Close

गुलाब आणि काटा (Short Story: Gulab And Kata)

  • प्रियंवदा करंडे
    संजोग, मी तुला गुलाबाचं फूल दिलं होतं, तेव्हा तुला त्यांच्या पानाजवळचा देठावरचा काटा टोचला होता, त्या काट्याचा अर्थ तुला कळला का?
    “हाय! मी मोनिका!”
    “ओ हाय! मी संजोग!”
    असं म्हणत दोघांनी हस्तांदोलन केलं.
    “धिस इज फॉर यू संजोग!” मोनिकानं एक लाल रंगाचं गुलाबाचं फूल त्याच्या हातात दिलं.
    “वाऊ! हाऊ रोमँटिक!” संजोगनं ते फूल आपल्या हृदयाशी धरलं. तोच त्याच्या बोटाला देठावरचा काटा टोचला.
    “स्-स्स… हाय!” तो विव्हळला.
    “सो सॉरी संजोग!” मोनिका लटक्या सहानुभूतीनं म्हणाली.
    “प्रत्येकाने बरं का संजोग, एक लक्षात ठेवायला हवं,” दोघंही आता ‘नोबल लव्ह’ या उंची रेस्तराँमध्ये त्यांनी रिझर्व्ह केलेल्या टेबलापाशी रिलॅक्स मूडमध्ये स्थानापन्न झाले होते.
    “काय लक्षात ठेवायला हवं मोनिका?”
    “हेच की सुंदर गुलाबाबरोबर टोचणारे काटेही येणारच!”
    “इट्स बट नॅचरल मोनिका!” संजोग तिच्या चेहर्‍यावर नजर रोखून म्हणाला.
    “पण तुला काट्यांचा अर्थ कळला का, मला अभिप्रेत असलेला?”
    “अं… म्हणजे… नाही कळला…”, तो प्रांजळपणे म्हणाला.
    इतक्यात ऑर्डर घेण्यासाठी टेबलाजवळ बेअरा आल्यामुळे ती म्हणाली, “नंतर सांगते!”
    “तुला चीझ पकोडे आणि ब्रोकोली सूप आवडेल ना?” संजोगने मंद; पण अर्थपूर्ण हसत मोनिकाला विचारलं.
    “तुला माझ्याबद्दल, माझ्या आवडीनिवडीबद्दल सगळंच तर माहीत आहे, यू नॉटी! दे ऑर्डर!” मोनिका डोळे मिचकावत बोलत होती.
    त्याने ऑर्डर दिली. मग म्हणाला, “थँक गॉड, आपल्या भागात… परदेशात सगळीकडे लग्न जुळवणारी मंडळं आहेत ते! म्हणून तर तुझं स्थळ मिळालं मला!”
    “आणि माझ्या कावळीच्या नजरेने स्थळ शोधणार्‍या माझ्या आईला! सारखा आपला माझ्या मागे आईचा धोशा, ‘मोना लग्न कर! लग्न कर!’ पण संजोग, तुझं स्थळ मला परफेक्ट वाटलं ना म्हणून लगेच भेटायला आले…” मोनिका पटकन बोलून गेली.
    “ओ रिअली?” संजोगने पुढे विचारलं,
    “म्हणजे कसं?”
    “म्हणजे शिक्षण… त्यात तुझी पोस्ट… वेलनोन कंपनीतला जॉब… आणि समजूतदार स्वभाव… आणि हो, फोटोपेक्षाही केवढा जास्त हॅण्डसम दिसतोस तू संजोग…” मोनिका अगदी कौतुकाने बोलत होती.
    एवढ्यात सूप आणि पकोडे आले. दोघंही सूपचा आस्वाद घ्यायला लागले.
    “थँक्यू… पण मोनिका तू काय कमी आहेस का? असलं घायाळ करणारं तुझं रूप… तुझं एमबीएचं शिक्षण… त्यात तू टेनिस फार छान खेळतेस… शिवाय श्रीमंत आईवडिलांची एकुलती एक मुलगी… सुदृढ शरीरसंपदा… पिंगट केसांची एक वेगळीच जीवघेणी ऐट…”
    “अरे अरे अरे संजोग… कुठे हरवलास अरे? पकोडे खा बघू… थंड होतील माझी आरती करताना!” वरवर असं बोलत; पण मनातून हरखून जात मोनिका म्हणाली. संजोगच्या मनालाही तिने केलेल्या त्याच्या देखणेपणाच्या कौतुकाने नुसत्या गुदगुल्या होत होत्या. एकमेकांना आग्रह करत दोघंही खूप जुनी ओळख असल्यासारखे गप्पा मारत एकेक पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेत होते. शेवटी डेझर्टच्या वेळी मात्र न राहवून मोनिका म्हणाली,“ए मला रबडी
    हवी. तुला?”
    “अगं, मीही रबडीच म्हणणार होतो… खूऽऽप आवडते मला रबडी… मला वाटतं आपलं खूप छान जुळणार!”
    “ते मी कसं सांगू? तू मला प्रपोज कुठे केलयंस?”
    “करणार आहे मॅडम. सगळ्यात शेवटी करणार!” आणि शेवटी सगळं डेझर्ट, बिल वगैरे सोपस्कार आटोपल्यावर संजोगने हळूच इतका वेळ लपवून ठेवलेलं आपल्याजवळचं एक गुलाबी रंगाचं, ताजं टवटवीत सुंदर कमळाचं फूल
    बाहेर काढलं.
    “प्लीज माझ्यासमोर उभी राहशील का?”
    “ओ.के.” म्हणत मोनिका त्याच्यापुढे उभी राहिली.
  • लगेच संजोग तिच्यापुढे प्रपोज करण्याच्या पोजमध्ये उजवा गुडघा टेकवून टाचेवर बसत, हातात ते सुंदर गुलाबी रंगाचं कमलपुष्प घेऊन तिला मंजूळ स्वरात म्हणाला, “मोनिका, हे कमळाचं फूल घे. लक्ष्मीदेवीचं आवडतं फूल. आता मला सांग, माझ्या घरची लक्ष्मी व्हायला तुला
    आवडेल का?”
    मोनिकाने ते फूल नाजूकपणे हातात घेतलं. मग ती म्हणाली, “संजोग, मी तुला गुलाबाचं फूल दिलं होतं
    तेव्हा तुला त्यांच्या पानाजवळचा देठावरचा काटा टोचला होता, त्या काट्याचा अर्थ तुला कळला का?”
    “अं… नाही! काय म्हणायचंय मोनिका तुला?”
    “सांगते. ते काटे म्हणजे माझे आईवडील! मी माझ्या आईवडिलांची जबाबदारी घेणार्‍या मुलाशीच लग्न करू इच्छिते, असं मी माझ्या माहितीपत्रकात लिहिलं होतं. तू माझ्या या दोन काट्यांची… म्हणजे आईवडिलांची…”
    “आपल्या जन्मदात्या आईवडिलांना तू काटे म्हणतेस मोनिका?” तिला मध्येच अडवत संजोगने विचारलं.
    “हो! म्हणते! कारण संजोग, मी इतकी लाडाकोडात वाढले, ऐषोआरामात
    राहतेय की, मी कुणाची जबाबदारी नाही घेऊ शकणार, तेव्हा…”
    “मोनिका, तू किती नशीबवान आहेस की, तुला आईवडील आहेत, अगं माझे आईवडील मी लहान असतानाच वारले. माझ्या प्रेमळ मावशीने तिच्या दोन मुलांबरोबर मला उत्तम प्रकारे वाढवलं, सांभाळलं. हे खरं आहे गं! पण शेवटी आपले आई-वडील ते आपले! मला माझ्या आईवडिलांचं प्रेम नाही मिळालं गं! मी आईवडिलांच्या प्रेमाचा भुकेला आहे, मोनिका…” संजोग हळवेपणाने बोलत होता.
    “हे तर खूपच छान झालं. मग मला सांग, तू माझ्या आईवडिलांना कोणत्याही परिस्थितीत सांभाळशील ना संजोग?” मोनिकानं विचारलं.
    “म्हणजे, मी तुला पसंत आहे मोनिका?”
    “हो अरे! पण माझी ही अट मान्य आहे ना तुला ते सांग. माझ्या आईवडिलांना कायमचं सांभाळण्याची जबाबदारी घेण्याची तुझी तयारी आहे, हे मला कळलं की लगेच आपल्या लग्नाचं नक्की झालं, असा शिक्कामोर्तब करेन मी!” मोनिकाने स्पष्टपणे सांगितलं.
    “अगं मग वाट कसली बघतेस? मी तयार आहे तुझ्या आईवडिलांना कायमचं सांभाळायला, अगदी आनंदाने!”
    संजोग मनापासून बोलत होता. मोनिकाला ते जाणवलं. ती म्हणाली,“तर मग मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, संजोग!”
    “थँक्यू यू मोनिका! थँक्यू सो मच!” म्हणत संजोगने तिचा हात हातात घेतला.
    संजोगने गाडी स्टार्ट करत विचारलं, “आता आपण कुठे जायचं? तुझ्या घरी?”
    “येस, ऑफ कोर्स! संजोग, पण प्लीज मला मिसअंडरस्टँड करू नकोस हं! आय लव्ह माय पेरेन्ट्स… पण वाटतं जबाबदारी नाही पेलता येत त्यांची…” मोनिका शांतपणे आपलं मन मोकळं करत होती.
    “आय नो मोनिका! पण
    मी आहे ना आता? माझ्यावर सगळं सोपव.” असं म्हणत त्याने ब्रीच कॅन्डीच्या रस्त्याला गाडी वळवली. थोड्याच वेळात दोघंही घरी पोहोचले. संजोगला पाहताक्षणीच मोनिकाच्या आईवडिलांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटली.
    “ही माझी आई आणि संजोग, हे माझे बाबा.” मोनिकाने ओळख करून दिली. संजोग लगेच त्या दोघांच्या पाया पडला.
    “आयुष्यमान भव,” असा दोघांनीही त्याला प्रेमाने आशीर्वाद दिला. इतक्यात शारजाबाईंनी, घरी चोवीस तास राहून घरकाम करणार्‍या बाईंनी, गरमगरम कॉफीचे कप ठेवलेला ट्रे आणला.
    “मोना, तुझी निवड उत्तम आहे बाळ!” बाबा गदगदलेल्या स्वरात म्हणाले.
    “मलाही तसंच वाटतं गं मोना. आता लग्न कधी करायचं ते ठरवू. संजोगच्या घरच्या…”
    पण त्यांना मध्येच अडवत संजोग म्हणाला, “आई, तुम्हीच ठरवा काय ते. माझ्या घरी तुम्ही ठरवाल ते
    मान्य असेल.”
    “पण संजोग, तुझ्या मावशी आणि त्यांच्या यजमानांना मला वाटतं विचारावं लागेल.”
    “नाही मोनिका, माझ्या मावशीला माझ्या सुखातच सुख वाटतं. आपण ठरवू आणि मग सांगूच की त्यांना,” संजोग तिला समजावत म्हणाला.
    शेवटी दोघांचीही आता तिशी उलटली आहे, तर साखरपुडा नंतर लग्नाची तयारी, त्यानंतर लग्न इतकं करण्यापेक्षा सरळ रजिस्टर्ड लग्न करावं असा मोनिकाने प्रस्ताव मांडला.
    “माझी काहीच हरकत नाही.” संजोगनं म्हटलं.
    “आई, तुला काय वाटतं?”
    ”जे तुला वाटतं तेच मोना!” मोनिकाच्या आईने म्हटलं.
    इतके दिवस हा नको मुलगा असं करून प्रत्येक स्थळाला नाक मुरडणारी आपली मुलगी या मुलाला आनंदाने पसंत करतेय, लगेच लग्न करण्याची तयारी दाखवते,
    हे आपल्यासाठी सोन्याहूनही पिवळं आहे. तेव्हा उगाच लग्नाचा फापटपसारा करा, त्यात दिवस वाया घालवा, यापेक्षा सरळ कोर्ट मॅरेज करायचं नि नंतर वाटलं तर रिसेप्शन करायचं, हे जास्त फायद्याचं आहे, असा सुज्ञ विचार करून मोनिकाची आई शांत राहिली.
    “तर मग, हे लग्न ठरलं बरं का संजोग”, मोनिकाच्या बाबांनी मनापासून म्हणत त्याचा हात हातात घेऊन त्याचं अभिनंदन केलं. एवढा आय.टी.मधला उच्चपदस्थ, देखणा मुलगा; पण किती सालस, नम्र आहे, बाबांना वाटलं.
    “थँक्यू बाबा, आता मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे,” संजोग थोडा गंभीर होत म्हणाला. मोनिकाचे आईबाबा थोडे बावचळले. संजोगला ते लगेच जाणवलं.
    “नाही, नाही. काळजी करण्यासारखं काही नाही. मी सांगणार होतो की, मी तुम्हा दोघांची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आहे, हे तुमच्या कानावर घालावं.”
    “मुला, तुझं खूप कौतुक वाटतं रे! बर्‍याच मुलांना हा प्रस्ताव मंजूर नव्हता. तेही कारण होतंच लग्न लांबायला…” मोनिकाचे बाबा हळव्या स्वरात म्हणाले.
    “बाबा, खरं तर मीच तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझे आईबाबा माझ्या लहानपणीच गेले. तुम्हा दोघांमध्ये मी माझे आईबाबा बघतो. मी तुमचा मुलगाच आहे असं समजा आणि उगीच मनात कसलं गिल्ट ठेवू नका की, मला तुम्हाला सांभाळावं लागतंय, मी तुमच्यावर उपकार वगैरे करतोय… उलट देवाने मला आईवडिलांची सेवा करायची ही संधी दिली आहे, हे माझं मी भाग्य समजतो. तेव्हा मी शब्द देतो की, मी तुमची जबाबदारी घेतली आहे आणि ती मी पूर्ण शक्तिनिशी पार पाडणार आहे.”
    “अरे अरे संजोग, किती रे तू भावनाविवश होतोस. अरे आमचा विश्‍वास आहे तुझ्यावर… आम्ही काही स्टॅम्प पेपरवर लिहून मागत नाही बरं!” मोनिका मिस्कील हसत म्हणाली. मग सगळंच वातावरण एकदम हसतंखेळतं झालं. संजोग मग घरी जायला निघाला.
    एवढ्यात मोनिकाचे बाबा म्हणाले, “अरे संजोग, रात्र किती झालीय बघ, आज आमच्या घरीच राहा. गेस्ट रूममध्ये तुझी व्यवस्था करता येईल.”
    “अं… बरं! चालेल. नाहीतरी कंपनीने दिलेल्या भल्या मोठ्या फ्लॅटमध्ये मी एकटाच असतो. आजची रात्र थांबतो मी इथे.” संजोग तयार झाला.
    दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळी मोनिकाने संजोगला कोर्ट मॅरेजसाठी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते, याची आठवण करून दिली.
    “मला लक्षात आहे अगं. जाऊ आजच आपण ऑफिसला जाता जाता. बाय द वे, आजचा नाश्ता लाजवाब,” संजोग दिलखुुलास हसत म्हणाला.
    “यासाठी आमच्या शारजाबाईंना थँक्स द्यायला हवं,” मोनिका शारजाबाईंकडे बघून म्हणाली.
    “अरे हो, बरोबर यार. शारजाबाई खरोखरच तुमच्या हाताला आईच्या ममतेची चव आहे,” संजोग हृद्य स्वरात म्हणाला.
    “अगदी खरंय तुमचं भाऊ. कारण हे सगळं मोनिकाताईंच्या आईनेच बनवलं आहे.” शारजाबाई म्हणाल्या.
    संजोगने लगेच मोनिकाच्या आईला सांगून टाकलं, “आई. असं जर रोज मिळणार असेल, तर मी रोज येणार इथे ब्रेकफास्टला.”
    “अरे, नुसता ब्रेकफास्टच का? तू खरंच राहायला ये इथे. सगळे खाण्यापिण्याचे लाड पुरवीन तुझे बाळा.” आईंचा आवाज मायेच्या धारांमुळे थरथरत होता. संजोगला त्यांच्या काळजातील पुत्रप्रेम जाणवलं. त्या प्रेमानं तो न्हाऊन निघाला. इतक्यात संजोगच्या मोबाईलमध्ये मेल आल्याची सूचना मिळाली. त्याने लगेच पाहिलं तर त्याला तातडीने दुसर्‍या दिवशी सिंगापूरला जावं लागणार आहे, असा मेसेज त्याला मिळाला.
    चार-आठ दिवसातच संजोग टूरवरून येऊन थोडा फ्री झाल्यावर मोनिकाच्या आईने त्याला सांगितलं, “हे बघ संजोग, आता मला थोडा वेळ दिला पाहिजे बरं का तुम्ही दोघांनी…”
    “अगं पण आई…”

  • “मोना, मला माहिताय तुमची खूप मोठी पोस्ट आहे. तुम्ही खूऽऽप बिझी आहात. पण दोन दिवस द्या मला.” आई प्रेमाच्या अधिकाराने बोलली.
    “दिले, पण कशासाठी?”
    “अरे, संजय मला तुझ्यासाठी सूट, हिर्‍याची अंगठी, गळ्यातली सोन्याची कंठी, झालंच तर मोनासाठी शालू, दागिने सगळं सगळं घ्यायचंय.”
    शेवटी सगळी साग्रसंगीत खरेदी पार पडून मोनिका आणि संजोगचं रजिस्टर्ड लग्न पार पडलं. रात्री संजोगच्या मावशीची फॅमिली नि मोनिकाचे आईबाबा, शारजाबाई एवढ्याच मंडळींसमवेत संजोग-मोनिकाने डिनर पार्टी साजरी केली. दोन दिवसांनी दोघंही स्वित्झर्लंडला हनीमूनसाठी जाणार होती. घरी निघताना मोनिकाची आई संजोगला म्हणाली,
    “संजोग, एक छोटीशी इच्छा आहे. आता तुझ्या फ्लॅटवर मोनिका माप ओलांडून गृहप्रवेश करेल. नंतर
    येऊ आपण आमच्या घरी.”
    संजोगने लगेच गाडी स्वतःच्या फ्लॅटवर घेतली. “आजची रात्र आम्ही इथे साजरी करू का आई?” गृहप्रवेश झाल्यावर संजोगने विचारलं.
    “हो चालेल.” असं मोनिकाची आई बोलते न बोलते तोच मोनिकाच्या बाबांना एकदम गरगरल्यासारखं झालं. मग डॉक्टर, औषधं सगळी धावपळ करून संजोग मोनिकाच्या घरीच राहिला. बाबांना व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. घरच्या घरीच त्यांच्यासाठी सलाईन वगैरेची व्यवस्था केली गेली. अशा स्थितीत मोनिका-संजोगला हनीमूनसाठी बाहेर जावंसं वाटलं नाही. चार-पाच दिवसात बाबांना बरं वाटल्यानंतर मोनिकाच्या आईनं म्हटलं, “आता बाबांची सेवा पुरे झाली. मोना, तुम्ही दोघांनी आजपासून तुझ्या बेडरूममध्ये झोपायला सुरुवात करायची.”
    मोनिका ‘बरं’ म्हणाली. संजोग अगदी हरखून गेला होता. रात्री मोनिकाला मिठीत घेत संजोग म्हणाला, “समयसे पहले और नसीबसे जादा किसी को कुछ भी
    नहीं मिलता, याची प्रचिती आली मला.”
    पण मोनिका काही बोलणार तोच तिच्या मोबाईलची रिंग वाजली. “एक मिनिट हं” म्हणत तिने फोन घेतला. तिला अर्जंट कॉल होता, तोही यूएसहून. हेडऑफिस यूएसला असल्यामुळे नाइलाज झाला. वाट बघून संजय समजूतदारपणे झोपून गेला. सकाळी त्याला जाग आली ती मोनिकाच्या आरडाओरड्याने. अंगावरचं पांघरूण बाजूला टाकून तो तडक दिवाणखान्यात धावला.
    “आई, बघ ना, उद्याच्या उद्या मला यूएसला जायला लागणार कामासाठी. काय करू मी? बिचार्‍या संजोगला काय वाटेल गं?”
    तिचं बोलणं ऐकून एकंदरीत काय झालं असेल याची त्याला कल्पना आली. उच्च पद, यूएस बेस्ड ऑफिस म्हटलं की असं होणं कॉमन आहे. तो पुढे आला आणि मोनिकाच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, “नो प्रॉब्लेम मोना, तू जाऊ शकतेस उद्या. आणि मी आहे ना इथं, आईबाबांजवळ.”
    ते ऐकून “हाऊ स्वीट ऑफ यू,” असं म्हणत मोनिकानं त्याचा हात हातात घेतला.
    मोनिकाच्या खुशालीबद्दल विचारून-विचारून तिच्या आईने संजोगला भंडावून सोडलं. पण तोही बिचारा काळजीत होता. कारण मोनिकाशी कुठूनही संपर्कच होत नव्हता. शेवटी त्याने “मी यूएसला येऊ का? आईबाबा तुला भेट, म्हणून माझ्या पाठी लागलेत,” अशा शब्दांत मेल पाठवली. आणि खरंच मोनिकाने त्याच्या मेलला उत्तर पाठवलं. तिने लिहिलं, “प्रिय संजोग, मी तुझ्याशी लग्न केलं, कारण तुझं मन, तुझा स्वभाव सुंदर आहे. म्हणून मी तुला सत्य सांगू शकते. संजोग, मी इथे माझ्या मित्रासोबत-जोसेफसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये खूऽऽऽप सुखात राहते. आईबाबांसाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. माझ्या आईवडिलांची जबाबदारी तू सर्वस्व पणाला लावून निभावणार, याची मला खात्री आहे. कारण तुझ्यासारखी जीवनमूल्यं जपणारी, दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळतात. मला फूल देऊन तू विचारलं होतंस, मोनिका तू माझ्या घरची लक्ष्मी होशील का? पण संजोग मी तुझ्याच काय कोणाच्याही घरची लक्ष्मी होऊ शकत नाही. कारण मी वृत्तीने चंचल, स्वच्छंदी आहे. तेव्हा गुड बाय!”

Share this article