकाळी ठेच लागलेली सुमन आठवली. अंगठा रक्तबंबाळ होऊनही शांत असलेली सुमन आणि अंगार्‍याच्या एका साध्या ठिणगीने संतापलेली सराफाची बायको. कशीबशी त्यांनी पूजा आटोपली आणि प्रसाद देण्यासाठी चमचा पुढे केला.
    “नको नको, तो प्रसाद आमची म्हातारी आई खाईल. तिला जास्त गरज आहे त्याची.” सराफ म्हणाला.
    गोपाळभटजींनी स्वतः जाऊन म्हातार्‍या आईच्या तोंडात प्रसाद भरविला. त्या मातेच्या सुकलेल्या डोळ्यांतून घळघळा अश्रू येऊ लागले. इतक्या मोठ्या घरात मायेचा ओलावा फक्त या मातेकडेच आहे हे गोपाळभटजींना जाणवले. बाकी सर्वत्र दुष्काळ होता.

  • गोपाळभटजी जायला निघाले. “थांबा गुरूजी,” मागून आवाज आला. सकाळचाच मनोहर होता तो. “पुजेची दक्षिणा दिलीये मालकांनी.”
    खिन्नपणे गोपाळभटजी हसले आणि म्हणाले, “अरे दक्षिणा ही फक्त माझा उदरनिर्वाह चालविण्यासाठी नाही घेत मी. तिथे असतो एक सच्चेपणा, आपलेपणा. पवित्र मंत्रांनी भारलेल्या घरातील दक्षिण घेताना मनातून एक आशीर्वाद येतो. आणि तेच खरे दात्याचे पुण्य असते. मी नाही घेऊ शकत ही दक्षिणा. येतो मी.”
    “मला प्रसाद द्या गुरुजी,” मनोहरने विनवणी केली आणि आनंदाने त्याला प्रसाद देऊन गोपाळराव घरी आले.
    आल्या आल्या त्यांनी आधी गार पाण्याने स्नान केले. रामरक्षा, स्तोत्रे म्हणत बाहेर येतानाच त्यांनी रत्नाला हातानेच जेवायला वाढण्याची खूण केली. सर्व आवरून गोपाळभटजी स्वयंपाकघरात आले. रत्नाने मांडलेली पाने, वाट्या इतर पदार्थ पाहून त्यांना खूप बरे वाचले. आपल्या साध्या घरातली श्रीमंती सुद्धा किती देखणी असू शकते असे त्यांना प्रथमच जाणवले.
    “सुमन, ए सुमन इकडे ये.” त्यांनी हाक मारली.
    “काय तात्या?तुम्ही बोलावलंत?” सुमनने विचारले.
    “हो. बस इकडे.” असे म्हणून त्यांनी तिला जवळ बसवले आणि हलकेच तिचा पाय वर घेऊन लागलेल्या अंगठ्याला तेल लावले. अंगठा खूपच सूजला होता. पण सुमनच्या सहनशीलतेचे त्यांना खूप कौतुक वाटले. तेल लावून झाल्यावर त्यांनी आपल्या पिशवीतला प्रसाद काढला आणि स्वतःच्या हातांनी सुमनला आणि रत्नाला भरविला. गोपाळभटजींच्या अचानक अशा वागण्याने दोघीही गलबलबून गेल्या. खूप वर्षांनी तिघेही एकत्र जेवायला बसली होती. ताटात असलेली हिरवी शेपूची भाजी, भाकरी आणि आमटी पाहून गोपाळभटजींना खूप आनंद झाला आणि बर्‍याच वर्षांनी त्यांच्या चेहर्‍यावरचे हसू पाहून रत्ना आणि सुमनला सुद्धा खूप आनंद झाला.
    वर्षानुवर्षे सत्यनारायणाच्या पूजा सांगणार्‍या गोपाळभटजींना अखेर आज तो सत्यनारायण खर्‍या अर्थाने पावला होता.

Share this article