अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान कायदेशीर अडचणीत सापडल्याचे बोलले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने तिला नोटीस पाठवली आहे. गौरी खान रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. २०१५ मध्ये तिला लखनौच्या या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते. कंपनीवर बँका आणि गुंतवणूकदारांची सुमारे 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता गौरी खानही चौकशीसाठी ईडीच्या रडारवर आली आहे.
तुलसियानी ग्रुपवर दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात गौरी खानलाही आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी गौरी खानची लवकरच चौकशी होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार गौरी खानला तिचा कंपनीसोबत कोणता करार होता आणि त्यासाठी किती पैसे दिले गेले याबद्दल विचारण्यात येईल.
हे प्रकरण मार्च 2023 मध्ये पहिल्यांदा उघडकीस आले. लखनौस्थित सुशांत गोल्फ सिटीच्या तुलसियानी ग्रुपच्या प्रकल्पाशी संबंधित आहे. या प्रकल्पात मुंबईतील एका व्यक्तीने 2015 मध्ये फ्लॅट खरेदी केला होता, ज्याची किंमत 85 लाख रुपये होती. मात्र पैसे भरूनही त्यांना हा फ्लॅट मिळाला नाही.
या प्रकरणी त्या व्यक्तीने तुलसियानी ग्रुप आणि गौरी खान यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गौरी खान या प्रकल्पाला मान्यता देत असल्याने तिला पाहून तुलसियानी ग्रुपच्या माध्यमातून घर विकत घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पैसे भरले पण घर मिळाले नाही, असे फिर्यादीत म्हटले होते.