-सुधीर सेवेकर
दीपकला बायको कशी हवी, आपल्या जोडीदारात तो कोणती गुणवैशिष्ट्ये पाहू इच्छितो, लग्न, प्रपंच, बायको याविषयीचे त्याचे विचार, मते काय आहेत, अशा अनेक बाबी दीपकच्या उत्तरातून स्पष्ट होणार होत्या.
मालतीबाईंचं मनं आज तृप्तीनं भरलेलं होतं. ही तृप्तता होती, त्यांच्या एकुलत्या एक मुलानं-दीपकनं घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची. निर्णय अर्थातच दीपकच्या लग्नाचा. दीपकने स्वतःच घेतलेला. दीपक जो काही निर्णय घेणार तो पूर्ण विचारांनी घेणार, सारासार विचार करून घेणार याची मालतीबाईंनी खात्री होतीच. त्यामुळे दीपकच्या निर्णयाबाबत आक्षेप घेण्याचा किंवा मतभिन्नता असण्याचा काही प्रश्न नव्हता. दीपकशी या संदर्भात झालेली चर्चा मालतीबाईंना आठवली. ”आई ही मुलगी मी फायनल केलीय गं!“ मालतीबाईंना आपल्या अत्याधुनिक मोबाईल हॅण्डसेटमध्ये मुलीचा फोटो दाखवत दीपक म्हणाला. मालतीबाईंनी हॅण्डसेट हातात घेतला आणि त्या फोटो पाहू लागल्या
”मुलगी तुझ्यापेक्षा पुष्कळच सावळी दिसतेय रे!“ रंगानं मालतीबाई म्हणाल्या. मुलगी सावळी आणि चारचौघींसारखीच दिसत होती. दीपकच्या रूपासमोर ती सामान्यच वाटत होती. दीपकला मुलगी कशी टॉप हवी. एखाद्या सिनेमा नटीसारखी किंवा टीव्ही सिरीयलमधल्या सुनेसारखी, असं मालतीबाईंना त्यांच्या मैत्रिणी म्हणत, ते आठवले. दीपक होताच तसा राजबिंडा. त्याच्या वडीलांसारखा गोरापान, उंच, सुदृढ आणि नाकीडोळी तरतरीत. त्याच्या शालेय वयात तर त्याला नाटकातून नेहमी राजपुत्राचीच भूमिका करायला मिळत असे. त्याच्या उमद्या व्यक्तीमत्त्वापुढे नाटकातील परीच्या, राजकन्येच्या भूमिका करणार्या मुलीही खूप फिक्या पडायच्या. त्यामुळे शालेय वयात त्याला शाळेत सगळेजण प्रिंस असंच संबोधीत.
प्रिंस दीपक यथावकाश कॉलेजात गेले. आणि त्यांच्या प्रिंसपणास आणखीनच धुमारे फुटले. दिसण्यातील देखणेपणास अंगभूत बुद्धीचातुर्याची जोड मिळाल्याने दीपकचे व्यक्तीमत्त्व विलक्षण लोभस आणि प्रभावी झाले. अभ्यासातील उत्तम गुण, खेळ व अन्य उपक्रमांतील लखलखीत कामगिरी, स्वभावातील विनम्रता इत्यादीमुळे दीपक त्याच्या महाविद्यालयीन जीवनात सर्वांना हवाहवासा वाटत होता. त्याच्या वडलांच्या अकाली निधनानंतर त्याच्या आईने-मालतीबाईंनी त्याला आर्थिक हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत लहानाचे मोठे केले होते. दीपकने कधी अवाजवी हट्ट केले नाहीत वा आईला त्रास दिला नाही. उलट शालेय वयात तो त्याच्यापेक्षा खालच्या वर्गातील मुलांच्या शिकवण्या घेत असे. आणि आईला चार पैशांची मदत करत असे. आईचे कष्ट, दगदग तो पहात होता. अन्य श्रीमंत मुलांसारखी आर्थिक अनुकुलता आपल्याला लाभलेली नाही याची त्याला जाणीव होती. त्याने तो कधीच खट्टू झाला नाही. उलट ही जाणीव त्याला अधिकच समजदार आणि सक्रिय करीत होती. जसे पेराल तसे उगवते या उक्तीप्रमाणे मालतीबाईंची सचोटी, कामसुपणा, प्रामाणिकपणा याचे बाळकडू तर त्याला मिळाले होतेच, शिवाय माणसाने कष्टाची लाज वाटून घेऊ नये हा अत्यंत मोलाचा संस्कार त्याच्यावर झाला होता. मुलांना घडवायचं, मोठं करायचं म्हणजे त्यांच्यावर सगळ्या सुखसोयींचा वर्षाव करायचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाकडे लक्ष द्यायचं म्हणजे त्यांना नाना प्रकारचे क्लासेस अभ्यासवर्ग यांची भरमसाठ फी भरून त्यांना अडकवून टाकायचं, हे जे काही आजकालचे बहुसंख्य पालक करतात, तसे मालतीबाईंनी अजिबात केले नव्हते. एक तर ते त्यांना मुळातच मान्य नव्हते, शिवाय असंख्य कृत्रिम व महागड्या उपाययोजनांसाठी लागणारा भरमसाठ पैसाही त्यांच्याकडेे नव्हता.
मालतीबाईंचा स्वभाव, त्यांची वागणूक, त्यांचे परिणाम हे सगळे पाहातच दीपक मोठा होत होता, संस्कारित होत होता. मालतीबाईंचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंतच. त्यामुळे दीपकच्या शिक्षणाबाबत त्या स्वतः त्याला काहीही मार्गदर्शन करू शकण्याच्या स्थितीत नव्हत्या. दीपकने आपली परिस्थिती, भोवतालची परिस्थिती, आपले गुरूजन व अन्य ज्ञानी माणसं यांच्या मदतीनं आपल्या शिक्षणाची दिशा ठरवली होती. त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला मेडिकल वा इंजिनियरींगकडे नक्कीच जाता आले असते. पण या दोन्ही विद्याशाखांचा अभ्यासक्रम भरमसाठ महागडा आहे, शिवाय अधिक मोठ्या कालावधीचा आहे. शिवाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या क्षेत्रात स्थिर होण्यासाठी, जम बसण्यासाठी पुष्कळ भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे आणि वेळही बराच लागतो. हे दीपकच्या सूज्ञ व चौकस बुद्धीच्या चटकन लक्षात आले. म्हणून हे महागडे अभ्यासक्रम जाणीवपूर्वक टाळून दीपकने कॉम्प्युुटरशी संबंधित अनेक कोर्सेस केले आणि कुठेतरी नोकरी पकडण्याऐवजी कॉम्प्युटर दुरूस्ती, देखभाल, मेंटेनन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या क्षेत्रात त्याने काम करायला सुरुवात केली. नोकरी ऐवजी उद्योजकतेचा मार्ग त्याने पत्करला. अंगभूत हुशारी आणि नवीन शिकण्याची तयारी यामुळे या क्षेत्रात त्याचा चांगलाच जम बसला. आज त्याच्या हाताखाली त्याच्यासारख्याच हुशार, होतकरू तरुणांची एक टीम काम करत आहे. हे सगळे तरुण, दीपकने पारखून आपल्या कामात समाविष्ट केले आहेत. अनेकजणांना रोजगार देणारा तो एक उद्योजक बनला आहे. उद्योजकतेच्या क्षेत्रातील काही पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. आर्थिक सुबत्ता
आणि सामाजिक मानमरातब त्याने मिळवलेला आहे.
मुलीचा फोटो मोबाईल हॅण्डसेटवर पाहात असताना मालतीबाईंना हे
सर्व आठवले.
”काय नाव आहे रे या मुलीचं?“ मालतीबाईंनी दीपकला विचारले.
”पंचफुला!“ दीपक उत्तरला.
पंचफुला? हे असे कसले नाव? उच्चवर्णीयांमध्ये कधी बाईचे असे नाव ऐकण्यात आले नव्हते. त्यामुळे मालतीबाईंना नाही म्हटले तरी थोडे आश्चर्य नक्कीच वाटले. पण वरकरणी तसे न दाखवता त्यांनी विचारले, ”बरं कुठली आहे मुलगी? राहते कुठे?“
”मुलगी इथलीच आहे. म्हणजे याच शहरातील आहे. बालिकाश्रमात राहते!” दीपकने माहिती दिली. ती माहिती ऐकून मालतीबाईंच्या आश्चर्यात आणखीनच भर पडली.
“बालिकाश्रमात? म्हणजे अनाथ मुलींच्या त्या आश्रमातील ही मुलगी आहे की काय?“ मालतीबाईंनी एका दमात विचारून टाकले.
”हो आई! त्या अनाथआश्रमातीलच मुलगी आहे ही!” दीपक उत्तरला. मालतीबाईंना हे ऐकून धक्का बसला. पण त्या लागलीच सावरल्याही. मुलगी आहे म्हणजे अनाथ आहे हे उघडच होते. त्यामुळे आईवडील, खानदान, घराणे व त्यासंबंधीत कुठल्याच प्रश्नांना काही अर्थ नव्हता. ते सर्व प्रश्न गैरलागू आहेत. हे मालतीबाईंच्या लक्षात आले. मालतीबाईंसाठीही या प्रश्नांना फार महत्त्व नव्हतेही. आईवडील, खानदान, घराणे हे सगळे उच्चप्रतीचे असूनही मुलगा किंवा मुलगी कमालीचे दुर्गुणी निपजावे अशी अनेक उदाहरणं त्यांनी पाहिली होती. त्यांना माहिती होती. तेव्हा या खानदान, घराण्याच्या बडेजावाला तसा फार अर्थ नाही, हे त्यांच्या अनुभवी, सुज्ञ मनाने केव्हाच निश्चित करून टाकलेले होते. आणि म्हणूनच मुलगी रंगरूपाने खूप सामान्य आहे. अनाथ आहे. बालिकाश्रमात वाढलेली आहे, वगैरे तपशील त्यांच्यावर, जगाचे अनेक टक्केटोणपे खात दिवस काढलेल्या अनुभवी मनावर कुठलाही विपरित परिणाम झाला नव्हता. होणार नव्हता. त्यांच्यासाठी महत्त्व होते ते मानवी कार्यकर्तृत्त्वाला. अंगभूत गुणसामर्थ्याला आणि स्वभावाच्या माणूसकीला. बाकी रंगरूप, सांपत्तिक स्थिती, खानदान, लेनदेन हे सर्व लग्नाच्या संदर्भातील अनावश्यक आणि म्हणून गौण मुद्दे आहेत, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यांना म्हणूनच उत्सुकता फक्त दोन गोष्टींची होती. पंचफुला करते काय, आणि तिची आणि दीपकची ओळख कधी, कुुठे झाली याची.
“पंचफुलाला मी गेले काही आठवडे सकाळी स्टेडियमवर नियमितपणे पाहात होतो.” दीपक सांगू लागला. तो दररोज सकाळी कामासाठी स्टेडियम मैदानावर जात असे. “तिथे दररोज येणारी, काळीसावळी असलेली पण तरीही तरतरीत असलेली ही तरुणी कोण याची मला उत्सुकता होती, त्यातूनच मी तिच्याशी परिचय करून घेतला.” दीपकने आपले म्हणणे पूर्ण केले. हे बोलत असताना त्याच्या चेहर्यावर लाजल्याचे सूक्ष्म भाव मालतीबाईंच्या अनुभवी नजरेतून सुटले नाहीत. त्यांना मोठी मौज वाटली. माणूस कितीही मोठा झाला, शिकला, स्वावलंबी झाला, तरी आपल्या प्रेमाविषयी बोलताना तो लाजतो, त्याला गुदगुल्या झाल्यासारखे होतेच.
“पंचफुलाचे नेमके कोणते गुण तुला आवडले रे दीपक?“
नोकरीच्या मुलाखतीस आलेल्या एखाद्या उमेदवाराला विचारावा तसा नेमका प्रश्न मालतीबाईंनी दीपकला विचारला. प्रश्न म्हटला तर सोपा होता. सरळ होता. पण त्यांच्या उत्तरातच अनेक बाबी दडलेल्या होत्या. दीपकला बायको कशी हवी, आपल्या जोडीदारात तो कोणती गुणवैशिष्ट्ये पाहू इच्छितो, लग्न, प्रपंच, बायको याविषयीचे त्याचे विचार, मते काय आहेत, अशा अनेक बाबी दीपकच्या उत्तरातून स्पष्ट होणार होत्या. लग्नाचा निर्णय हा मानवी जीवनातील एक महत्त्वाचा निर्णय. त्यामुळेच तो सारासार विचार केला जाऊनच घेतला पाहिजे. त्यामुळेच दीपक काय उत्तर देतो याकडे मोठ्या आतुरतेने मालतीबाई लक्ष देऊ लागल्या. या प्रश्नाचे ताबडतोब आणि नेमके उत्तर देणे कुणालाही अवघडच आहे याची त्यांना कल्पना होती. दीपकने आढेवेढे घेतले नाहीत. तोही या बाबत आपल्या आईशी चर्चा करायला तयार होताच. कारण अशा चर्चेतूनच विचारांचे, दृष्टीकोनाचे आदानप्रदान घडले आणि आपण घेतलेला निर्णय योग्य आहे किंवा नाही हे पडताळून पाहाता येते.
“बरेच गुण आवडले आई!” दीपक सांगू लागला.
“केवळ देहसौंदर्यावर वा रंगरूपावर भाळून निर्णय घेण्याइतका मी खुळा नाही किंवा नादान नाही. मला रंगरूपापेक्षा पंचफुलाचे आरोग्य, निरोगी प्रकृती जास्त महत्त्वाची वाटते. स्टेडियमवर जीमवर येण्याच्या तिच्या नियमिततेवरून ही मुलगी शिस्तीची आहे हे मी जाणले. पंचफुलाशी मी स्वतःहून परिचय करून घेतला, नंतर दररोज भेटी, गप्पागोष्टी होऊ लागल्या. म्हणून तिच्या स्वभावातील सरळपणा, तिच्यातील आत्मविश्वास, तिचा नीटनेटकेपणा, स्वच्छता हे सगळे मला जाणवू लागले. शिक्षणाबाबत विचारशील तर पंचफुला फार काही हायफाय शिकलेली नाही. तिने योगाभ्यास आणि फिजियोथेरपी या विषयाचे कोर्सेस केलेले आहेत. एका हॉस्पिटलमध्ये ती रूग्णांना आवश्यक ते व्यायाम शिकवते. योगाचे वर्गही घेते. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिच्याशी गप्पागोष्टी करताना, फिरताना आम्हा दोघांनाही कुठलाही ताणतणाव, अवघडलेपणा अजिबात जाणवत नाही. वुई आर एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल विथ इच अदर!“ दीपक सांगत होता. मालतीबाई लक्षपूर्वक ऐकत होत्या. दीपकच्या प्रगल्भ, सूज्ञ विचारपद्धतीचं मनातल्या मनाज त्या कौतुकही करीत होत्या.
“आणखीन एक गोष्ट आई. ओळख झाल्यापासून आम्हा उभयतानाही परस्परांचा सहवास आवडतोय असंही आम्हाला जाणवतं. आम्हा दोघांच्याही स्वभावातील गांभीर्य, परस्परांचा आदर करायची वृत्ती, जबाबदारीची जाणीव यामधेही वाढ होतेय हेही आम्हाला जाणवतंय. त्यामुळेच मी पंचफुलाची बायको म्हणून निवड माझ्या मनाशी निश्चित केलीय.“
“तिला बोललास का हे सगळं?“ मालतीबाईंनी दुसरा प्रश्न केला.
“हो आई! परवाच बोललोय मी तिला!“ दीपक म्हणाला.
“काय म्हणतेय मग पंचफुला?“ मालतीबाईंनी पुढचा प्रश्न केला.
“ती खूप आनंदीत झाली आई! तिचं फक्त एकच म्हणणं आहे. लग्नात फालतू खर्च करायचा नाही. त्याऐवजी तिच्या बालिकाश्रमातल्या झाडून सगळ्या मुलींना नविन कपडे करायचे!“
दीपकने सांगितले.
“अरे व्वा! काय छान मुलगी आहे! आपण तिच्या इच्छेप्रमाणे सगळ्या मुलींना नविन कपडे अवश्य करूयात. अरे तेच खरे आपले आप्तेष्ट!“ असे म्हणत अत्यंत समाधानानं मालतीबाई म्हणाल्या. दीपकच्या निवडीबद्दल त्याचे अभिनंदन करून, त्याचे तोंड गोड करण्यासाठी, त्याच्या हातावर साखर घालण्यासाठी, साखरेच्या डब्याकडे त्या वळल्या.
निवड (Short Story: Nivad)
Link Copied