Close

पार्टी रेसिपी: सिनामोन कपकेक (Party Recipe: Cinnamon Cake)

डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा, ख्रिसमसचा, पार्ट्यांचा, सुट्टीचा आणि थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचा! सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सेलिब्रेशन करणार्‍या पार्टीचा थाटही तसाच असायला हवा. यासाठीच या पार्टी स्पेशल रेसिपी.

सिनामोन कपकेक
साहित्य : केकसाठी :
अर्धा कप लोणी वा बटर, अर्धा कप कॅस्टर शुगर, 2 अंडी, दिड कप मैदा, 1 टीस्पून बेकींग पावडर, अर्धा कप दूध.
आयसिंगसाठी : अर्धा कप लोणी, 1 टीस्पून दालचिनी पावडर, 4 कप आयसिंग शुगर, 4 टेबलस्पून क्रिम, आवश्यक वाटल्यास खाण्याचा रंग.
कृती : सर्व प्रथम ओव्हन 180 डिग्रीपर्यंत प्रीहिट करा. आता लोणी आणि साखर एकत्र करून चांगले हलके होईपर्यंत फेटून घ्या. या मिश्रणात दालचिनी पावडर मिसळा. चांगले एकजीव करून यात अंडी टाका व मिश्रण एकत्र मिसळून घ्या. मैदा आणि बेकींग पावडर एकत्र करून चाळून घ्या. आता वरील मिश्रणात पिठाचे मिश्रण टाका आणि एकत्र करा. एकत्र करताना थोडे थोडे दूध टाकत रहा. मिश्रण एकत्र करताना सुरुवातीला आणि शेवटी पीठ मिसळा, अन्यथा दुधाचे प्रमाण जास्त झाल्यास कळणार नाही. हे मिश्रण प्रीहिट ओव्हनमध्ये 20 ते 25 मिनिटे बेक करा. आयसिंग करण्यापूर्वी हे कपकेक थंड होऊ द्या.
आता एका बाऊलमध्ये बटर आणि दालचिनी पावडर चांगले एकजीव करून घ्या. यात हळूहळू साखर टाकत जा आणि बटरमध्ये पूर्णतः मिसळून घ्या. या मिश्रणात दूध किंवा क्रिम मिसळून किमान पाच मिनिटापर्यंत हे मिश्रण फेटून घ्या. तुमचा आवडता खाण्याचा रंग टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करा. आयसिंग तयार आहे. हे लगेच केकवर टाकणार नसाल तर घट्ट डब्यात झाकून ठेवा अन्यथा ते लगेच कोरडे होईल.

Share this article